Login

संसारात नणंदेची भूमिका ( भाग ४ )

काही ठिकाणी नणंद वाईट असतात, पण सगळ्याच वाईट नसतात. आपल्या संसारात नणंदेची भूमिका कशी असावी? नणंद भावजयीचं नातं कसं असावं? हे वाचा एका लेखिकेच्या दृष्टिकोनातून. कथेचं नाव - संसारात नणंदेची भूमिका. लेखिका - सौ. जानकी नारायण कटक.

                    दिवस पुढे सरत होते. नंदिनी आता घरात रमली होती. तिच्या मनात एक नवीन भान जागं झालं होतं. नात्यांच्या खोलतेचं, स्त्रीत्वाच्या अस्तित्वाचं, आणि गौरीच्या मूक, पण प्रभावी जीवनशैलीचं. एक दिवस नंदिनीने जेवणानंतर गौरीच्या मांडीवर डोकं ठेवलं. तिचं वागणं लहान मुलीसारखं होतं. ते पाहून गौरी गालात हसली.

"ताई, एक विचारू?" नंदिनीने विचारलं.

"हो गं, विचार ना." गौरीने हसून प्रतिसाद दिला.

"ताई, मी तुमच्यासारखी होईन का? म्हणजे, एवढं समजूतदार, न बोलता समजून घेणारी, कोणाचीही तक्रार न करणारी." नंदिनीने तिचा प्रश्न विचारला. गौरीला तिचं हसूच आलं.

"अगं वेडाबाई, मी काही परीकथा नाही. मी सुध्दा रडलेय, चिडलेय, पण कुठेतरी एका वळणावर मनाला सांगितलं, समजून घ्यायचं म्हणजे नातं टिकतं आणि अपेक्षा कमी केल्या की मन जास्त समाधानात राहतं." नंदिनीला तिच्या उत्तराचं कौतुक वाटलं. तिने तिचे हे शब्द कायम लक्षात ठेवायचे असं ठरवलं.

**************************

एकदा अचानक वनमाला यांची तब्येत थोडी बिघडली. कार्तिक ऑफिसला गेला होता. तो घरी नसल्यामुळे सगळी गडबड झाली. नंदिनीचे पाय थरथरत होते. काय करावं काय नाही सुचत नव्हतं. तेव्हा गौरी पुढे आली. फार काही न बोलता तिने आईला स्वतःच्या स्कूटीवर बसवलं. नंदिनीला एक लहानशी स्माईल दिली, आणि फक्त इतकंच म्हणाली, "घाबरू नको. मी आहे ना."

तिच्या त्या शब्दांनी नंदिनीला धीर आला. तीही रिक्षाने त्यांच्यामागे निघाली. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर वनमाला यांच्यावर उपचार झाले. काळजी करण्यासारखं काही कारण नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्याची परवानगी दिली.

दुपारी घरी परतताना नंदिनी गौरीकडे पाहत राहिली. गौरीचा चेहरा थोडासा थकलेला होता, पण डोळ्यांत एक वेगळंच सामर्थ्य होतं, जणू कोणाचंही दुखणं शांत करण्याची ताकद तिच्यात होती.

घरी परतल्यावर नंदिनी एकटीच स्वयंपाक करत होती. गौरी तिच्या खोलीत विश्रांती घेत होती. स्वयंपाक करतानाही नंदिनी फक्त गौरीचा विचार करत होती.


***********************

                    काही दिवसांनी नंदिनीच्या आई-वडिलांची लग्नाची पंचवीस वर्षे पूर्ण होणार होती. त्यासाठी छोटीशी पार्टी ठेवली होती. ती घरी जाण्याची तयारी करत होती. तिचं आवरत होती तेव्हाच गौरी तिच्या खोलीत आली.

"गिफ्ट काय घेणार आहेस?" गौरीने सहजच विचारलं.

"मला वाटतं, मी त्यांच्यासाठी एक कविता लिहावी. तुमच्या वहीतली एक कविता मी थोडी बदलून त्यांना देऊ का?" नंदिनीने दबकतच विचारलं.

"माझी कविता…?" गौरीने तिच्या डोळ्यात आश्चर्याने पाहिलं. नंतर तिने मान हलवून होकार दिला, ज्यामुळे नंदिनी खूप खुश झाली.

"धन्यवाद ताई, आणि कविता वाचल्यानंतर शेवटी असं सांगेन, 'ही कविता माझ्या नणंदेच्या जीवनावरून प्रेरित आहे, कारण माझ्या सासरी मला एक अशी सावली मिळाली, जिने मला पावलोपावली बळ दिलं."

गौरीच्या डोळ्यांत पाणी आलं. ती काहीच बोलली नाही, पण त्या शांत मौनात जितकी आर्त भावना होती, तितकी शब्दांत सांगता आली नसती.

नंदिनीने तेव्हाच मनाशी एक संकल्प केला,
'मी तुमच्यासारखी होईन ताई, पण तुमच्या सावलीत हरवून नाही, तुमच्या प्रकाशात स्वतःला उभं करून.'


***************************


                      नंदिनीच्या माहेरी कार्यक्रम फारच सुंदर पार पडला. ती कविता, जी गौरीच्या वहीतून जन्मली होती, थोडीशी नंदिनीच्या भावनांनी व्यापलेली होती. जेव्हा तिने वाचली, सगळ्यांच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं.

"हे शब्द तुझं मन सांगत आहे, पण त्यामागे कोणीतरी आहे. कोण आहे ती सावली?" नंदिनीच्या आईने विचारलं.

"माझी नणंद, गौरी." नंदिनीने हसून उत्तर दिलं.

"वा! फारच सुंदर कविता लिहिली आहे." तिच्या वडिलांनीही गौरीचं कौतुक केलं.

"धन्यवाद आई बाबा!" तिने त्यांचे आभार मानले.

नंदिनी तिच्या माहेरी एकटीच आली होती. घरच्यांना येण्यासाठी तिने विनंती केली होती, पण त्या सर्वांनी 'तू जाऊन ये' म्हणत फक्त तिलाच जायला सांगितलं होतं.

तिथे तिने खरंच गौरीची एक अप्रतिम लिहिलेली कविता त्यांना भेट म्हणून दिली. त्यांनाही ती कविता खूप आवडली होती. त्याच दिवशी ती माघारी आली होती.


****************************

घरी परतल्यावर काही दिवसांनी नंदिनीने गौरीसाठी एक छोटं सरप्राईज ठेवलेलं होतं. गौरीच्या जुन्या वहीवर आधारित एक छोटं हस्तलिखित पुस्तक तयार करून छापून घेतलं होतं. "सावलीचे शब्द" या शीर्षकाखाली तिच्या निवडक कविता.

गौरीचे ते पुस्तक उघडताना हात थरथरले. पानं चाळताना तिच्या प्रत्येक ओळीतून जुनं आयुष्य पुन्हा जगल्यासारखं वाटलं.

शेवटी एक छोटा परिचय होता –

"गौरी – एक अशी स्त्री, जिने स्वतःला मागे ठेवून इतरांचं आयुष्य जपलं. पण ती केवळ सावली नव्हती, ती शब्दांची, भावनांची आणि आधाराची प्रकाशरेषा होती."

हे मजकूर वाचून गौरीचे डोळे भरून आले होते. घरच्यांनीही ते पुस्तक वाचलं तर त्यांनाही भरून आलं होतं. आपली मुलगी, आपली बहीण त्या कवितांतून त्यांना नव्याने उमगली होती.

त्या दिवशी गौरी फारसं काही बोलली नव्हती, पण तिने नंदिनीला फक्त एक विचारलं,
"माझं अस्तित्व शब्दांत बसवलंस. आता मला हरवायचं नाही वाटतं तुला. का?"

"कारण आता तुम्ही सावली नाही ताई, तुम्ही प्रकाश झाला आहात. माझ्यासाठी, या घरासाठी, आणि तुमच्यासाठी देखील."