"माई, सुखी संसाराची मी खूप स्वप्नं पाहिली होती. ती सारी मातीत मिसळली. आता माझे भविष्य काय असेल?" कृष्णेला आपल्या भविष्याची चिंता सतावू लागली.
इतक्यात दुसऱ्या लग्नाचा विचार नको म्हणून माईंनी तिला आपल्या हाताखाली सारी कामे शिकवायला सुरुवात केली. हळूहळू कृष्णा पूर्वीपेक्षा घरच्या कामात तरबेज झाली.
एक दिवस सहजच माई तिला म्हणाल्या, "कृष्णे? कितवी शिकलीस?"
"चौदावी." कृष्णा.
"पुढे शिकायची इच्छा आहे? घरचं तर सगळं तुला येतं. मग आता नुसतं घरात बसून करणार काय? मी नंदनला सांगते. त्याच्या भरपूर ओळखी आहेत. पंधरावीला तुला सहज प्रवेश मिळून जाईल यावर्षी."
हो, नाही म्हणत कृष्णाने नंदनच्या मदतीने पंधरावीसाठी अर्ज भरला. नंदनने तिच्या आधीच्या कॉलेजमधून खटपट करून सगळी सर्टिफिकेट्स मागवून घेतली आणि पुढच्या काही दिवसांतच कृष्णाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला देखील.
कॉलेजमध्ये तिच्या नव्या ओळखी झाल्या. नव्या मैत्रिणी मिळाल्या. पण मध्येच आपल्या भूतकाळात डोकावताना तिला त्रास होई. मात्र माईंचा पाठिंबा, नंदनची साथ, आणि आजूबाजूचं बदललेलं वातावरण याचा सकारात्मक परिणाम तिच्या मनावर झाला. आता कृष्णा जोमाने अभ्यासाला लागली.
रोज सकाळी शेतावर जाताना नंदन कृष्णेला कॉलेजवर सोडून पुढे जाई. येताना मात्र मैत्रिणींच्याबरोबर ती घरी येई. कृष्णाच्या मैत्रिणी खूप चांगल्या होत्या. तिला समजून घेत होत्या. त्यामुळे कृष्णा हळूहळू आपला भूतकाळ विसरत चालली होती.
आधी रागराग करणारा नंदन आता तिच्याशी प्रेमाने वागत होता. त्याच्या मनात तिच्याबद्दल असणाऱ्या सहानुभूतीची जागा आता मैत्रीने घेतली होती. नंदनला आता कृष्णाची खूप सवय झाली होती. बऱ्याचदा तो तिला अभ्यासात मदत करत असे. कृष्णाने देखील त्याच्याकडून शेतीची बरीच कामे शिकून घेतली होती.
नकळत नंदनला कृष्णेविषयी कधी ओढ वाटू लागली, हे त्याचे त्यालाच समजले नाही.
कृष्णे शिवाय नंदनला आता अजिबात करमत नव्हते. आपण कृष्णाला लग्नासाठी मागणी घालावी असे तो त्याला मनापासून वाटत होते. पण लोक काय म्हणतील? याचीही काळजी त्याला वाटत होती. पण जे झाले त्यात तिची काय चूक? आणि आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असल्यावर लोकांच्या बोलण्याचा आपल्यावर परिणाम होत नसतो. नंदनने ठरवले, कृष्णेची वार्षिक परीक्षा झाल्यानंतर तिला लग्नासाठी मागणी घालायची.
कृष्णाचे कॉलेजचे वर्ष बघता बघता संपले. परीक्षा देखील पार पडली. आता निकाल हाती येईपर्यंत काय करावे? म्हणून तिने शिवणकामाचा क्लास सुरू केला. आपल्याला उत्तम शिवणकाम येते हे ती मधल्या काळात जणू विसरूनच गेली होती.
इकडे नंदनला मात्र कृष्णेला मागणी घालण्याचे धाडस होईना. 'एकदा माईशी बोलावे का? आणि माई नाही म्हणाली तर?' काही दिवसानंतर पाहू म्हणून नंदनने या विषयाला तात्पुरता आराम दिला. तो आता सतत कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करू लागला.
एक दिवस जयवंतने कृष्णेला एकटीला गाठून तिची वाट अडवली आणि तो तिची माफी मागू लागला. "कृष्णा माझं चुकलं. खूप चुकलं..माझ्या आई-वडिलांचे ऐकून मी तुझ्यावर हात टाकण्याची खूप मोठी चूक केली. तुला नको नको ते बोललो, तुझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही की बायको म्हणून कधी तुझा स्वीकार केला नाही. मला माफ कर आणि केवळ एक संधी दे. मी माझ्या झालेल्या सगळ्या चुका सुधारून दाखवेन."
हे ऐकून कृष्णा काहीच न बोलता घरी धावत - पळत आली. घडलेला प्रकार तिने माईंच्या कानावर घातला. "जयवंतला खरंच पश्चाताप झाला असेल तर चांगली गोष्ट आहे. तुझा निर्णय तू घेऊ शकतेस." माई म्हणाल्या.
हा प्रकार नंदनच्या कानावरही आला होता. आपण कृष्णेला आधीच मागणी घालायला हवी होती, असे त्याला वाटू लागले.
आता कृष्णा काय निर्णय घेते, याकडे माई आणि नंदनचे लक्ष लागून राहिले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा