Login

संसारात नणंदेची भूमिका ( भाग ३ )

काही ठिकाणी नणंद वाईट असतात, पण सगळ्याच वाईट नसतात. आपल्या संसारात नणंदेची भूमिका कशी असावी? नणंद भावजयीचं नातं कसं असावं? हे वाचा एका लेखिकेच्या दृष्टिकोनातून. कथेचं नाव - संसारात नणंदेची भूमिका. लेखिका - सौ. जानकी नारायण कटक.

                   पावसाळ्याचे दिवस सुरू होते. अंगणात थोडंसं गारेगार वातावरण होतं. चहाच्या कपात साखर ढवळताना नंदिनी गौरीला खिडकीतून पाहत होती. गौरीच्या हातात एक जुनी वही होती. त्यात तिचे हात काहीतरी लिहित होते, तर डोळे ते मजकूर वाचत होते, पण चेहरा? नेहमीसारखाच शांत, संयमी.

"ताई, काय लिहित आहात?" नंदिनीने तिच्याजवळ येऊन हसत विचारलं.

"काही नाही गं. जुना सवंग शौक आहे. कविता जमायच्या कधीकाळी." गौरीने हसून उत्तर दिलं.

"ताई! खरंच का? मला दाखवा ना." नंदिनी उत्साहाने विचारलं.

"नको गं, तू हसशील." गौरीने तिला आपली वही दाखवण्याचं टाळलं.

"कधी हसले का मी तुमच्यावर?" नंदिनीने विचारलं.

गौरी थोडी हसली, पण काहीच न बोलता उठून आत गेली.

'गौरी ताईंमध्ये एक सर्जनशील स्त्री आहे, पण त्यांनी तिला कुठेतरी हरवून टाकलं आहे. स्वतःला मागे टाकून त्या फक्त घरासाठी जगत आल्या आहेत.' गौरी उठून निघून गेल्यानंतर नंदिनी तिला पाठमोरी पाहून मनातल्या मनात म्हणाली.

नंदिनीही आत गेली. दिवसभराची कामे शांततेत पार पडली. रात्री जेवण आटोपल्यानंतर नंदिनी नेहमीप्रमाणे गौरी जवळ जाऊन बसली. गौरी आत्ताही तिची वही घेऊन बसलेली होती.

"ताई, तुम्हाला जे आवडतं, कविता, वाचन, ते सगळं तुम्ही का थांबवलं?" नंदिनीने गौरीला विचारलं.

"घरात जबाबदाऱ्या वाढल्या. वेळ कमी पडला आणि हळूहळू सवय लागली स्वतःच्या गोष्टी मागे ठेवण्याची." गौरीने नेहमीप्रमाणे हसून सांगितलं.

"कधी कधी वाटायचं की कोणीतरी विचारावं, 'तुला काय व्हायचं आहे?’ पण, असो..." तिने मध्येच आपलं बोलणं थांबवलं. कदाचित तिला त्यावर जास्त बोलण्याची इच्छा नव्हती.

तेव्हा नंदिनीला प्रकर्षाने जाणवलं, गौरी एक अशी स्त्री होती, जिने स्वतःची स्वप्नं, आकांक्षा, भावना जपून ठेवल्या नव्हत्या, तर त्यागल्या होत्या. ते ही कुठल्याही गोंधळाशिवाय, कुठल्याही अपेक्षेविना.

नंदिनीसोबत बोलून गौरी तशीच निघून गेली, मात्र आपली वही सोफ्यावर विसरली होती. नंदिनीने ती वही चोरून वाचायला घेतली.

पहिल्या पानावर काही शब्द होते:

"हसणाऱ्या चेहऱ्यामागे काहिशा वेदना
थोडं थांबून तर पहा,
कितीतरी न सांगितलेल्या गोष्टी
मूकपणे सांगायचा प्रयत्न करते मी"

ते शब्द वाचून नंदिनी गलबलून गेली. तिला समजलं की गौरी ताई केवळ घर सांभाळणारी स्त्री नाही, ती एक कवी, विचारवंत, आणि सर्वात महत्त्वाचं... मन जपणारी स्त्री होती.

*************************

                  एके दिवशी घरातल्या छोट्या कार्यक्रमात नंदिनीने गौरीला उभं केलं. तिच्या या वागण्यामुळे गौरी गोंधळली होती. नंदिनीने गौरीच्या हातात वही दिली. ती वही पाहून तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभा राहिला.

"ही वही ताईंची आहे. त्या फक्त घरासाठी जगलेली बहीण किंवा मुलगी नाहीत, तर एक उत्तम कवयित्रीही आहेत." नंदिनी सर्वांकडे पाहून म्हणाली. तिचं बोलणं ऐकून गौरीच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

"खरं आहे, गौरी घराकडे लक्ष देता देता स्वतःला पूर्णपणे विसरून गेली आहे. तिने स्वतःची स्वप्ने झटकली, पण कधीच घराची जबाबदारी झटकली नाही." वनमाला आपले डोळे पुसत म्हणाल्या.

कार्यक्रम छान पार पडला. नंदिनीच्या हट्टामुळे गौरीने आपल्या दोन तीन कविताही ऐकवल्या. सर्वांना त्या खूप आवडल्या. टाळ्यांच्या गजराने तिच्या लेखणीचं कौतुक झालं. गौरीलाही आनंद झाला होता.

त्या रात्री नंदिनी आणि गौरी दोघीही गच्चीवर बसल्या होत्या. हा त्यांचा नित्यक्रम झाला होता. रात्री जेवण झाल्यानंतर थोडा वेळ का होईना दोघी गच्चीवर जाऊन बसत होत्या. चंद्रप्रकाशात गौरीचा चेहरा आज आणखीनच तेजस्वी वाटत होता.

"ताई, एवढं कौशल्य आहे तुमच्याकडे. तुम्ही का हरवलात स्वतःला?" नंदिनीने विचारलं, त्यावर गौरी हसली.

"हरवले नाही गं, मी फक्त सावली झाले. सावली कधी स्वतःला दाखवत नाही, पण कोणी तिला साद घातली, की ती मागे उभी असते. आपल्या पूर्ण अस्तित्वासह." गौरीने हसून उत्तर दिलं.

त्या क्षणी नंदिनीच्या मनात एक विचार उमटला, ताई म्हणजे केवळ एक नणंद नाही, ती एक पूर्ण माणूस आहे. जिच्यातली स्त्री, कवी, सखी, सगळ्या बाजू आज एकत्र दिसल्या.