'खरंच जयवंतला पश्चाताप झाला असेल का? आणि झाला असेल तर या आधी का नाही झाला? बायको म्हणून हात उचलण्याचा जो हक्क त्याने गाजवला, त्याआधी एक स्त्री म्हणून आपल्या बायकोचा मान ठेवावा असे त्याला कधीच वाटले नसेल?' कृष्णा विचारांच्या कात्रीत सापडली होती. यावर त्याच्या आई -वडिलांचे काय म्हणणे आहे हे देखील तिला माहीत नव्हते.
'जयवंतशी लग्न केल्यानंतर पुन्हा तेच प्रसंग ओढवले तर? तेव्हा माईही माझ्या पाठीशी उभ्या नसतील. कारण तो सर्वस्वी माझा निर्णय असेल आणि लग्न झालेच तर जयवंतचे मन, विचार पुन्हा बदलणार नाहीत कशावरून? याविषयी खात्री देता येत नाही. ज्या काटेरी रस्त्याची वाट आपण बदलली त्या रस्त्यावरून पुन्हा जायचे कशाला?'
खूप विचार करून अखेर कृष्णेने जयवंतला नकार कळवला. तसे नंदनच्या मनावरचे ओझे उतरले.
मात्र अगदी दुसऱ्याच दिवशी दादासाहेब माईंच्या घरी हजर झाले आणि कृष्णेला आपल्या घरी नेतो म्हणू लागले.
"माई, माझी चूक झाली. थाटामाटात लग्न करून दिलेली आपली मुलगी दोन महिन्यात परत माहेरी येते, याचं खूप मोठं ओझं माझ्यावर मनावर होतं. कृष्णेला तिथं काय काय भोगावे लागलं असेल? हा साधा विचार देखील माझ्या मनात आला नाही. मला माफ कर माई. आपली मुलगी समजून तू माझ्या कृष्णेसाठी खूप काही केलंस. तुझ्या उपकारांची परतफेड मी कधीच करू शकणार नाही." दादासाहेब माईंसमोर हात जोडून उभे होते.
"दादा, माफी मागायची असेल तर ती तुझ्या मुलीची माग. कारण तिच्या म्हणण्यावर तू विश्वास ठेवला नाहीस. कोणी तिच्यावर विश्वास ठेवला नसता तर कदाचित ती तिच्या जीवालाही मुकली.."
"असे म्हणू नको माई. माझ्या मुलीला काहीही होणार नाही. तिची आई रोज मला समजावत होती. माझ्या कृष्णेला परत घरी घेऊन या म्हणत होती. दोन मुलानंतर झालेली कृष्णा माझी एकुलती एक मुलगी! तिचं काही बरं -वाईट झालं असतं तर? या विचाराने माझे डोळे उघडले." दादासाहेबांनी आपल्या लेकीला जवळ घेतले.
"दादा, लेकीचे महत्त्व तुझ्या लक्षात घ्यायला खूपच उशीर झाला रे. तुझी लेक आता आमची झाली." माई म्हणाल्या.
"तुझीच लेक आहे ती माई. हे नवे आयुष्य तिला मिळाले ते केवळ तुझ्यामुळेच. पण आता तिला मी घरी घेऊन जाईन म्हणतो. एखादे चांगले सुयोग्य स्थळ पाहून तिचे लग्न लावून देईन." दादासाहेब.
"दादा, प्रत्येकवेळी आपलेच खरे करतोस? मी मगाशी म्हटले तुझी लेक आता आमची झाली. माझी सून करून घेईन म्हणते मी तिला. माझ्या मुलासाठी, नंदनसाठी मी तुझ्याकडे तिचा हात मागते आणि वचन देते, अगदी सुखाचा संसार करेल तुझी लेक." माई डोळ्यांच्या कोपऱ्यातून नंदनकडे पाहत म्हणाल्या.
हे ऐकून कृष्णा छानशी लाजली.
हे ऐकून दादासाहेबांना खूप आनंद झाला. "माई, तुझे उपकार मी कसे विसरू गं? दूरची बहीण म्हणून इतकी वर्षे आपले संबंध दूरचेच राहिले होते. पण ते आज नात्यात बदलू पाहत आहेत याचे सर्व श्रेय तुलाच जाते.
आज तुझ्या मनात येईल ते माझ्याकडे माग. मी द्यायला तयार आहे."
"मला बाकी काही नको दादा. फक्त नारळ आणि तुझी मुलगी दे. काय रे नंदन, बरोबर बोलते ना मी?" माई नंदन जवळ येत म्हणाल्या.
"झाले ना तुझ्या मनासारखे? जा मग पाया पड आपल्या मामांच्या."
नंदन माईंकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत राहिला.
"अरे, आईला आपल्या लेकरांच्या मनातले सगळे कळत असते." माई गालातल्या गालात हसत म्हणाल्या.
नंदन आणि कृष्णा दादासाहेबांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकले. मात्र मध्येच थांबवत दादासाहेबांनी त्याला आपल्या गळ्याशी धरले.
"तुमच्यासारखा जावई मिळाला, मी धन्य झालो. खरं तर हा विचार मी या आधीच करायला हवा होता."
"मामा, कृष्णाचा भूतकाळ हा भूतकाळच राहू द्या. माझ्याकडून चुकूनही कधी त्याचा उल्लेख होणार नाही, मी खात्री देतो." नंदन दादासाहेबांच्या पाया पडत म्हणाला.
तशी कृष्णा नंदनकडे पाहत राहिली. 'माई म्हणतात तसाच सुखाचा संसार होईल आपला.' नंदनकडे पाहत हळुवारपणे तिच्या तोंडून हे वाक्य निघून गेले आणि माईंची नजर आपल्यावरच आहे हे पाहून ती पुन्हा लाजली.
"माई, ही आनंदाची बातमी घरात सर्वांना कधी सांगतो, असे झाले आहे आणि तुझी हरकत नसेल तर जवळचा मुहूर्त पाहून थोडक्यात लग्न करून द्यावं म्हणतो." असे म्हणत दादासाहेबांनी माई आणि नंदनचा निरोप घेतला. त्यांच्यासोबत कृष्णाही होती. जी आपल्या सुखी संसाराची स्वप्न पाहत, लवकरच या घरात सून म्हणून माप ओलांडून आत येणार होती.
समाप्त
©️®️सायली जोशी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा