Login

शिदोरी संस्काराची भाग ५ अंतिम

वचन देशील मला?
दुसऱ्या दिवशी स्नेहा नंदिनीला घेऊन घरी आली. केतनला काहीच खबर नव्हती. दोघींना पाहून तो खुश तर झाला; पण स्नेहा न सांगता आली ह्याचे आश्चर्य देखील वाटले.
स्नेहाने नंदिनीला झोपवले.

तिचा चेहरा प्रफुल्लित दिसत होता.

"काय मॅडम? असं अचानक येऊन तुम्ही तर धक्काच दिला."

"हो सर तुमच्या लेकीला तुमची आठवण येत होती."

"फक्त लेकीलाच आठवण येत होती का लेकीच्या आईला देखील माझी आठवण येत होती."

तिच्या कमरेत हाताचा विळखा घालत म्हणाला.

"फक्त लेकीला आठवण येत होती." असं म्हणत ती त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती.

त्याने अजून पकड घट्ट केली.
तिच्या डोळ्यात निरखुन पाहू लागला.
तिच्या चेहऱ्यावर आलेली बट त्याने हळूच मागे केली.

तिने मान अलदग त्याच्या छातीवर ठेवली.
केतन तिच्या डोक्यावरुन हात फिरवत होता.

"सॉरी केतन."

"सॉरी? कशासाठी?." त्याने तिच्या गालावर हात फिरवला.


"खूप त्रास देते ना मी?" त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.

"तू काहीच त्रास देत नाही,उलट मीच कुठेतरी कमी पडतो आहे." तो सोफ्यावर जाऊन बसला.


स्नेहा त्याच्या बाजूला जाऊन बसली.
"तू कुठेच कमी पडत नाही"
त्याचा केसावर अलगद हात फिरवत म्हणाली.

"खरंच स्नेहा?" तिच्याकडे पाहत म्हणाला.

"हो खरंच. एक मुलगा,नवरा आणि आता बाबा म्हणून सर्व कर्तव्य छान पद्धतीने पार पाडतो आहेस. मी खूप लकी आहे की, तू माझा लाईफ पार्टनर आहेस."

हे ऐकताच त्याचे डोळे पाणावले.

दोघेही एकमेकांच्या मिठीत विरघळले. खूप दिवसापासून दोघात जे अंतर आलं होतं ते नाहीसे झाले.

केतनला फार बरं वाटत होतं.

थोड्या दिवसाने स्नेहाने विषय काढला.

"केतन, नंदिनी लहान आहे. सध्या बाहेर जाऊ शकत नाही. मी विचार करते आहे की घरात ट्युशन घ्यावे. माझंही मन रमेल आणि दोन पैसे येतील."

"स्नेहा, कशाला त्रास करून घेते. मी आहे ना."
त्याला असं वाटत होतं तिने नंदिनीकडे लक्ष द्यावे आणि आराम करावा.

"केतन, दोन तासच मी ट्युशन घेणार. डोक्याला चालना. मला खरंच असं दिवसभर कंटाळा येतो. प्लिज." ती लाडिगोडी लावत म्हणाली.

आता इतकं प्रेमाने बोलत होती की , तिला नाही म्हणता आलेच नाही.

"हो पण स्वतःकडे आणि नंदिनीकडे दुर्लक्ष करू नको. तुम्ही दोघी माझ्यासाठी महत्वाच्या आहाता."

"तू ती काळजी करू नको. मी तुझ्या लेकीची आणि बायकोची काळजी घेईल." स्नेहा हसतच म्हणाली.


स्नेहाने ट्युशन सुरू केले. माऊथ पब्लिसिटी केली. बघता बघता वर्षभरात चाळीस मुलं आली. तिची शिकवण्याची पद्धत चांगली असल्यामुळे कमी वेळात तिच्याकडे भरपूर मुलं येऊ लागली. नंदिनी देखील ट्युशनची मुलं आली की, शांत बसत. स्नेहाला तोडक्या मोडक्या भाषेत स्वतःला शिकवायला सांगायची.

स्नेहा प्रसन्न राहू लागली. तिला तसं बघून केतनलाही छान वाटायचे.
तिच्यातला आत्मविश्वास ओसंडून वाहत होता.
घरात आता कसल्याही गोष्टीची कमी नव्हती.
घराखर्चाची जबाबदारी स्नेहाने घेतली. केतनसुद्धा रिलॅक्स राहू लागला. तो देखील स्नेहाला जमेल तशी मदत करायचा.

केतनचा वाढदिवस होता. त्या दिवशी स्नेहाने मुलांना सुट्टी दिली होती.

हॉटेलमध्ये जेवायला गेले.
घरी आल्यावर स्नेहाने केतनला गिफ्ट दिले.
केतनने गिफ्ट पाहिले तसा तो चमकला.
ते केतनचे ब्रेसलेट होते, जे त्याने सोनाराकडे मोडले होते.

केतन निशब्द झाला. त्याला काय बोलावं सुचेना.

"स्नेहा, हे तुझ्याकडे?"

"केतन जसं मला समजले की तू ब्रेसलेट मोडले आहे,मी लगेच आपल्या सोनाराला फोन करून सांगीतले की ते मला पाहिजे. महिन्याला थोडे थोडे पैसे करून मी पुन्हा ते घेतले."


"थँक्स स्नेहा, हे माझ्या आई बाबांनी फार प्रेमाने दिले होते. परिस्थिती अशी आली की, मला मोडावे लागले."

"केतन, मी तुझ्यावर रागावले आहे. तू मला का नाही सांगितले? लग्नाची बायको आहे मी, तू हे सांगायला पाहिजे होते. मी हट्ट नसता केला."


"स्नेहा, माझं चुकलं. मी सगळं तुला सांगायला पाहिजे होते. पण आधीच तू नंदिनीमुळे चिडचिड करायला लागली होती. त्यात आर्थिक स्थिती फार वाईट झाली होती. मला अपराधी असल्यासारखे वाटत होते. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार हे वचन मी लग्नादिवशी घेतले होते; पण नंतर सगळं विस्कळीत होत गेले. बाबांचा अपघात झाला. राघव कडून पैसे घेतले. नंदिनीचा पहिला वाढदिवस मी फार साध्या पद्धतीने केला. पैश्या अभावी मी काहीच करू शकत नव्हतो. मला समजत नव्हतं मी काय करू. शेवटी हे ब्रेसलेट मोडले. डोक्यावरचे ओझे हलके झाले."


"केतन, किती धडपड करत राहिला. मला काहीच कळू दिले नाही. मी मात्र माझ्याच वेगळ्या दुनियेत होते. दुसऱ्याचे स्टेटस बघून स्वतःच्या नवऱ्याची परिस्थिती समजू शकले नाही. सॉरी केतन." तिच्याही डोळ्यात पाणी तरळले.

"सॉरी नको म्हणू. आज तू मला जे गिफ्ट दिलं आहे त्यासाठी मी तुला थँक्स म्हणायला हवे."
त्याने कपाळावर किस घेतला.


"बरं मी गिफ्ट दिलं. माझं रिटर्न गिफ्ट." ती हात पुढे करत म्हणाली.

"बोल तुला काय पाहिजे." मिश्किल हसत तो म्हणाला.

"देशील ना?" स्नेहा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.

"हो देणार. बोल काय पाहिजे ."

"वचन दे तुझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ती लहान असो वा मोठी तू मला सांगणार. माझ्यापासून कधीच,काहीच लपवणार नाही."


"दिले वचन." केतन तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला.

नंदिनीने देखील आई बाबांच्या हातावर इवलेशे हात ठेवले. खळखळून हसू लागली.

संस्काराची शिदोरी पुढच्या पिढीकडे आई बाबांकडूनच जाते ना?

नंदिनीदेखील ती शिदोरी जपणार होती. अमूल्य संस्काराची अशी शिदोरी.

समाप्त.


कथा लेखन- अश्विनी कुणाल ओगले. तुम्हाला कथा आवडली असेल तर एक लाईक जरूर द्या आणि कंमेंटमध्ये सांगा.
कथेचा वापर यू ट्यूब किंवा कुठेही करू नये. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल.