वृंदाने केलेल्या प्लॅनमध्ये फायनली अमित तिची साथ द्यायला तयार झाला. दुसऱ्याच दिवशी तो कामाला लागला. रोहन घरी नसताना अस्मीला त्याने कॉल केला. परिस्थितीचा अंदाज घेत त्याने काही प्रश्न केले तिला. गोड बोलून तिला बोलते केले.
"वहिनी, आजकाल रोहन आणि तुमच्यात काही बिनसलंय का हो?" थोडं इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर अमित डायरेक्ट मूळ मुद्द्यावरच आला.
"पण भाऊजी तुम्ही का विचारत आहात मला हे? तुमच्या मित्रालाच जाऊन विचारा ना. तसंही बायकोच कशी चुकीची आहे हे एव्हाना त्याने तुम्हाला सांगितले असेलच. कारण जिगरी दोस्त ना तुम्ही एकमेकांचे, मग पोटात थोडीच काही ठेवणार आहात." तावातावाने अस्मी बोलत होती."
"तसे नाही वहिनी, ॲक्चूअली तो बोलला मला पण त्याचेही वागणे मला योग्य वाटत नाही, पण हे मी त्याला नाही बोलू शकत; म्हणून मग तुमच्याशी बोलावं म्हटलं. कारण तुम्हालाही त्याच्या या वागण्याचा त्रासच होत असणार याची कल्पना आहे ओ मला."
"थँक्यू भाऊजी, निदान तुम्ही तरी मला समजून घेतले हो. रोहनने कधीच माझे मन जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही. घरी आलं की सारखं त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसायचं. मैत्रिणींसोबत तासनतास चॅटिंग करत बसायचं. खूप राग येतो मला त्याचा. पण नाईलाज होतो माझा. काही बोललं की मीच पुन्हा चुकीची दिसते.
"ऐका ना वहिनी आपण नंतर बोलुयात, एक अर्जंट फोन येतोय मला."
"बरं बरं काही हरकत नाही. आपण उद्या बोलू. पण चालेल ना तुम्हाला. काही प्रॉब्लेम नाही ना तुम्ही माझ्याशी बोलला तर?"
"नाही ओ प्रॉब्लेम का असेल मला?"
"तुम्हाला नाही ओ तुमच्या बायकोला समजलं तर ती गैरसमज तर करून घेणार नाही ना?"
"नाही ओ...तशी खूप समजूतदार आहे ती आणि मी तुमच्याशी बोलतोय हे मी थोडीच तिला सांगणार आहे."
"हो ते तर आहेच पण चुकून समजू नये म्हणजे झालं."
"नाही समजणार. पण तुम्हीही रोहनला काही बोलू नका."
"नाही ओ मी कशाला त्याला काही सांगेल."
"बरं वहिनी, ठेवतो मी. बोलू नंतर."
वृंदाचा प्लॅन एकाच दिवसांत वर्क झाला. अस्मीला देखील तिला समजून घेणारं कोणीतरी भेटलं होतं. त्यामुळे तिचे रोहनकडे दुर्लक्ष होत होते. गेले आठ दिवस झाले तिचे आणि रोहनचे त्यामुळे भांडण झालेच नाही. त्याच्यासाठीही हे थोडे सरप्रायजिंग होते. पण नेमकं असं झालं तरी काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू झाले. ही नक्की बदलली की वादळापूर्वीची ही शांतता आहे हे रोहनला देखील समजेना.
एक दिवस रोहनला घरी बोलावून त्याला विश्वासात घेऊन अमित, वृंदा आणि दिव्याने सर्वकाही त्याला सांगून टाकले.
'हे बघ रोहन, तुझा त्रास आम्हाला बघवत नव्हता. तुझ्याशी बोलून हे केलं असतं पण तू या गोष्टीला कधीच परवानगी दिली नसती. आम्हाला तुझं आणि अस्मी वहिनीचं नातं बहरलेलं पाहायचं आहे. म्हणून हे सर्व करावं लागलं. दुसरा कोणताच पर्याय नव्हता आमच्याकडे आणि आम्ही डायरेक्ट तुझी बाजू घेऊन त्यांच्याशी नाही बोलू शकत. त्यामुळे गोष्टी अजून बिघडतील म्हणून हे असं वागावं लागतंय आपल्याला."
"तुम्हाला काय वाटतं हे सगळं करून ती बदलेल?"
"नक्की बदलेल. फक्त आता पुढच्या गोष्टी तू बरोबर हॅण्डल कर. वहिनीला जाऊन तू आज जाब विचारायचास, अमितचं आणि तुझं नेमकं काय सुरू आहे? अमितच्या मोबाईलमध्ये मी तुमच्या दोघांचे चॅटिंग वाचले. तेही माझ्याबद्दल होते. आता मी काय अर्थ घ्यायचा याचा? म्हणजे मी जर एखाद्या मुलीशी बोललं तर मी चुकीचा आणि हेच जेव्हा तू करतेस तेव्हा तू कशी काय बरोबर असतेस? हे स्पष्ट विचार तिला. काय होतंय पुढे पाहू तर आपण. मला खात्री आहे जे होईल ते चांगलंच होईल." वृंदा बोलली.
"होप सो, तुमच्या प्रयत्नांना यश येवू दे." रोहन म्हणाला.
रात्री वेदा झोपल्यावर त्याने अस्मीजवळ विषय घेतला. अचानक आलेल्या रोहनच्या प्रश्नावर काय बोलावे ते तिला समजेना. कारण ह्यावेळी ती स्वतः त्याच चुका करत होती. ज्या तिला रोहन कडून अपेक्षित नव्हत्या.
"उगीच तू माझ्यावर आरोप करु नकोस रोहन. माझ्यावर नाही निदान तुझ्या मित्रावर तरी विश्वास ठेव." बोलताना अस्मीचा गोंधळ उडत होता.
"मित्रावर विश्वास आहेच गं. अमित, दिव्या, वृंदा सर्वांवर सारखाच विश्वास आहे माझा. कारण आमची मैत्री काय आहे ते फक्त आम्हालाच माहिती आहे. तिथे कधीच कोणत्या संशयाला जागा नसते. जे आहे ते एकदम स्वच्छ आहे, पण तुला ते कधी समजलंच नाही याचं वाईट वाटतंय."
"हे बघ रोहन तू खरंच गैरसमज करून घेतलाय, मान्य आहे मी अमित भाऊजींसोबत बोलते पण त्याची कारणं तुला माहितीयेत. मी तुझ्याच मित्राशी बोलले, ना की इतर कोणाशी. अरे थोडा तरी विश्वास ठेव माझ्यावर."
"आता मी विश्वास ठेवायचा? एक वेळ हाच विश्वास मी मागत होतो तुझ्याकडे तेव्हा दिलास का गं? तेव्हा फक्त संशय संशय आणि फक्त संशय भरला होता तुझ्या डोक्यात. ह्याच संशयामुळे किती आणि काय काय चुका केल्यास तू आजवर हे आठव एकदा."
"खरंच तू समजतोस तसं काही नाहीये रे. हवंतर तू अमित भाऊजींना विचार." अस्मी तिची बाजू समजावत होती.
"तो मुद्दाच नाहीये अस्मी, तू कोणाशी बोलावं हा तुझा प्रश्न आहे, पण मी कुणाशी बोलायचं हा सुद्धा तुझाच प्रश्न असेल तर मग ते कसं काय बरोबर असतं गं? तुम्ही करता ती फक्त मैत्री आणि मी करतो ते अफेयर.
आता तरी समजलं का एका मुलीमध्ये आणि मुलामध्ये मैत्रीचं निखळ नातं असू शकतं. फक्त एकमेकांशी बोललं म्हणून त्यांच्यात काहीतरी वेगळंच सुरू आहे असा अर्थ होत नाही त्याचा. तू तशी वागली म्हणून मी तुझ्या आणि अमितच्या नात्याबद्दल कधीच वेगळ्या नजरेने पाहणार नाही. अगं हेच मैत्रीचं नातं आपल्या दोघांत निर्माण व्हावं यासाठी गेले चार वर्ष मी धडपडतोय, पण तू काय केलंस? फक्त संशय घेत राहिलीस माझ्यावर. अगं तुझ्यासाठी मी आई बाबांना सुद्धा सोडलं. आज ना उद्या तुला तुझी चूक समजेल या आशेने आजपर्यंत गप्प बसलो. जर नवरा बायकोच्या नात्यात तो आपलेपणा, मोकळेपणा असेल ना तर आपसातले प्रॉब्लेम आपसांत मिटू शकतात ना की ते असे चार चौघांशी शेअर करण्याची गरज पडते."
आता तरी समजलं का एका मुलीमध्ये आणि मुलामध्ये मैत्रीचं निखळ नातं असू शकतं. फक्त एकमेकांशी बोललं म्हणून त्यांच्यात काहीतरी वेगळंच सुरू आहे असा अर्थ होत नाही त्याचा. तू तशी वागली म्हणून मी तुझ्या आणि अमितच्या नात्याबद्दल कधीच वेगळ्या नजरेने पाहणार नाही. अगं हेच मैत्रीचं नातं आपल्या दोघांत निर्माण व्हावं यासाठी गेले चार वर्ष मी धडपडतोय, पण तू काय केलंस? फक्त संशय घेत राहिलीस माझ्यावर. अगं तुझ्यासाठी मी आई बाबांना सुद्धा सोडलं. आज ना उद्या तुला तुझी चूक समजेल या आशेने आजपर्यंत गप्प बसलो. जर नवरा बायकोच्या नात्यात तो आपलेपणा, मोकळेपणा असेल ना तर आपसातले प्रॉब्लेम आपसांत मिटू शकतात ना की ते असे चार चौघांशी शेअर करण्याची गरज पडते."
रोहनच्या बोलण्याचा आज पहिल्यांदा अस्मीवर काहीतरी परिमाण झाल्यासारखा वाटत होता. आज पहिल्यांदा तिला रोहनचे म्हणणे पटले होते हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. कदाचित ती चुकली नसती तर तिला याची कधीच जाणीव झाली नसती. हे सगळे वृंदाच्या सुपीक डोक्यामुळे शक्य झाले होते, हेही तितकेच खरे."
"खूप वेळ घालवला आपण अस्मी, निदान आतातरी शहाणे होऊयात गं. माझे काही चुकले तर तू हक्काने मला सांग, पण येता जाता संशय घेत जाऊ नको. हा संशयच आपलं घर उध्वस्त करेल अस्मी. विचार कर थोडा. आपल्या वेदासमोर आपण हाच आदर्श ठेवणार आहोत का? सतत भांडणं, चिडचिड, आदळआपट यामुळे तिच्यावर काय परिणाम होईल याचा आपण दोघांनी मिळून विचार करायला हवा ना."
"सॉरी रोहन. खरंच मी चुकले. पण तूही हे असं याआधी एकदा तरी प्रेमाने समजावलं का रे मला?"
"कसं समजावू मी तुला? कारण तुला ते कधी समजून घ्यायचंच नसायचं. शांततेत कधी बोललीस माझ्याशी? सतत आरडाओरडा, आदळआपट होत असेल तर बोलायची इच्छा तरी होईल का माणसाची?"
"सॉरी."
"असू दे, मी पण सॉरी." म्हणत दोघेही एकमेकांच्या मिठीत अलगद विरघळले. त्या दिवसानंतर दोघांचे नाते खऱ्या अर्थाने फुलले. बरेच गैरसमज आपसांत बोलून मिटवले दोघांनी.
पण आजही आई बाबांपासून आपण वेगळे झाल्याची सल रोहनच्या मनाला वेदना देत होती. एक दिवस धाडस करून रोहन अस्मीसोबत बोलला.
"हे बघ रोहन मला काही प्रॉब्लेम नाही, पण मी पुन्हा तिकडे जाणार नाहीं हवंतर आई बाबांनाच तू इकडे घेऊन ये. माझी काही हरकत नाही."
'चला हेही काही कमी नाही.' म्हणत रोहन आई बाबांसोबत बोलला. पण पुन्हा सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती होवू नये म्हणून आई बाबांनी मधला मार्ग शोधला.
"कायमचं नाही आम्ही तिकडे येवू शकत. पण तुमची किंवा आमची काही अडचण असेल तेव्हा नक्की आपण एकमेकांच्या पाठीशी हक्काने उभे राहू. सणवार तसेच इतर आनंदाच्या प्रसंगी कधी तुम्ही आमच्याकडे या, कधी आम्ही तुमच्याकडे येवू. असे केले तर दूर राहून नाते छान होईल. एकाच घरात राहून भांड्याला भांडं लागण्यापेक्षा हे असं केलेलं बरं." बाबांनी त्यांचे मत स्पष्ट शब्दांत सांगितले.
"आई बाबा जमल्यास मला माफ करा. खूप उशीर झाला हे सगळं समजायला. पण तुम्ही चला ना तिकडे. ज्या चुका झाल्या त्या पुन्हा नाही होणार." अस्मी म्हणाली.
"तुझ्यावर राग नाही गं बाळा. मुलं कुठे का असेनात फक्त ती आनंदात असतील तर मग आई बापासाठी याहून मोठा आनंद असूच शकत नाही. आम्ही आहोत की इथेच. आमचं उभं आयुष्य या घरात गेलं त्यामुळे ही जागा नाही सोडू वाटत. तुम्ही हवं तेव्हा या ना इकडे. आम्ही अधूनमधून येत जाऊ तिकडे. कुठे लांब आहोत आपण."
आई बाबांनी खूप समजावले तेव्हा कुठे रोहन आणि अस्मीला त्यांच्या भावना समजल्या. पण बोलून बऱ्याच गोष्टी आज सॉर्ट आऊट झाल्या हे मात्र तितकंच खरं.
हे सगळं शक्य झालं ते फक्त अमित, वृंदा आणि दिव्यामुळे. तिघांनी मिळून आज रोहन आणि अस्मीचा संसारच नाही तर त्यांचे आयुष्य वाचवले होते. खरंच आयुष्यात असे मित्र सोबत असतील तर मग कितीही मोठे संकट पुढ्यात येवून उभे राहिले तरी त्यातून नक्कीच मार्ग सापडतो. फक्त प्रत्येक नातं हे स्वच्छ असावं, त्यात संशयाला मात्र अजिबात जागा नसावी.
समाप्त
(सर्व वाचकांना नम्र विनंती, कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. चुकूनही ह्या कथेचा वापर यू ट्यूब वरील व्हिडिओसाठी किंवा अन्य ठिकाणी कुठेही करू नये. अन्यथा कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागेल.)
©®कविता वायकर
