Login

संसाराचा तोल भाग १

संसाराचा तोल भाग १
आज 'वात्सल्य' अपार्टमेंट मध्ये सकाळचे ६:३० वाजले होते. स्वयंपाक घरात कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या होत्या आणि मिक्सरचा आवाजही घुमत होता. उर्मिलाताईंची सकाळ साडे पाच वाजल्यापासून सुरू झाली होती.

एकीकडे देवापुढची रांगोळी काढणे, माधवरावांसाठी गरम पाणी आणि औषधं देणे, आणि दुसरीकडे बँकेत जाण्याआधी डबे बनवणे – ही त्यांची रोजची कसरत होती. पण त्यांच्या चेहऱ्यावर ना थकवा होता, ना कपाळावर आठ्या. त्या एखाद्या कसलेल्या सेनापतीसारख्या आघाडी सांभाळत होत्या.

दुसऱ्या खोलीत मात्र चित्र वेगळे होते. सानिकाच्या मोबाईलचा अलार्म चौथ्यांदा वाजून बंद झाला होता. ती धाडकन उठली.

"अरे बापरे! ७ वाजले? मंदार, उठ ना... आज मला साडे नऊचा लॉग-इन आहे आणि ट्रॅफिक किती असतं तुला माहितीये ना!" सानिका ओरडली.

ती तशीच टॉवेल घेऊन बाथरूममध्ये पळाली. पंधरा मिनिटांनी बाहेर आली आणि हेअर ड्रायरने केस वाळवत हॉलमध्ये आली. उर्मिलाताई डबे भरत होत्या.

"सानिका, अगं केस नंतर वाळव. आधी देवापुढचा दिवा लावून घे आणि हे बघ, तुझी आणि मंदारची मेथीची भाजी तयार आहे. मस्त लसूण घालून केली आहे. पोळ्या गरम आहेत तोवर खाऊन घ्या."
उर्मिलाताईंनी प्रेमाने पण घाईने सांगितले. सानिकाने नाकाचा शेंडा उडवला. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.

" आई, किती वेळा सांगितलंय तुम्हाला, सकाळी सकाळी ही लसणाची फोडणीची भाजी नको असते आम्हाला. मला फक्त टोस्ट आणि कॉफी हवी होती. आणि हो, देवाचा दिवा ? मला वेळ नाहीये आता. तुम्हीच लावून टाका ना." ती वैतागून म्हणाली.

उर्मिलाताईंचा हात क्षणभर थांबला. त्या शांतपणे म्हणाल्या,

" अग असं काय बोलते सानिका, म्हणे मला वेळ नाहीये आता. दिवा तुम्हीच लावून टाका ना. हे म्हणजे टाकणं टाकायचं आहे का ? " त्यावर सानिकाने वैतागून पाहिलं.

" सानिका, मी पण साडे नऊला बँकेत पोहोचतेच ना ग ? बत्तीस वर्षं झाली, मी कधी वेळेचं कारण सांगून घरातली कर्तव्यं टाळली नाहीत. घर बाईच्या हाताने सजते, फक्त पगाराने नाही." उर्मिलाबाई सानिकाला समजावत म्हणल्या.

"ओह प्लीज आई!" सानिकाने कॉफीचा मग टेबलावर आदळला.

" तुमचा काळ वेगळा होता. तेव्हा बँकेत एवढं वर्क प्रेशर नसेल. मला आज यू केच्या क्लायंटचा कॉल आहे. माझं डोकं नका फिरवू सकाळ-सकाळ. आणि हे घरकाम... यासाठी आपण बाई का नाही लावत अजून एका वेळेला ? मला हे काम करणं म्हणजे रोजची 'कटकट' वाटतं."

त्याच वेळी मंदार हॉलमध्ये आला. शर्टाची बटणं लावत तो म्हणाला,

" काय ग सानिका ! आई एवढं करतेय, तुला काय प्रॉब्लेम आहे ? " तो सानिकाच्या वागण्याला कंटाळला होता.

"तू शांत बस मंदार !  तुला आयतं मिळतंय ना सगळं म्हणून तू तूझ्या आईचीच बाजू घेणार. मला करिअर महत्त्वाचं आहे. हे पोळ्या लाटणं नाही," सानिका फणकाऱ्याने म्हणाली.

उर्मिलाताईंनी एक दीर्घ श्वास घेतला. रोजची हीच चर्चा, रोजचा हाच अपमान. त्या दिवशी मात्र त्यांच्या संयमाचा बांध तुटला नाही, पण त्याला तडा नक्कीच गेला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत त्यांना कोकणातून त्यांच्या बहिणीचा फोन आला. बहीण आजारी होती.

संध्याकाळी घरी आल्यावर उर्मिलाताईंनी बॉम्ब टाकला.

" अहो माधव, मंदार आणि सानिका... जरा इकडे या."त्या सोफ्यावर बसत म्हणाल्या.

" माझ्या बहिणीला, मालतीला बरं नाहीये. तिला मदतीची गरज आहे. मी उद्या सकाळीच कोकणात जातेय. महिनाभर तरी मी तिथेच राहीन."

सानिकाच्या डोळ्यात चमक आली. 'महिनाभर कटकट नाही ! स्वातंत्र्य !  ' तिचा चेहरा आनंदाने उजळला.

इकडे मंदार मात्र काळजीत पडला.

" आई, पण घराचं काय? बाबांची औषधं, स्वयंपाक ? " सानिकाने मध्येच संभाषणात उडी मारली.

" अरे मंदार, डोन्ट वरी ! मी आहे ना. आय विल मॅनेज एव्हरीथिंग. आपण काय अडाणी आहोत का ? आई, तुम्ही बिनधास्त जा. उलट मलाही बघायचंच आहे की हे घर चालवणं एवढं काय मोठं रॉकेट सायन्स आहे ते."

उर्मिलाताईंनी सानिकाकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक गूढ हसू होते.

" ठीक आहे सूनबाई. चाव्यांचा जुडगा हा घे. उद्यापासून हे घर तुझ्या हातात. बघूया, तुझ्या लॅपटॉपच्या की-बोर्डवरची बोटं संसाराच्या वीणेवर कशी चालतात ते."

रात्री सानिकाने आनंदाने झोपताना मंदारला सांगितले,

" बघच आता, मी हे घर कसं हाय-टेक आणि सिस्टिमॅटिक करते ते ! "

तिला कल्पनाही नव्हती की उद्याची सकाळ तिच्या 'सिस्टिम'ची कशी वाट लावणार आहे की व्यवस्थित चालणार आहे ?