सासरी येऊन नंदिनीला आता महिना होऊन गेला होता. घरातलं वातावरण आता जरा परिचित झालं होतं. तिने एकटीने स्वयंपाक करणं, भांडी घासणं, सासूबाईंच्या औषधी लक्षात ठेवणं, सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली होती. गौरीकडून एवढी तेवढी तिला मदत होत असायची. वनमाला आणि कार्तिक कायम आसपास असायचे, पण तरीही सगळ्यात जास्त शांतता तिला गौरीच्या सहवासातच मिळायची.
गौरी बोलायची कमी, पण वागण्यातून खूप काही सांगायची. घरातल्या गोंगाटापेक्षा गौरीचा मौन जास्त बोलका वाटायचा.
सकाळी नंदिनी आणि गौरी दोघी अंगणातील कामे आवरत होत्या. तेवढ्यात एक मुलगी पळत अंगणात आली. केस विस्कटलेले, चेहरा घामाळलेला, डोळ्यांत अश्रू होते. तिच्यामागे तिचे आईबाबा आणि एक शेजारची बाई होती. त्यांचे आवाज चढलेले होते. त्या मुलीचं नाव साक्षी होतं.
साक्षी... घरातून पळून गेलेली, पण आता पुन्हा परत आलेली मुलगी. तिच्यावर बोट ठेवलं जात होतं.
"घराचं नाव खराब केलंस."
"लाज नाही वाटत?"
"कोणाच्या नादी लागली होतीस?"
असे गलिच्छ शिंतोडे तिच्यावर उडत होते.
साक्षीचा चेहरा जमिनीशी चिकटलेला होता. आई ओरडत होती. वडील निरुत्तर होते. आणि साक्षी, हताश. नंदिनी आणि गौरी ते पाहत होत्या.
गौरी पटकन पुढे आली. तिने हळूच साक्षीच्या खांद्यावर हात ठेवला.
"काय दंगा आहे हा?" गौरीने कडक शब्दांत विचारलं.
"काही दिवसांपूर्वी पळून गेली होती ही. आता माहित नाही कोणासोबत तोंड काळं करून माघारी आली आहे." तिच्या आईने उत्तर दिलं. तिची आईच अशी बोलत आहे म्हणून गौरीच्या भुवया वर गेल्या होत्या.
"हे तुम्ही स्वतःच ठरवत आहात? तिला विचारलं तुम्ही? तिने सांगितलं तुम्हाला हे सर्व?" गौरीने लगातार त्यांना एका मागून एक प्रश्न विचारले.
"तिने सांगायला कशाला पाहिजेत? मुली घरातून याच गोष्टीसाठी पळून जातात." तिच्या आईसोबत जी शेजारची बाई आली होती, ती हातवारे करून म्हणाली.
"वा! खूप छान मत मांडलंत. ठीक आहे, असं मानुयात की ही स्वतःच्या प्रेमी सोबत पळून गेली होती. चूक केली तिने असं गृहीत धरू, पण मग शिक्षा फक्त तिनेच का भोगावी?" तिच्या प्रश्नाने सगळे शांत झाले.
"तिच्या जागी जर मी असते, तरी काय वेगळं झालं असतं? प्रत्येक स्त्रीला कधी ना कधी चुकीचं ठरवलं जातं, मग त्यात तिची चुकी असो की नसो. पण मग कोणी तिला समजून घेतं का? नेमकी ती कशासाठी घरातून पळून गेली होती, हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला?" सगळ्यांना शांत पाहून गौरी म्हणाली.
कोणीच काही बोललं नव्हतं, पण साक्षी डोळे वर करून गौरीकडे पाहत होती. गौरी तिला थोडी विश्वासाने उजळलेली भासली. तिच्या बोलण्यावर कोणीच बोलत नव्हतं म्हणून तिने साक्षीकडे पाहिलं.
"काय नाव तुझं?" गौरीने शांत आवाजात तिला तिचं नाव विचारलं.
"साक्षी." तिने पटकन आपलं नाव सांगितलं.
"तू घरातून कशासाठी पळून गेली होतीस हे घरच्यांना सांगितलं नाही का?" गौरीने प्रेमळ शब्दांत तिला विचारलं. तिचे घरचे तिच्यासाठी कठोर झाले होते, ज्यामुळे कदाचित ती खूप घाबरलेली होती.
"आई-बाबांनी माझं लग्न ठरवलं होतं, पण मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. त्यांची लग्नासाठी सुरू असलेली जबरदस्ती पाहून शेवटी मला घर सोडावं लागलं, मात्र बाहेरचं जग किती क्रूर आहे हे बाहेर पडल्यानंतर जाणवलं. लोकांच्या वाईट नजरा स्त्रीच्या शरीरावर अशा फिरतात, की त्या नजरा पाहूनच जीव अर्धमेला होतो. बाहेर आपलं अस्तित्व टिकणार नाही हे जाणवलं म्हणून मी परत आले." साक्षीने सगळी हकीकत सांगितली, आणि ते ऐकून तिच्या घरच्यांचे डोळे मोठे झाले.
"पाहिलंत, तुम्ही स्वतः तिच्या पळून जाण्यामागचं कारण आहात. कधीच तुम्ही तिच्या मनाचा विचार केला नसणार. शेवटी हतबल होऊन तिने तुम्हालाच सोडण्याचा निर्णय घेतला. आता बोला, यात चूक कोणाची आहे?" गौरीने विचारलं, तरीही चिडीचूप शांतता होती. कोणाकडून काहीच उत्तर येत नव्हतं.
"आता तरी तिला व्यवस्थित वागवा. मुलगी आहे ती तुमची. तिला तुमच्या आधाराची गरज आहे. तिला समजून घ्या. तिला माया लावा. तुम्हाला इतर कुठले निर्णय घ्यायचे असतील ते घ्या, पण तिच्या आयुष्याचा निर्णय तिला घेऊ द्या. तिची इच्छा आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची, तर तिची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकतो? याचा विचार करा." गौरीने तिच्या घरच्यांना शांत सुरात समजावलं.
साक्षीच्या आई-बाबांना गौरीचं म्हणणं पटलं. ताबडतोब ते साक्षीला प्रेमाने आपल्यासोबत घेऊन निघून गेले. नंदिनी बाजूला थांबून सगळं पाहत आणि ऐकत होती. गौरी पहिल्यांदाच इतकी बोलली होती म्हणून नंदिनीला तिचं आश्चर्य वाटलं होतं. गौरीला अन्याय सहन होत नाही हे मात्र तिच्या आजच्या वागण्या आणि बोलण्यावरून नंदिनीला समजलं होतं.
त्या रात्री नंदिनी खूप विचार करत होती.
"गौरी ताईंनी एवढी हिंमत कुठून आणली?”
तिची दृष्टी फक्त घरापुरती मर्यादित नव्हती, तर समाजातल्या स्त्रीला बघण्याची तिची दृष्टी वेगळी होती. खरं तर गौरी ही केवळ नणंद नव्हती, ती एक मार्गदर्शक होती. आज गौरीने साक्षीच्या घरच्यांना जो योग्य मार्ग दाखवला होता, त्यामुळे नंदिनीच्या मनात तिच्यासाठी आदर आणखी वाढला होता.
************************
नंदिनी आणि गौरी दुपारची कामं आवरल्यानंतर गप्पा मारत बसल्या होत्या. नंदिनीसोबत गौरी आता थोडीफार मोकळी बोलायला लागली होती.
सहजच नंदिनीला प्रश्न पडला म्हणून तिने गौरीला विचारायचं ठरवलं.
"ताई, तुम्हाला कधी वाटलं नाही का की तुमचं आयुष्य थोडं वेगळं असावं? एखादा संसार, मुलं, नवरा?"
“वाटायचं गं, अजूनही वाटतं. कोणाला या गोष्टी नको वाटतात? मात्र तो विचार केला की असं वाटतं घर एकटं पडेल. बाबा गेल्यानंतर सगळी जबाबदारी मी माझ्यावर घेतली होती. मी जवळ असले तर आई स्वतःकडे थोडं लक्ष तरी देते, नाहीतर बाबा गेल्यानंतर तिने जगण्याची आशाच सोडली होती. आपला जीवनसाथी गमावल्यानंतर एका स्त्रीला खूप वेदना होतात. माझ्या सुखी संसाराच्या स्वप्नांसाठी मी आईला आणि या घराला एकटं सोडू शकत नाही." गौरीने थोडा वेळ गप्प राहून उत्तर दिलं.
नंदिनी आश्चर्यचकित झाली होती. हीच ती गौरी होती, स्वतःच्या भावनांना मागे ठेवून इतरांच्या वेदना समजून घेणारी.
***********************
एके दिवशी नंदिनी आणि कार्तिकला पाहुण्यांकडे जायचं होतं. नंदिनी थोडी चिंतेत होती. लग्न झाल्यानंतर तीच वनमाला यांच्या खाण्यापिण्याची आणि औषधांची वेळ सांभाळत होती. नंदिनीने आपली तशी चिंता गौरी जवळ व्यक्त केली.
"आई काही सांगणार नाहीत, पण एखाद्या दिवशी त्यांच्याकडून औषधं घ्यायची राहिली तर?"
"तू जाऊन ये, मी आहे ना. आईच्या झोपेची, औषधांची वेळ, तिचा हेल्दी सूप, मी सगळं बघते. तू बिनधास्त जा." गौरी हसून म्हणाली.
'मी आहे ना!' तिचं हे वाक्य नंदिनीला खूप भावलं.
'हो ताई, तुम्ही आहात. एखाद्या सावलीसारख्या, नेहमी माझ्या पाठीशी.' नंदिनी मनातल्या मनात पुटपुटली.
***********************
त्या दिवशी संध्याकाळी पाहुण्यांकडे असताना नंदिनी सतत गौरीच्या आठवणींत हरवलेली होती. तिच्या डोळ्यांसमोर गौरीचा शांत चेहरा, तिचं संयमित बोलणं, आणि तिचं सततचं मागे राहून आधार देणं फिरत होतं.
अखेर तीन दिवसांनी नंदिनी आणि कार्तिक आपल्या घरी जायला निघाले. तो जो प्रवास होता, तो कधी एकदा संपतो आणि आपण घरी पोहोचतो असं नंदिनीला झालं होतं. घरी परत आल्यावर नंदिनीने गौरीला घट्ट मिठी मारली.
"अगं काय झालं?" नंदिनीने मिठी मारल्यामुळे गौरी गोंधळली होती.
"काही नाही ताई. सहजच!" नंदिनीने मिठी न सोडताच उत्तर दिलं.
गौरीच्या डोळ्यांत पाणी आलं. तिने तिच्या पाठीवर हलकासा हात फिरवला.
त्या क्षणाला नंदिनीच्या मनात एक गोष्ट स्पष्ट झाली होती, गौरी तिची नणंद होती, मात्र कधी तिच्या आईसारखी, तर कधी मोठ्या बहिणीसारखी जपणारी सावलीही होती.
क्रमशः