सनई-चौघड्यांच्या गजरात नंदिनी या नवविवाहितेचं पाऊल सासरी पडलं. आज ती 'सौ. नंदिनी कार्तिक देशमुख' झाली होती. देशमुख परिवार हा मध्यमवर्गीय होता. आज तीही या परिवाराची एक सदस्य झाली होती. आईच्या घरातून निघताना तिचे डोळे ओलावले होते, पण सासरी पोहोचल्यावर तिच्या मनात एक वेगळाच गोंधळ चालू होता. सासरच्या मंडळींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, मात्र तिच्या मनात भिती जणू फेऱ्या मारत होती.
'घर नवं, परिवार नवा, मग यात मी स्वतःला सामावून घेऊ शकेन ना?' असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात उमटत होते.
घर भरलं होतं पाहुण्यांनी. कोणी पेढे देत होतं, कोणी विचारपूस करत होतं. नंदिनीच्या मनात मात्र एक वेगळी शांतता पसरलेली होती. थोडीशी अनामिक भीतीची. कोणी तिच्याकडे पाहिल्यावर कशीबशी ओढून ताणून हसत होती. प्रत्येक वेळी हसणं तिच्यासाठी कठीण होत होतं. मनातील भीती दाबून ठेवण्यासाठी तिला अथक प्रयत्न करावे लागत होते.
त्या गडबडीत एक व्यक्ती मात्र अगदी शांत होती, ती म्हणजे गौरी.
गौरी देशमुख, नंदिनीची नणंद. गौरी ही कार्तिकची मोठी बहीण होती. अविवाहित होती. गौरी तशी साधीसुधी, आणि चेहऱ्यावरही कमालीची शांतता. ती घरात सुरू असलेल्या गडबडीत भाग घेत नव्हती, पण नंदिनीवर नजर ठेवून होती. तिचं वागणं न बोलताही आश्वासक होतं.
नंदिनीला लग्नाच्या दिवसांमध्ये झालेल्या धावपळीमुळे थकवा जाणवायला लागला होता. आता आपण थोडा वेळही इथे बसू शकणार नाही, असं तिला वाटत होतं. ती हळूच तिच्या सासूबाईंच्या कानापाशी झुकली.
"आई." तिने तिच्या सासूबाईंना म्हणजेच, वनमाला यांना आवाज दिला. त्यांनी तिच्याकडे पाहिलं.
"काय झालं नंदिनी? बरं वाटत नाही का?" तिच्या चेहऱ्यावर त्यांना प्रचंड थकवा दिसत होता. त्यांनी काळजीने तिला विचारलं.
"थोडं थकल्यासारखं वाटत आहे आई. मी थोडा वेळ खोलीत जाऊन आराम करू का?" नंदिनी आजूबाजूला नजर फिरवत म्हणाली.
"हो जा ना. तसेही आता पाहुणेमंडळी एक एक करून निघून जातील. साध्या गप्पा सुरू आहेत त्यामुळे तू गेलीस तरी चालेल. ती बघ, ती माझी खोली आहे. देवदर्शन होईपर्यंत तू माझ्यासोबत माझ्या खोलीत राहणार आहेस." वनमाला हसून म्हणाल्या.
"धन्यवाद आई!" वनमाला यांचे आभार मानून नंदिनी लगेच जाण्यासाठी उठली.
नंदिनी खोलीत आली. डोकं गरगरत होतं. शारीरिक थकवा आणि मानसिक ताण यांनी एकत्र जखडून टाकलं होतं. मंगळसूत्र सोडून बाकी सगळे दागिने काढून तिने बाजूला ठेवले. तिने सोबत आणलेली बॅग केव्हाच खोलीत आणली गेली होती. त्यातून तिने साधीशी साडी काढली. अंगावरील भरजरी साडी उतरवून ती साधी साडी नेसली.
अंथरुणावर अंग टाकलंच होतं की, दारावर हलकीशी टकटक झाली. घरातीलच कोणी असेल म्हणून पटकन जाऊन तिने दरवाजा उघडला. दार उघडताच समोर गौरी दिसली. हातातील थंड पाण्याचा ग्लास न बोलताच तिने नंदिनीच्या हातात दिला. नंदिनी गोंधळली होती.
"तुम्ही?" नंदिनीने विचारलं, तर गौरीने फक्त एक सौम्य हसू केलं.
"फार दगदग झाली ना? तुला आईच्या खोलीत येताना पाहिलं म्हणून तुझ्या मागेच आले. केव्हापासून पाहुण्यांच्या गराड्यात अडकून होतीस तू. तहान लागली असेल असा विचार करून तुझ्यासाठी थंड पाणी आणलं होतं." एवढेच मोजके शब्द बोलून ती जाऊ लागली, तेवढ्यात नंदिनीने तिला अडवलं.
"तुमचं नाव नाही सांगणार का?" लग्नातही ती जास्त सहभागी नव्हती म्हणून नंदिनीने विचारलं.
"गौरी." तिने नाव सांगितलं आणि निघून गेली.
नंदिनीने दरवाजा लोटून घेतला. पाणी पिऊन ग्लास टेबलवर ठेवला आणि अंथरुणावर पडली.
त्या रात्री नंदिनी खूप विचार करत होती. ही गौरी नेमकी कोण आहे? इतरांसारखी उत्साही का नाही? तिचं हसणं वेगळंच वाटत होतं. शांत आणि थोडं गूढ.
**********************
दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी नेहमीप्रमाणे वेळेवर उठली. ती तिचं आवरून हॉलमध्ये आली, तेव्हा गौरी आधीच येऊन स्वयंपाकात व्यस्त झालेली दिसत होती. लग्नाचा चुडा उतरेपर्यंत घरातील कामे करायची नसतात, असं वनमाला यांनी नंदिनीला सांगितलं होतं, म्हणून ती हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर बसून गौरीचं निरीक्षण करत होती.
गौरीचं अंगणात कपडे वाळत घालणं, आईला इतर कामांमध्ये मदत करणं. तिच्या कृतींमध्ये एक मुक लय होती. न बोलता सगळं सांभाळत होती. थोडंफार आवरून झाल्यावर वनमाला नंदिनीच्या शेजारी येऊन बसल्या.
"आई, या ताई कोण आहेत? " गौरीला जाणून घेण्याच्या उत्सुकतेने नंदिनीने वनमाला यांना विचारलं.
"अगं ती गौरी आहे. कार्तिकची मोठी बहीण. अर्थात तुझी मोठी नणंद." वनमाला यांनी गौरीची ओळख स्पष्ट करून दिली.
मग समजलं तिला की गौरी तिची मोठी नणंद आहे. ती तिच्या आई आणि भावाचं हक्काचं आधारस्तंभ. घरातील जबाबदारी घेतलेली. ती केवळ नणंद नव्हती, तर घराची दुसरी आईच होती.
दुपारी सगळ्यांची जेवणं झाल्यावर वनमाला आणि गौरी स्वयंपाकघरात एकत्र भांडी घासत होत्या. नंदिनीही त्यांच्याजवळ उभी होती. गप्पा होत होत्या, पण हळू आवाजात.
"तुम्ही लग्न नाही केलं का?" नंदिनीने थोडं धाडस करून विचारलं.
"झालं होतं ठरवून, पण अचानक बाबा गेले. आई थोडी आजारी राहायची. कार्तिक लहान होता. तेव्हा वाटलं, आईनंतर आपणच मोठे तर घराची जबाबदारी घ्यावी, म्हणून थांबले." गौरीने हसून उत्तर दिलं.
नंदिनी सुन्न झाली. इतकी सहज सांगितली होती तिने परिस्थिती जणू काही साधं काम केलं असावं, पण त्यामागची खोली मात्र भारी होती.
तेव्हा नंदिनीला गौरी घरात एखाद्या 'सावली'सारखी भासली. सतत घरच्यांच्या पाठीमागे असणारी, पण कुठेही कोणावर काम आणि जबाबदारीचं ओझं न टाकणारी.
कार्तिक नेहमी म्हणायचा, 'गौरी ताई नसती, तर घर कधीच मोडलं असतं.'
पण आता नंदिनीला समजायला लागलं होतं की ते केवळ कौतुक नव्हतं, तर एक वास्तव होतं.
पण आता नंदिनीला समजायला लागलं होतं की ते केवळ कौतुक नव्हतं, तर एक वास्तव होतं.
******************************
सप्ताह उलटून गेला. नंदिनीचं मन घरात रुळायला लागलं होतं, पण तरीही कधी कधी ती गोंधळायची. अशा वेळी समोर यायची फक्त गौरी, तेही न बोलता. कधी कोमट दूध तिला प्यायला द्यायची, कधी हलकासा हात तिच्या पाठीवर फिरवत, कधी खांद्यावर हात ठेवत, अशी सावरत असायची. गौरी काही बोलायची नाही, पण तिचं असणं पुरेसं असायचं नंदिनीसाठी.
एकदा नंदिनी गच्चीवर बसलेली असताना, गौरी हळूच तिच्या शेजारी येऊन बसली. चंद्राचा प्रकाश पसरलेला होता. दोघीही गप्पच बसल्या होत्या.
"तुम्ही इतक्या शांत कशा राहता ताई? बोलावं असं काही वाटत नाही का?" नंदिनीने शांतता मोडत विचारलं.
"वाटतं गं, पण सगळं बोलून उपयोग नसतो. काही वेळा एखाद्याला शब्दांऐवजी फक्त सोबत हवी असते." गौरीने शांतपणे उत्तर दिलं.
तिचे डोळे बोलताना काहीसे पाणावलेले होते. नंदिनीलाही तिचं वाईट वाटलं. गौरी जी कायम सगळ्यांच्या सोबत असते, ती मुळात खुपच एकटी होती.
"तुम्ही खरंच सावलीसारख्या आहात ताई. तुम्ही सोबत असताना कधी एकटं वाटतच नाही." नंदिनी किंचित हसून म्हणाली, तर गौरीनेही हसून प्रतिसाद दिला.
त्या रात्रीच्या शांततेत एका वेगळ्याच नात्याने आकार घेतला होता. नणंद-भावजयीचं नातं नव्हे, तर एका स्त्रीची दुसऱ्या स्त्रीशी जुळलेली जिव्हाळ्याची वीण.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा