Login

संसारात नणंदेची भूमिका ( भाग ५ - अंतिम भाग )

काही ठिकाणी नणंद वाईट असतात, पण सगळ्याच वाईट नसतात. आपल्या संसारात नणंदेची भूमिका कशी असावी? नणंद भावजयीचं नातं कसं असावं? हे वाचा एका लेखिकेच्या दृष्टिकोनातून. कथेचं नाव - संसारात नणंदेची भूमिका. लेखिका - सौ. जानकी नारायण कटक.

                       रात्रीचं जेवण झाल्यानंतर आज गौरी गच्चीवर गेली नव्हती. फक्त नंदिनी जाऊन बसली होती. तिला पाहून कार्तिकही तिच्यामागे गेला होता. आज बऱ्याच दिवसांनंतर त्यालाही तिच्यासोबत बोलण्यासाठी निवांत वेळ मिळाला होता.

"नंदू, तू खूप बदलली आहेस. आधी थोडी घाबरलेली होतीस. आता मात्र ठाम दिसतेस." कार्तिकला तिच्यात होणारे बदल जाणवले होते. जेवढं त्याने निरीक्षण केलं होतं त्यावरून तो तिला म्हणाला.

"हो, कारण माझी नणंद सावलीसारखी माझ्यासोबत आहे. ती कधीच पुढे आली नाही, पण मी जेव्हा डगमगले, तेव्हा तिने माझा हात घट्ट धरला. त्या हातामुळेच मी ठाम झाली आहे." तिचं हे उत्तर ऐकून कार्तिक हसला.

"तुला माहित आहे का? तुझं आणि तिचं नातं, हेच आपल्या घराचं खरं वैभव आहे." कार्तिक हसून म्हणाला, त्यावर तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं.


**************************


                     काही आठवड्यांनी नंदिनी एका स्त्रियांच्या संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी झाली. तिथे तिला 'स्त्रीचे वेगवेगळे पैलू' या विषयावर बोलायला निमंत्रित केलं गेलं होतं. त्यात ती तिच्या नणंदेबद्दलही बोलली होती.

तिच्या भाषणाच्या शेवटी ती एवढंच म्हणाली, "माझ्या जीवनात एक स्त्री अशी आली, जिने मला शिकवलं की मौनातली ताकद ही जास्त असते. सावली ही कधी कधी आयुष्यभराचं मार्गदर्शन ठरते. आणि माझ्या आयुष्यातील ती स्त्री आहे माझी नणंद... गौरी देशमुख."

तो क्षण स्तब्ध होता. एक साधी नणंद एका भावजयीसाठी अशी प्रेरणा ठरेल, याची कोणालाच कल्पना नव्हती.


************************

दिवस गेले, ऋतू बदलले. नंदिनीच्या पोटी नवा जीव आकार घेत होता.
गर्भारपणात ती थोडी अस्वस्थ राहू लागली. त्या काळात गौरी सतत तिच्या मागे उभी राहिली. औषधं, वेळेवर आहार, चालायला घेऊन जाणं, मधूनच एखादी गोड कविता वाचून दाखवणं, हे सगळं गौरी नंदिनीसाठी करत होती.

"ताई, तुम्हाला काय वाटतं? ही मुलगी असेल तर तिचं नाव काय ठेवूयात?" बाहेर शतपावली करायला गेल्यानंतर नंदिनीने गौरीला विचारलं.

गौरीने थोडा विचार केला आणि म्हणाली,
"सिया... सोज्वळ, शांत, आणि सामर्थ्यवान." नंदिनीने डोळे मिटले.

"हो ताई, सिया तुमच्यासारखीच होईल. सावलीसारखी, पण हळूहळू प्रकाशातच उभी राहणारी." नंदिनी आनंदाने म्हणाली. गौरीही किंचित हसली.


**************************

दिवस भरले आणि सिया जन्मली. त्या दिवशी, पहिल्यांदा गौरीच्या डोळ्यांत फक्त अश्रू नव्हते, तर त्यात अभिमान होता, समाधान होतं, आणि स्वतःला पुन्हा एकदा सापडल्याची जाणीव होती.

शेवटी एके संध्याकाळी नंदिनी तिला म्हणाली,
"ताई, तुमच्या सावलीने मला आकार दिला आणि आता माझं आईपण तुमच्या अनुभवाने पूर्ण होणार आहे."

"माझं सगळं आयुष्य तू जगते आहेस. हेच माझं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण होत आहे असं वाटत आहे."

एका स्त्रीची हीच तर स्वप्न असतात. एक संसार आणि त्या संसाराच्या वेलीवर उमललेली छोटी छोटी फुले. गौरीला हे सगळं जगता आलं नव्हतं, आणि भविष्यात कधी जगता येईल की नाही हेही माहित नव्हतं. नंदिनीच्या माध्यमातून ती त्याचा अनुभव घेत होती.

त्या दिवशी नंदिनीने तिच्या मनातल्या शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिलं,

"ती नणंद नव्हती, ती माझं दुसरं अस्तित्व होती. जी सावली होती, पण आज माझ्या आयुष्याचा प्रकाश झाली आहे."


समाप्त!


ही कथा फक्त आणि फक्त नणंद - भावजयीच्या नात्यावर आधारित लिहिली गेली आहे. एका नणंद आणि भावजयीमध्ये कसं नातं असावं? हे मी माझ्या दृष्टिकोनातून लिहिलं आहे. कथेतून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू अजिबात नाही.