"गुड मॉर्निंग रोहन." हातातील बॅग टेबलवर सरकवत अमित बोलला, पण शून्यात नजर लावून एकटक लॅपटॉपकडे बघत रोहन वेगळ्याच विचारांत हरवला होता.
'कसं समजावू मी अस्मीला. दिव्या माझी फक्त मैत्रीण आहे यार. अस्मी उगीच नको तो अर्थ घेत आहे आमच्या नात्याबद्दल.'
रोहन विचारांच्या गर्तेत खोलवर हरवला होता. अमित त्याच्याशी बोलला पण त्याचे अजिबात लक्ष नव्हते त्याच्या बोलण्याकडे.
"रोहन..रोहन.. अरे कुठे हरवलास रोहन?" रोहनचे लक्ष नाही हे पाहून अमितने त्याच्या खांद्याला धक्का देत विचारले.
"अमित...अरे आलास तू. बोल ना काय म्हणतोस?"
"कुठे लक्ष आहे रे तुझे? नेमकं काय सुरू आहे तुझ्या डोक्यात?"
"कुठे काय? काहीच तर नाही. तू बोल ना." चेहऱ्यावर जबरदस्तीचे हसू आणत रोहन बोलला.
"घरी काही टेन्शन आहे का? तसे काही असेल तर सांगून टाक. की पुन्हा एकदा भांडलास की काय वहिनीसोबत?" अमितने अंदाज घेत विचारले.
"जाऊ दे रे, नकोच तो विषय." थोड्या त्रासिक सुरात रोहन उत्तरला.
"याचा अर्थ नक्कीच काहीतरी झालंय. भांडण झालं ना वहिनीचं आणि तुझं?"
"अमित यार... सोड ना तो विषय. मला नाही बोलायचं काही." विषय टाळण्याचा प्रयत्न करत रोहन बोलला.
"विश्वास आहे ना माझ्यावर? मला जर खरा मित्र मानत असशील तर सांगशील." अमित म्हणाला.
"बस का यार. पण तुला सांगून परीस्थिती थोडीच ना बदलणार आहे. त्यापेक्षा नकोच आणि उगीच माझ्यावर तुझा वेळ असा नको खर्च करत जाऊ. त्याने काहीच साध्य होणार नाहीये. माझ्या नशिबात जे आहे ते मलाच भोगायचे आहे."
खूप प्रयत्न करूनही रोहन काही सांगायलाच तयार नव्हता. पण अमित देखील मग अशी सहजासहजी माघार घेणाऱ्यातला नव्हता. त्यात दोघेही अगदी हायस्कूल पासूनचे मित्र. सर्व गोष्टी एकमेकांशी शेअर केल्याशिवाय त्यांचा दिवस सरायचा नाही. पण आता रोहनच्या बाबतीत परीस्थिती खूपच बदलली होती. अमितला याचा अंदाज होता. म्हणूनच तोही रोहनला बोलते करण्यासाठी प्रयत्न करतच राहिला.
अमित पुढे म्हणाला, "मग मित्र कशासाठी असतो रोहन. एकमेकांच्या सुख दुःखात आपणच एकमेकांना साथ द्यायला हवी ना. चल बोल पटकन."
"सगळं मान्य आहे रे, पण खरं सांगू अमित...आजकाल ना इच्छाच नाही होत कोणाशी काही बोलायची. कोणाला काही सांगावं असं वाटतच नाही."
"हे बघ मनात दाबून ठेवलं की आतल्या आत घुसमट होते रे. वेळीच मन मोकळं कर. चल कॉफी घेवूयात? अजून वेळ आहे तोपर्यंत जाऊन येवू."
"नाही रे नको. मला ना दूर कुठेतरी निघून जावंसं वाटतंय. एकदम शांत ठिकाणी एकटंच जाऊन बसावंसं वाटतंय. आजूबाजूला कोणाची लुडबुड नाही की कोणतेही बंधन नाही."
"काहीही बोलू नकोस हा रोहन. तू चल बरं आपण कॉफी घेऊयात बरं वाटेल तुला."
अमित आणि रोहन मग कॅन्टीनमध्ये कॉफी घेण्यासाठी गेले.
"दादा दोन कॉफी." म्हणत अमितने ऑर्डर दिली.
"बोल ह्यावेळी काय विषय होता भांडणाचा?"
"डोकं हँग झालयं बघ अमित. ऑफिस सुटल्यावर घरी जायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो. आज मॅडमचा मुड कसा असेल? आज कोणते नवीन आरोप होणार माझ्यावर? ह्या अशा विचारांनीच मनात धडकी भरते."
"म्हणजे वहिनी तुझ्यावर संशय घेतात? याआधी कधी बोलला नाहीस यार तू?"
"कोणत्या तोंडाने सांगू यार तुला? तूही मला चुकीचे ठरवतो की काय याची भीती वाटत होती. म्हणून नाही बोललो कधी."
"तू तुझाच सगळं ठरवून मोकळा झालास? एकदा तरी कल्पना देतोस मला. बरं जाऊ दे पुढे सांग. नेमकं संशय घेतात पण कोणावरुन?"
"ते तर आता रोजचंच झालंय बघ. तिला तर वाटतं मी लफडी करण्यासाठीच बाहेर जातो. मोबाईलमध्ये काहीही काम करत असलो तरी मी सतत पोरींसोबतच बोलत असतो, हा तिचा समज काही केल्या दूर होतंच नाही. आता हिला माझ्याशी सरळ बोलताच येत नाही, मग मी आपला घरी गेल्यावर बसतो मोबाईल घेऊन. पण नाही, तिथेही निव्वळ संशय. मी कसाही वागलो ना अमित, तरी तिला फॉल्टच दिसतात माझ्यात. मी थकलो यार स्पष्टीकरण देवून देवून. आजकाल एकही दिवस न भांडता जात नाही आमचा. हिला पटत नाही म्हणून मी माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे कॉन्टॅक्ट नंबर डिलीट केले. मान्य आहे कॉलेजपासूनच माझा थोडा फ्री स्वभाव होता. मुलींची खेचायला आवडायचं मला. आपल्यामुळे कोणीतरी हसतंय याचे खूप कौतुक वाटायचे, पण हिला आवडत नाही म्हणून मी स्वतःला बदललं तरीही मीच चुकीचा. कधी कधी तर हे आयुष्यच नको वाटतं बघ."
"गप्प बस, असं काहीही बोलू नकोस. पण मला एक सांग, एवढं सगळं करूनही आता त्या कोणाबद्दल संशय घेत आहेत?म्हणजे तुला कोणाशी काही बोलताना त्यांनी ऐकलं का?"
"अरे काही दिवसांपूर्वी तिने माझे आणि दिव्याचे चॅटिंग वाचले होते. तोच मुद्दा पकडून तिला आजही भांडायचे असते माझ्यासोबत. वादाचे कारण काहीही असले तरी फिरून फिरून ती त्याच मुद्द्यावर येवून थांबते. कंटाळा आलाय यार. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि लग्न केलं असं झालंय."
"असं काही नसतं रे, पण दिव्याबद्दल असं कसं वाटू शकतं त्यांना? त्या चॅटिंगमध्ये काही वेगळं होतं का? म्हणजे वहिनीला राग येईल किंवा संशय येईल असं."
"काहीच नाही रे. दिव्याचा मेसेज होता, तू कसा आहेस? तब्बेत ठीक आहे का आता? काळजी घे वगैरे वगैरे. त्याआधी आठ दिवसांपूर्वी माझी तब्येत ठीक नव्हती हे मी दिव्याला बोललो होतो म्हणून तिने विचारले. मीही मग रिप्लाय दिला त्यावर, मी ठीक आहे आता. तू कशी आहेस? तूही काळजी घे वगैरे. याव्यतिरिक्त काहीही नाही. नेमकं अस्मीने ते मेसेजेस वाचले."
"अरे देवा! पण ते अगदी नॉर्मल आहे रे. आपण अगदी सहज असं बोलतो एकमेकांना. आपण सगळे किती छान मित्र आहोत हे माहितीये वहिनींना, तरी हे असं बोलावं त्यांनी."
"तेच तर पटत नाही मला. म्हटलं, बाई तसं काही नाहीये. तर म्हणते एक मुलगा मुलगी यांच्यात फक्त मैत्री असूच शकत नाही. म्हणजे तिच्या म्हणण्यानुसार कोणताही पुरुष आणि स्त्री एकमेकांशी हसून खेळून तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांच्यात काहीतरी वेगळं नातं असतं. म्हणजे मैत्रीच्या नात्याला तिच्या लेखी शून्य किंमत आहे. काय बोलू आता यावर?"
हे सर्व ऐकून अमितही क्षणभर विचारांत पडला.
"बरं ठीक आहे, निघेल काहीतरी मार्ग. तू टेन्शन घेऊ नकोस आणि हो, जे काही असेल ते वेळच्या वेळी सांगत चल रे बाबा. असं एकटाच कुढत बसू नकोस. मग काय अर्थ आहे आपल्या मैत्रीला?"
फायनली अमितने रोहनला बोलते केलेच. पण आता पुढे काय? जाणून घेऊयात पुढील भागात.
क्रमशः
©®कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा