Login

संतूर मॉम!

तुम्हा आम्हाला आजकाल अगदी सहज बघायला किंवा अनुभवायला मिळणारी मजेशीर कथा

आज कितीतरी दिवसांनी ती ही अशी घराबाहेर पडली होती.

ना ती, पाण्याची बाटली आणि खाऊचा एखादा डबा, चार्जर्स, घड्या केलेल्या पिशव्या, असंख्य बिलं, पावत्या  कोंबलेली ढबोळी पर्स, ना भाजीची किंवा डब्याची पिशवी, ना मळखाऊ, इस्त्री केला असलातरी सुरकुत्या पडलेला ड्रेस, आणि जेमतेम केसांवरून कंगवा फिरवला न फिरवला वाटावे असा अस्ताव्यस्त केशसम्भार.

मस्त सोनसळी रंगाचा ड्रेस, छान, व्यवस्थित ट्रिम आणि सेट केलेला हेअरकट, हलकासा मेकप, कट डायमंड चे कानातले, खांद्याला फक्त मोबाईल आणि कार्ड - पैसे राहतील येव्हढी छोटीशी स्लिंग, पायात बेताच्या हिल्सवाले ठेवणीतले सँडल्स. पूर्वी तिलाही पेन्सिल हिल्सच भारी आकर्षण पण त्याच काय ना पेन्सिल हिल्स ने कंबरडं मोडलंच म्हणून समजा, आणि जिने चढायचे, खड्ड्यातल्या रस्त्यातून चालायचे, आपण जाऊ मारे शाईन मारायला आणि लगेच पायाच मुडपला, इतक्या वेळा बसलेल्या धक्क्यानंतर  आणि तोंडघशी  पडल्या नंतर आलेल हे शहाणपण. हिल्सने चालताना बाउन्स मिळतो,  एक मस्त रिदम मिळतो. आणि त्या  तालात चालताना प्रत्येक पावला बरोबर उडणारे केस.. आहा आहा!  "परी हू मै... "  वाह! कॉलेज मध्ये असं नेहेमीच दोन इंच हवेत पावलं असायची आज ते सुख परत बऱ्याच महिन्यांनी, बहुदा वर्षांनी मिळतं होत.

  

त्याच झालं असा होतं, आज वीकएंड होता. पण मुलांना कसलीशी छोटी पार्टी होती आणि एका उपनगरात तिच्या माहेरचं एक छोटं  फंक्शन होत. चक्क नवऱ्याने मुलांना बेबीसिटिंग करायची जबाबदारी घेतली आणि अनायसे तिला एकटीला जायला  मिळालं. 

गेल्या ५-६ वर्षात नोकरी आणि  मुलं ह्यांच्या गराड्यात बरीचशा  कौटुंबिक कार्यक्रमाना जायला तिला जमलच नव्हत, कधी ऑड डे, तर कधी मुलांची कारणं. आज सगळंच जुळून आलं होत. 

कितीतरी दिवसांनी, महिन्यांनी आणि वर्षांनी ती मामे, मावस, मामे चुलत, चुलत मामे, मावस चुलत, कि चुलत मावस अशा अनेक मामा, माम्या, मावशा, काका, आज्या, बहिणी, भाऊ झालच तर भाचवंड ह्यांना भेटत होती. काही वयोमानाप्रमाणे थोडे वाकलेले, थकलेले,  काहींच्या केसांची पार चांदी झालेली, तर काहींची मस्त पोट सुटलेली, काही वर्षांपूर्वी छोटी असलेली आता चांगलीच ताड माड  झालेली, आणि काही इटुकली पिटुकली नवीन मंडळी. सकाळ पासून खुललेला मूड आता ह्या सगळ्यांबरोबर अगदीच टिपेला गेला. गप्पा- टप्पा, मस्करी ह्यांना तर मस्त ऊत आलेला.

एकेएकाला हाय हॅलो करत, खिदळत अजून एका घोळक्यात शिरली. बोलता बोलता एक छान उंच, सडसडीत मुलगा पण त्यांच्या घोळक्यात सामील झाला, नुकताच आला होता तो. म्हणजे आईने बळे बळे आणलेलं म्हणून नाराजीही दिसत होती. पण काहीच मिनिटात तोही निवळला.

“इतका छोटा होता पऱ्या, आणि  आता इतका उंच झालाय” म्हणून ती कौतुकाने बघू लागली, पण इकडे पऱ्याच्या काहीच स्मरणात नाही. सोनसळी ड्रेस मधल्या परीवर पऱ्या  फिदा, म्हणजे अगदी “फिदा म्हणणं थोडं जास्तच होईल:” पण ह्याचा मधू मलुष्टे झाला आणि ती त्याची हिल्स घातलेली “सुबक ठेंगणी” . 

एखाद दोन मिनिटांत तिच्या हा घोटाळा लक्षात येतोय आणि ती काही बोलणार तोच

 “अय्या, ताई तू अजून इकडेच ?? मग कशाला घाई करतेस आता इतक्या दिवसांनी आलीयेस तर थांब ना अजून.. करतील ते मॅनेज … ” सान्वी कुठूनही अवतरली आणि  तिच्या पाठीत एक धपाटा घालत म्हणाली. 

समोरच उभ्या आलेल्या “मधू मालूष्टे” च्या चेहऱ्यावरचे भाव एकेका शब्दासरशी  बदलत गेले. “अरेच्चा ! ही तर दूरची का होईना ताई आहे. चायला भलताच रॉंग नंबर लागत होता .. “ जीभ चावत त्या दोघी संभाषणात अडकलेल्या बघून पऱ्याने कल्टी मारली. ते बघितल्या न बघितल्यासारखे करत ती सान्वीचा निरोप घेऊन निघाली एकदाची . 

मग दारावर उभ्या असलेल्या मामाचा निरोप घेत ती आता खरोखरच बाहेर पडली. 

सकाळी येताना जेव्हढी खुश होती त्याच्या कितीतरी पटींनी तिला आता हलकं हलकं वाटत होत. ह्या सगळ्या म्हणाव्या तर निरुपयोगी पण स्ट्रेस आणि थकव्याचा रामबाण उपाय असलेल्या गप्पा टप्पानी तिला मस्त ऑक्सिजनच मिळाला होता जणू. 

*** 

इतका वेळ ह्या सोनसळी ड्रेस मधल्या  मुलीला हेरणाऱ्या मालती ताई तिला हॉल मधून जाताना बघून घाई घाईने दाराशी उभ्या आलेल्या मामाकडे आल्या. 

“अरे, ती कोण होती रे?”

“माझी एक भाची. “ मामा  वर वर हसून आठी लपवत म्हणाला. “ह्या आईच्या एकेक मैत्रिणी म्हणजे, दुनियाभरच्या  चौकशा असतात ह्यांना .. “

“काय वय असेल रे तिचं? अरे माझ्या भाच्याच बघतायत. चांगला इंजिनियर आहे, मस्त नोकरी आहे, जागा घेतलीये नुकतीच .. “

मालतीबाईंची सरबत्ती रोखत मामा म्हणाला, “तिच्यासाठी? अहो लग्न झालाय तिचं. मुलं  आहेत तिला.. . “

“अरे तुझा काही गैरसमज होतोय, मी आता जी पिवळा ड्रेस घालून गेली ना तिच्या विषयी बोलतेय. “

“ हो हो तीच. झालाय तिचं लग्न. “

“पण मंगळसूत्र तर नव्हतं .. ” मालतीबाईंची अजून एक शंका.

“ते मंगळसूत्र  होत-नव्हतं वगैरे काही मला माहित नाही. पण तिचं कधीच लग्न झालय आणि तिला मुलं पण आहेत. “ त्यांना निक्षून सांगत मालतीताईंच्या ससेमिऱ्यातून मामाने  कसबस स्वतःला सोडवलं. 

इकडे मालतीबाई चडफडत बसल्या, “ काय बाई आजकालच्या मुली तरी? मंगळसूत्र वगैरे घालत नाहीत आणि मग अशी आमची पंचाईत होते. हिच्या मागे लागले आणि कदाचित एखाद-दोन उपवर मुली हातच्या सुटल्या असतील तर ..”

0