संसार भातुकलीचा भाग १ (अनोखी प्रेम कहाणी)

अधुरी प्रेम कहाणी
असंख्य वायरींमधे गुंडाळून बेडवर निपचित पहुडलेली ती.. मॉनिटरवर होणाऱ्या टिकटिक वर नजर ठेऊन हातातल्या नोटपॅड वर काहीतरी लिहिणाऱ्या नर्स कडे भिरभिरत्या नजरेने बघत होती. नाकातून टाकलेली नळी असह्य वेदना देत होती. तोंडाला लावलेला ऑक्सिजन मास्क, एका हाताला सलाईन आणि एका कोपऱ्यात उभ राहून तिला बघत डोळ्यातील पाणी पुसणारा तो. त्याच्याकडे बघून हलकेच स्माईल देत डोळ्यांची एकदाच उघडझाप करून तिने डोळे बंद करून घेतले..मॉनिटरवर वरखाली असणारी रेषा टीsss असा आवाज करत सरळ झाली होती...नर्सने एकदम सगळ्या मशनी काढून व्यवस्थित ठेवायची सुरुवात केली. डॉक्टरांनी तिच्या चेहऱ्यावर चादर ओढली आणि त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटून सांगितल.
"आय एम सॉरी...आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही.."
***********************

"बाबा...मी कुठे आहे? मला शोध." शिवंण्या म्हणजे आपली लाडकी शिवू म्हणाली.

"नो बेटा..बाबाला काम आहे खूप. एक अर्जेंट मीटिंग आहे. प्लीज बेटा तू मम्मा सोबत खेळ." तिच्या गालाला हलकेच थोपटत विक्रांत म्हणाला.

"काय रे बाबा..तुला नेहमीच काम असत. दिवसभर मम्माच खेळत असते माझ्यासोबत. तुला तर नेहमीच मीटिंग असते नाहीतर तुझे मित्र असतात किंवा तू फोन घेऊन बसतोस.." इवलुसा चेहरा करत ती तिच्या खोलीत निघून गेली.

अर्पिताने हे सगळ किचनमधून पाहिले आणि ती बाहेर आली.

"विक्रांत..जरा त्या मोबाईल मधून डोकं बाहेर काढून पण बघ.. तुझी लेक दिवसभर बाबा बाबा करून तुझी वाट बघत असते आणि तू तिला कितीसा वेळ देतोस? आत्ताही तुझी कोणतीच महत्वाची मीटिंग नव्हती बरोबर ना?" अर्पिता म्हणाली


"अग जरा मित्रांसोबत बोलत होतो म्हणून सांगितल अर्जंट मीटिंग आहे. बोल काय खेळू तिच्यासोबत." मोबाईल सोफ्यावर ठेवत त्याने विचारलं.


"काही करू नका..उपकार करा थोडे आणि बायको मुलीला वेळ द्या. मित्रांना रोज भेटता. रोज टपरीवरून चहा घेऊन येता ना..ऑफिस मधून सुटलास की त्यांच्यासोबतच असतोस ना मग घरी आल्यावर जरा आम्हाला वेळ दे. हल्ली ती एकटी रहायला लागली आहे. तिला लन गरज आहे तिच्या बाबाची. जवळ घे तिला नाहीतर खूप लांब जाईल ती तुझ्यापासून." अर्पिता म्हणाली

"ओ जस्ट शट अप..अस काही होणार नाही आणि वेळ दे म्हणजे नेमक काय करायचं? कामधंदे सोडून घरी बसायच का? तुमचा सोबत लपाछुपी खेळत बसायच का? की भांडी भांडी खेळत बसायच! नॉनसेन्स..रोजची नुसती कटकट" सोफ्यारून उठून बेडरुमकडे जाताना विक्रांत बडबडत गेला. आणि इकडे अर्पिताच्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागलं.

स्वयंपाक झाला तसा अर्पिताने पान वाढायला घेतली. अजूनही विक्रांत फोन घेऊन असणार माहीत होत म्हणून विक्रांतला फोनवर मॅसेज करूनच तिने जेवायला खाली बोलावलं. टेबलवर दोनच ताट वाढली. रडून रडून झोपलेल्या शिवूला कडेवर घेऊन येऊन तिच्या तोंडावरून थोडासा पाण्याचा हात फिरवून अर्पिताने तिला थोडंसं भरवून घेतल. एक नजर मोबाईल मधे गुंग असलेल्या विक्रांत वर टाकत अर्पिता शिवूला भरवत होती.
मनात असंख्य प्रश्न फेर धरत होते. विक्रांत जेऊन उठला हात धुतले आणि फोन घेऊन सरळ त्याच्या खोलीकडे गेला. अर्पिता जेवली नाही याकडे त्याच साधं लक्ष सुद्धा नव्हत. लेकीच्या तोंडावरून हात फिरवून अर्पिताने तिला थोडावेळ राऊंड मारायला संगितले तोवर कीचनच उरलेलं काम आवरून दोघी झोपायला खोलीत गेल्या.


"मम्मा..बाबा झोपला सुद्धा!"

"हो सोन्या..त्याची महत्वाची मीटिंग संपली असेल. चल तू पण झोप. सकाळी लवकर उठायचं आहे ना! स्कूल आहे." लेकीला कुशीत घेऊन थोपटत असताना विचारांच्या तंद्रीत रात्री उशिराच तिला झोप लागली.

सकाळी पाच वाजता अर्पिताची सकाळ व्हायची. उठल्यावर कोमट पाणी पिण्यापासून ते योगा पर्यंत दीड तासात सगळ आटोपून फ्रेश होऊन शिवंण्यासाठी टिफीन बनवणे, विक्रांतचा टिफीन रेडी करून त्याचे कपडे प्रेस करणे, शिवंण्याला शाळेसाठी तयार करून तिला बस पर्यंत ड्रॉप करणे सगळच अर्पिता एकटी करत होती. विक्रांतच काम म्हणजे घरात फक्त पैसे द्यायचे आणि मोकळं व्हायचं.
आम्हाला वेळ दे हे नेहमीच त्याला सांगावं लागायचं आणि इतकं सांगूनही वेळ किती देणार? तर दहा मिनिट सुद्धा नाही.

चार तासांसाठी शिवंण्या शाळेत असायची तोवर घरातली इतर काम आवरून शिवंण्या येईपर्यंत अर्पिता नेहमीच तीची आवडीच काम करायची. तिच्या गॅलरी मधे तिने रंगबिरंगी फुलांची झाड लावली होती. त्यांना पाणी घालण, पिकलेली पाने काढणं, रंगीत फुलांचे फोटो काढून छानशा मॅसेज सोबत सोशल मीडियावर स्वतःच्या वॉलवर टाकणं. घरातून कौतुक कधी होत नव्हत पण बाहेरची अनोळखी दुनिया मात्र तिच्या या कौशल्याचं खूप कौतुक करत होती. छान छान कमेंट वाचून तिला थोडावेळ का होईना विचारातून मुक्तता मिळायची. घरी किंवा नवऱ्याच्या मित्र मैत्रिणींच्या वाढदिवशी हीच फुलांची रोपटी गिफ्ट म्हणून ती आवर्जून द्यायची. कधी तुळशीच रोप तर कधी गुलाबाच रोप. यातच ती जास्त समाधानी होती.

आयुष्याच रोप मात्र कधीच हवं तस बहरल नव्हत. नवऱ्याच प्रेम हे फक्त प्रणय पुरता मर्यादित होत. बाहेर बायको बायको म्हणून मिरवणारा घरी मोजकच बोलायचा आणि बाकी वेळ फोनमध्ये असायचा. अर्पिता दिसायला खूपच सुंदर. अगदी बायकांना सुद्धा तिच्याकडे बघून ईर्ष्या वाटेल. बायको म्हणजे जणू त्याच्यासाठी संभोग करण्याची समाजाने नेमून दिलेली एक हक्काची वस्तू होती. एखाद्या फुलाला कुस्करून फेकून देतो तसच काहीस अर्पिताच्या बाबतीत सुरू होत. परिस्थितीमुळे हतबल असल्याने अर्पिता सगळ सहन करत होती.

विक्रांतचा जॉब चांगला होता. स्वतःच्या हिमतीवर तो आज त्याच्या ऑफिसमधे चांगल्या पोस्ट वर कार्यरत होता. घरची परिस्थिती बेताची असून सुद्धा स्कॉलरशिपच्या जोरावर स्वतःचा अभ्यास करून आणि पुढील शिक्षणासाठी लोन घेऊन आज तो सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर झाला होता.

विक्रांत आणि अर्पिताची ओळख एका लग्नामध्ये झाली होती. विक्रांतचे बाबा आणि अर्पिताचे बाबा एकाच शाळेत शिकलेले. दोघांची अगदी घनिष्ट मैत्री. विक्रांत देखणा होताच पण अर्पिता सुद्धा सुंदर होती. जणू काही देवाने तिला घडवताना संपूर्ण लक्ष तिच्या सौंदर्यावर दिलं होत. सरळ नाक, पाणीदार निळे डोळे, गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे ओठ, कमनीय बांधा, कमरेपर्यंत रुळणारे कुरळे केस, नितळ गोरा रंग... सूर्याची किरणं तिच्या देहावर पडताच गोरी असणारी तिची कांती लाल गुलाबी दिसायची. इतकी सुंदर!

विक्रांत सुद्धा दिसायला डॅशिंग होता. काळेभोर डोळे, गडद भुवया, वाऱ्यावर उडणारे सिल्की केस ज्यातून सतत हात फिरवून त्यांना सेट करणारा तो, जिम करून कमवलेली बॉडी, व्हाईट शर्टवर ब्राऊन रंगाच जॅकेट, कमरेला दिमाखात मिरवणारी कारची किल्ली आणि इकडून तिकडून फिरणारी नजर..

विक्रांतची नजर काही वेळासाठी का होईना त्याच्याही नकळत अर्पितावर खिळली होती.

"फक्त दिसायला सुंदर नाही.. मुलगी संस्कारी सुद्धा आहे बरं!" गणपतराव बोलले विक्रांतच्या जवळ येऊन हळूच बोलले आणि त्याची पाठ हलकेच थोपटली.(विक्रांतचे बाबा)

"बाबा..अस काही नाही. मी जस्ट सहज बघत होतो." कस बस सावरत विक्रांत म्हणाला.

"हरकत नाही. तुला मुलगी आवडली असेल तर आपण तिलाच तुझ्या आयुष्यात आणुया. माझ्या मित्रासोबत माझी मैत्री आणखी घट्ट होईलच शिवाय आम्ही पण नवीन नात्यात बांधले जाऊ." गणपतराव म्हणाले.

काही न बोलता कसलासा बहाणा करून विक्रांत तिकडून निघून गेला. मुलाच्या मनात अर्पिताने केंव्हाच जागा केली होती हे गणपतरावांना समजायला उशीर लागला नाही. कसलीही वाट न बघता गणपतरावांनी विक्रांतसाठी अर्पिताला मागणी घातली.

अर्पिताने तिच्या वडिलांचं आणि विक्रांतच्या वडिलांचं बोलण ऐकलं आणि ती पुढे आली.

" तुम्हा मोठ्यांमधे मी बोलते त्यासाठी सॉरी..पण मला हे लग्न मान्य नाही. मी हे लग्न करू शकत नाही."

"पण का? काही कमी आहे का माझ्या मुलामधे?"
क्रमशः
©®श्रावणी लोखंडे.



🎭 Series Post

View all