Login

संसार सुखाचा भाग 1

Gosht Krushanechi

"कोणी आहे का? माई, दार उघडा." कृष्णा घाबरून ओरडत म्हणाली.


"नंदन, आता या वक्ताला कोण आलं?" नंदन पाठोपाठ माई दार उघडायला आल्या.


"कृष्णे, तू आत्ता इथं? आणि काय हा तुझा अवतार?" माई आश्चर्याने म्हणाल्या.

तशी कृष्णा आत येऊन त्यांना बिलगून रडू लागली. 


"अगं, झालं तरी काय? नंदन, झटकन दार लावून घे." माई परिस्थितीच गांभीर्य ओळखत म्हणाल्या "आणि कृष्णे हे वळ कसले तुझ्या हातावर?"


"माई, ते सासरची माणसे रोज मला मारहाण करतात. त्यांच्या विरुध्द एक शब्द जरी बोलला तरी लगेच हात उठतो त्यांचा. अगदी घरात पाऊल ठेवल्यापासून मला त्यांनी कामाला जुंपले आहे. बरं, कामाला मी कधीच नाही म्हणाले नाही. पण प्रत्येक कामात काही ना काही खोट काढली जाते. मग सासुबाई माझ्याविरुद्ध यांचे कान भरतात. गेल्या दोन महिन्यात यांनी माझ्या अंगाला हात लावला तो फक्त मारहाण करण्यासाठीच. अक्षरशः कोंडून ठेवले होते मला घरी. कशीबशी सुटका करून मी इथे आले माई." कृष्णा ओक्साबोक्षी रडू लागली. 


"आत्ताशी कुठे दोन महिने झाले आहेत तुझ्या लग्नाला! इतक्यात रंग दाखवायला सुरुवात केली का त्यांनी? काही गोष्टी आमच्या कानावर आल्या होत्या. पण वाटलं त्या सगळ्या झूठ आहेत आणि तुझ्या बापाने आधी चौकशी केली नव्हती का या स्थळाची? थांब त्याचा कानच पकडते. तुझा बाप माझा दूरचा भाऊ  असला तरी माझ्या शब्दाबाहेर जायचा नाही तो."

माई तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या. नंदनने पाण्याचा पेला आणून कृष्णाच्या हाती दिला.


इतक्यात पुन्हा दार ठोठावण्याचा आवाज आला.

"कृष्णे, तू माडीवर जा. मी पाहते कोण आहे ते. नंदन हिला घेऊन जा लवकर." कृष्णा आणि नंदन गेल्याचे पाहून माईंनी दरवाजा उघडला. 


"आम्ही पाटलांची माणसे आहोत. त्यांच्या सुनबाई इथे आल्यात का पाहायला आलो. अहो, पळून गेल्या आहेत त्या घरातून. तुमच्या नातेवाईक ना त्या? म्हणून इथे पाहायला आलो." दारात दोन-तीन माणसे उभी होती. त्यातलाच एक माणूस घरात नजर टाकत म्हणाला.


"नाही रे बाबा, इथे कोणीच आलं नाही आणि कृष्णेनं घरातून पळून जायचं कारणच काय म्हणते मी?" माई चिडून म्हणाल्या. तशी ती माणसे काहीच उत्तर न देता तिथून निघून गेली. माई दार बंद करून माडीवर आल्या.


"नंदन, श्रीकृष्णाची शपथ घेऊन सांगते मी, यातला शब्दन् शब्द खरा आहे." कृष्णा तळमळीने म्हणत होती.


"कृष्णे, तू काळजी करू नकोस. आपण उद्याच जाऊ तुझ्या माहेरी. तुझ्या बापाला तुझ्या सासरच्यांना चांगलाच दम द्यायला सांगते." माई म्हणाल्या.

पण नंदन मात्र विचारात पडला, \"ही नसती ब्याद गळ्यात घेऊन काय करायचे? त्यांचे त्यांना पाहू दे, पुढे काय करायचे ते.\"


माईंनी भराभरा स्वयंपाकघरात येऊन दोन भाकऱ्या बडवल्या आणि कृष्णाला हाक मारली. "कृष्णे, ये दोन घास खाऊन घे."


चार घास पोटात गेल्यावर कृष्णेला जरा बरं वाटलं. रडून थकल्यामुळे तिला काही वेळातच झोप येऊ लागली. अंगाचं मुटकुळं करून ती एका कोपऱ्यात पडून राहिली. विचारांच्या तंद्रीत तिला झोप कधी लागली हे कळलेच नाही.


"माई, अगं तुला जायची काय गरज आहे? ती आणि तिच्या माहेरची माणसं पाहून घेतील काय करायचं ते." भल्या पहाटे नंदनच्या आवाजाने कृष्णाला जाग आली. 


"असे कसे म्हणतोस नंदन? ती आपली कोणीच लागत नाही का? आणि एका स्त्रीवर जर अन्याय होत असेल तर तो वेळीच रोखायला हवा." माईंनी कृष्णाला उठवून तयार व्हायला सांगितलं. काही वेळातच दोघी घरातून गडबडीने बाहेर पडल्या आणि तासाभरात कृष्णाच्या माहेरी पोहोचल्या.


---------------------------


"दादासाहेब, अहो असे काय म्हणता? कृष्णा तुमची एकुलती एक मुलगी! तिला सासरी असा त्रास झाला तर चालेल तुम्हाला?" माई आपल्या दादाला म्हणाल्या.


"माई, मुलीच्या सासरी काही ना काही कुरबुरी चालायच्याच. त्यात आपण लक्ष घालायचे नाही." दादासाहेब.


"हो..पण वळ बघ तिच्या अंगावरचे. ते रोज मारहाण होते तिला. शिवाय नवराही तिच्या बाजूने नाही. अशावेळी आपण पुढाकार घ्यायला हवा." माई समजावत म्हणाल्या.


"हे बघ माई, एकदा मुलगी सासरी दिली म्हणजे तिचा आणि माहेरचा संबंध संपला.



क्रमशः



0

🎭 Series Post

View all