संध्याकाळी अमित घरी यायच्या आधीच दिव्या त्याच्या घरी आली होती. एव्हाना वृंदाला घडलेला सर्व प्रकार दिव्याकडून समजला होता.
"मला अंदाज होताच तुला दम नाही पडणार आणि तू आज घरी येणार." हातातील बॅग टेबलवर ठेवत हसतच अमित दिव्याला म्हणाला.
"काय करू मग मी? एकतर माझं सकाळपासून डोकं ठिकाणावर नाही. कशातच लक्ष लागेना. वृंदाचा फोन आला आणि म्हटलं फोनवर नाही बोलत मीच येते तिकडे."
"पण बरं झालं आलीस गं. मुलं पण किती छान खेळत आहेत बघ. इतक्या दिवसांनी भेटल्यामुळे आज आपल्याला काही त्रास पण देत नाहीत. खूप फ्रेश झालेत दोघेही बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटून आणि आपणही." वृंदा म्हणाली.
"अगं मी देवला आणणारच नव्हते. त्याला अनिकेत सोबत कंपनीत पाठवणार होते आज. पण अनिकेतला नेमकी अर्जंट मीटिंग आली मग तो घाईतच निघून गेला दुपारी. म्हणून मग दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे."
"बरं झालं आणलंस गं त्याला नाहीतर आमच्या अन्वीने चर्चेत व्यत्यय आणला असता. आलोच मी फ्रेश होऊन. तोपर्यंत वृंदा छान आल्याचा चहा टाक ना. आज खूप थकल्यासारखं झालंय." म्हणत अमित फ्रेश व्हायला गेला.
पाचच मिनिटात अमित फ्रेश होवून आला.
"मग अजून काय काय म्हणाली अस्मी वहिनी?" हातातील टॉवेल वृंदाच्या हातात देत खोचकपणे अमितने दिव्याला विचारले.
"हे काय? तुझा टॉवेल तू टाक सुकायला. माझ्याकडे काय देतोस? आज मैत्रीण आली तर काय बाबा भावच वाढले लोकांचे." खोचकपणे वृंदा बोलली.
"आण बाबा मी माझा टाकतो आणि हवंतर चहा पण टाकतो आपल्या सगळ्यांसाठी. तसंही आज दिव्या आली तर तुझं लक्ष नाहीये माझ्याकडे." पुन्हा वृंदाच्या हातातील टॉवेल घेत अमित बोलला.
"राहू दे आता, दिलाच आहे हातात तर आता टाकते मी सुकायला. बसा तुम्ही बोलत आणि मी चहा पण टाकते." हसतच वृंदा बोलली आणि टॉवेल सुकायला टाकून ती किचन मध्ये गेली.
"हे असं असतं तुम्हा बायकांचं. बरं जाऊ दे आमचं हे रोजच सुरू असतं. काय म्हणालो मी तुला... अजून काय काय म्हणाली अस्मि वहिनी. तिने तुला झापलं यावर खरंच विश्वास बसत नाही गं."
"मंद आहे रे ती. चुकून जर माझ्या समोर आली ना आई शपथ तिच्या दोन टेकवेल मी. स्वतःला कंट्रोल करुच शकणार नाही मी. वहिनी असेल ती तुझी. मी तर आता ते पण म्हणणार नाही."
"असं काही करु नकोस बाई. आपल्या रोहनचा तरी विचार कर."
"काय विचार करू त्याचा? त्याची बायको जर मला फोन करून एवढं ऐकवू शकते, मग ती त्याची काय अवस्था करत असेल याचा अंदाज येतोच ना अमित."
"तेच तर मी तुला सांगणार आहे. खूप टेन्शनमध्ये आहे गं रोहन."
"बरं तुला काय सांगितले त्याने?" दिव्याने प्रश्न केला.
"अगं हे सगळं त्यांच्या लग्नापासूनच सुरू आहे. पण ह्या पठ्ठ्याने ह्या कानाची खबर त्या कानाला कळू दिली नाही."
"माझ्याशी अधूनमधून बोलायचा तेव्हा वाटायचं बरं का मला की का काहीतरी टेन्शन मध्ये आहे. विचारलं की काही नाही म्हणायचा आणि लगेच विषय बदलून मोकळा व्ह्ययचा."
"अगं ती फक्त तुझ्या बाबतीत त्याच्यावर संशय घेते असं नाही, तो मुद्दा तर अलीकडचा आहे. तो कोणाशीही बोलला तरी हिला ते पटत नाही. त्याने सगळ्या मुलींचे कॉन्टॅक्ट नंबर डिलीट केले, उगीच वाद नको म्हणून. पावलापावलावर त्याच्यावर ती संशय घेते."
"अवघड आहे बाबा सगळं." चहाचा ट्रे टीपॉयवर ठेवत वृंदा बोलली. मुलांना खायला देवून ती चहा घेऊन हॉलमध्ये आली.
"घ्या...आधी गरमागरम चहा घ्या बरं." वृंदाने दोघांनाही मग चहा दिला.
"संसारात सगळं काही ठीक आहे पण हा 'संशय' का एकदा नात्यात घुसला की मग संपूर्ण संसाराची वाताहत होते यार. हे कसं कळत नाही काही लोकांना तेच समजत नाही. कुठलीही शहानिशा न करता डायरेक्ट असे आरोप करणं म्हणजे स्वतःहून स्वतःचंच नुकसान करून घेण्यासारखं आहे." वृंदा म्हणाली.
"पण हे सगळं इतक्या टोकाला कसं गेलं असेल बरं? हा मोठा प्रश्न आहे आणि ती जेव्हा जेव्हा आपल्याला भेटली तेव्हा कधीच जाणवले नाही की हिला आपल्या आणि रोहनच्या मैत्री बद्दल इतका प्रॉब्लेम असेल." दिव्या म्हणाली.
"मला तर असं वाटतंय की आपल्याच बोलण्यातून तिला बऱ्याच गोष्टी समजत गेल्या असाव्यात आणि त्यानंतर हे सगळं सुरू झालं असावं." वृंदाने शंका व्यक्त केली.
"आपण कधी काय बोललो तेव्हा? काहीही बोलू नकोस तू वृंदा." अमित म्हणाला.
"अरे त्यांचं जेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा आपण बऱ्याचदा भेटलो होतो. आपल्या बोलण्यातून एकदा दोनदा गेलं होतं की हा कॉलेजमध्ये किती फेमस होता. बऱ्याच मुलींचा तो क्रश होता तरी हा अरेंज मॅरेज करेल असे स्वप्नातही वाटले नव्हतं आम्हाला. असं अगदी सहज बोलून गेलो आहे आपण. तेही तिच्या डोक्यात फिरत असणार. असा माझा अंदाज आ." वृंदा म्हणाली.
"एक्झॅक्टली असंही असू शकतं यार. हे माझ्या लक्षातच नाही आलं. हे सगळं जर आपल्यामुळे सुरू झालं असेल तर आता त्याला यातून बाहेर काढणं ही देखील आपलीच जबाबदारी आहे." अमित म्हणाला.
"बाहेर काढायचं म्हणजे काय त्यांना दोघांना वेगळं करायचं?" दिव्याने तर्क व्यक्त करत प्रश्न केला.
"तसे नाही गं उलट त्या दोघांचं नातं आणखी कसं घट्ट होईल याचा विचार करायला हवा आपल्याला." अमित बोलला.
"ती मंद बाई समजून घेईल असं वाटतं तुला अमित." शंकास्पद सुरात दिव्या बोलली.
"तिला तिच्याच पद्धतीने समजावले तर नक्कीच समजेल दिव्या." वृंदा म्हणाली.
"म्हणजे नेमकं काय म्हणायचंय वृंदा तुला?" अमित बोलला.
"तू अस्मी सोबत बोलायचं. हळूहळू तिच्याशी मैत्री वाढवायची. रोहन चुकतोय असं बोलून आपल्याला देखील त्याचे वागणे पटत नाही हे तिला भासवायचे. मग बघ हळूहळू ती आपोआप तिच्या मनातील दुःख शेअर करेल. तिचा विक पॉइंट मला माहितीये. ती सगळं सांगणार बघ तुला."
"पण हे सगळं करून ते दोघे एकत्र कसे येणार? मला तर काहीच कळत नाही बघ वृंदा." दिव्या म्हणाली.
"अगं हळूहळू अमित आणि तिचं बोलणं वाढेल. हे होणं गरजेचं आहे."
"हो ते समजलं पण त्याचा काय फायदा?"
"अगं हेच तर हवंय आपल्याला. तिला तिच्याच भाषेत सांगायचं असं ठरलंय ना. थोडक्यात अमित आणि अस्मी यांच्यात मैत्री व्यतिरिक्त काही नातं आहे का? तर नाही... आपण जेव्हा त्रासात असतो तेव्हा आपल्या भावना अनावधानाने आपल्या जवळच्या व्यक्तीशी शेअर करतो. जसं की रोहन बऱ्याचदा तुला सांगायचा काही गोष्टी, पण म्हणून तुमच्यात लगेच वेगळे काही नाते आहे असा तर अर्थ होत नाही ना त्याचा. हेच अस्मीला आपण पटवून द्यायचे. ज्या गोष्टी बोलून तिला समजावून सांगून समजणार नाहीत त्याच आपण तिला कृतीतून पटवून द्यायच्या. रोहन किती चांगला आहे, तो तसा मुलगा नाही हे ह्या परिस्थितीमध्ये तरी तिला पटणार नाहीये. म्हणून मग अशा पद्धतीने तिला पटेल, याची मनात कुठे तरी खात्री वाटते मला."
"अगं पण ती रोहनला सांगेल ना हे सगळं काही. मग आपला प्लॅन वर्क होणारच नाही आणि रोहन आपल्या पासून दुरावेल ती गोष्ट वेगळीच."
"असं काहीच होणार नाही याची खात्री आहे मला."
"मलाही वाटते वृंदाचा हा प्लॅन वर्क होईल पण तू मला त्या अस्मी सोबत मला मैत्री करायला सांगून माझा बळी देत आहेस आ वृंदा."
"आपल्या मित्रासाठी तू एवढं करणार नाहीस अमित?"
क्रमशः
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा