संवाद माझ्याशी

व्यक्त होताना कधीतरी शब्दांना ही पंख फुटावे.. मनी दडलेल्या भावनांनी पानावर मग उतरावे
कलांची शिकवण उपजतच अंगी
कल्याणकारी मी "शुभांगी"
नावाचा अर्थ सांगताना, या दोन ओळी माझ्याकडून नेहमी पुटपुटल्या जातात.

खरं तर आत्मचरित्रात लिहिणार तरी काय?
आत्मचरित्र लिहायला मी काही खूप मोठी नाही.
आत्मचरित्र म्हणजे.. "संवाद स्वतःचा स्वतःशी" आणि हा "संवाद माझाच माझ्याशी" निरंतर चालू असतो बरं का? आणि तो असायला हवाच, हे माझं स्पष्ट मत. स्पर्धेचा भाग म्हणून, आत्मचरित्र लिहिण्याची संधी इरामुळे मिळाली... त्यासाठी हा प्रपंच...

आई शिक्षिका तर बाबा पोलिस... आम्ही तीन बहिणी एक भाऊ. आईने त्या काळात माझ्या जन्मानंतर, डी. एड. केलं. मी सहा महिन्याची होते, मला असं दुसऱ्यांच्या भरवशावर सोडून जाताना माझ्या माय माऊलीला कोणत्या दिव्यातून जावं लागलं असेल त्याची साधी कल्पना ही करवत नाही. आईबाबांचा संघर्ष, त्यांची शून्यातून विश्व निर्मितीची धडपड, लहानपणापासूनच उघड्या डोळ्यांनी बघितली होती. बहीण भावंडांच्या सहवासात, बालपण तसं खूप आनंदात गेलं. आवश्यक गरजा आईबाबांनी मनापासून पुरवल्या. अवाजवी लाड करायला त्यांच्या जवळ ना वेळ होता ना पैसा. त्यांच्या काटकसरी स्वभावाचे संस्कार आपोआप मनावर कोरल्या गेले.

शाळेचे दिवस कसे हातातून वाळू निसटावी तसे अलगद निसटले. उन्हाळ्याची सुट्टी जणू काही माझ्यातल्या कलागुणांना माझीच ओळख करून देणारी असायची. शिवणकाम, विणकाम, भरतकाम निरनिराळया प्रकारचे वॉल पेंटींग्ज, वॉल हँगिंगग्ज बनवायला बनवून दयायला आवडायचं.कचऱ्यातून ही कला साकारल्या जात होती, हाताला गुण होता, वेगवेगळ्या आयडिया सुचत हात होत्या घर सजवट माझ्या आवडीचा विषय होता.

रांगोळी ठिपक्यांची असो की संस्कार भारती, हातखंडा होता. ठिपक्यांच्या फुलांच्या रांगोळ्या काढायला, पुष्परचना करायला खूप आवडत होतं. देवावर वाहिलेल्या निर्माल्यालाही टाकून देण्यापूर्वी, देवघरात आरास रुपात सजवून निर्माल्याला नवजीवन देणारी मी. स्वभावाने बडबडी असली तरी कुणाशीच पटकन ओळख होतेच असं नाही. संवादाचे तार प्रत्येकाशी जूळतीलच असं नाही. पण एकदा का जुळले की ते निरंतर जपले जातात. तासनतास बोलायला, वेळ कमी पडावा एव्हढ पारदर्शी नातं तयार होतं.

मला झाडांशी बोलायला आवडत. रस्त्याच्या कडेला बहरलेला, गुलमोहर असो की बहावा की असो दुर्लक्षित टपोऱ्या फुलांनी बहरलेली वेडी बाभूळ.. मला जगण्याची प्रेरणा देतात . निसर्गातली प्रत्येकच गोष्ट, आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन देवून जाते. सुखी राहायचं असेल तर कुणाकडून कशाची अपेक्षा न करता, सुख मात्र पेरता यायला हवं वेड्या बाभळीसारखी असं मला मनापासून वाटतं.

अभ्यासातली प्रगती तशी चांगली होती. हुशार एकपाठी नसले तरी मेहनती मात्र होतेच. कष्टाचं फळ मिळतच यावर ठाम विश्वास असल्याने प्रामाणिक प्रयत्न सुरू होतेच. शाळेत गणित विषय त्यातल्या त्यात geometryशी काही केल्या जुळलं नाही. कॉन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय, गणित तरी कशी येणार हे सत्य समजायला जरा उशीरच लागला. मराठी, संस्कृत त्यातल्या त्यात आवडीचे विषय... गणिताच्या भीतीपोटी, अकरावीला आर्ट्स घेतलं आणि इंग्लिश लिटरेचर विषय घेऊन पुढचं शिक्षण घ्यायचं ठरवलं. पुढच्या शिक्षणात करिअरच्या दृष्टीने इंग्लिश लिटरेचर घेतलं असलं तरी, मराठी वाङमय असलेल्या मैत्रिणीच्या अभ्यास क्रमात असलेल्या कादंबऱ्या वाचून मराठी साहित्य वाचनाची आवड लागली.

कॉलेजचे दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस होते. "यहाँ हमारा राज चलता हैं टाईप." त्यामुळे ते तीन वर्ष तर..... आजही हळव्या कप्प्यात अत्तराचा सुगंध देतात. बी.ए.ला असताना सोबत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. कुंडलीत सरकारी नोकरीचे योग होते, ते जुळून यावेत म्हणून त्या दिशेने प्रवास सुरू केला. म्हणतात ना ठरवलं ते प्रत्येक वेळी होईलच अस नसतं. तळहातावरच्या रेषाही आपली वाट बदलत असाव्या कदाचित.

लग्न म्हणजे, मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम आलाच. उच्चशिक्षित, नोकरी करणारी, दिसायला सुंदर असूनही मोठ्या बहिणीला बघायला खूप पाहुणे येत. पाहुण्यांकडून होकार नकरा आणि त्यातून चा मनस्ताप सर्वांना सहन करावा लागला. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम आणि त्यानंतरच्या होकार नकाराचा मनात तिटकारा निर्माण झाला. कांदेपोहे घेऊन असं ढीगभर पाहुण्यांसमोर स्वतःच प्रदर्शन मांडणार नाही. मी स्वतःशीचं ठरवलं.

'मला पाहता क्षणी, जो मुलगा मला पसंत करेन, मला मी आहे तशी स्वीकारेन, त्या मुलाशी मी लग्न करेन.' कुणाला माहिती होतं, हे योग अगदी लवकर आणि सहज जुळून येतील. ध्यानीमनी नसताना, अनपेक्षितपणे एक स्थळ समोरून चालून आल. बघण्याचा कुठलाच कार्यक्रम नाही आणि मला बघितल्या लगेच दुसऱ्या क्षणाला पसंतीचा होकार आला. हा अनपेक्षित विचार करायला लावणारा धक्का होता. पहिलं वहिलं स्थळ, शिकला सावरला संस्कारी मुलगा मग उगाच कशाला नकाराची नाट... आणि आमचं लग्न ठरलं. एम. ए. करत असताना लग्न झालं.

घरात सासू, सासरे, नणंद, दिर.. अशा भरल्या कुटुंबात माझी एन्ट्री झाली. वर्षभऱ्यात बाळाची चाहूल लागली. गरोदरपण काही सहज सोप नव्हतं. पाचव्या महिन्यात, डॉक्टरांनी काळजी बोलून दाखवली. सातव्या महिन्यात डॉक्टरांनी बाळ काढून टाकण्यापलीकडे पर्याय नाही स्पष्टच सांगितलं. हातातून निसटलेल्या गंभीर केसेस गव्हरंमेंट हॉस्पिटलमध्ये सहज हाताळल्या जातात या गोष्टीचं प्रत्यंतर त्यावेळी आलं. नागपूरच्या government मेडीकल हॉस्पिटलमध्ये सातव्या महिन्यातच मला एडमिट व्हावं लागलं. कॉम्पलीकेशन्स असल्याने डॉक्टरांकडून माझी सर्वोतोपरी खूप काळजी घेतल्या जात होती.

खूप कठीण काळ होता तो, कंप्लीट बेड रेस्ट म्हणजे शिक्षा होती जणू... पोटातल्या बाळाच्या हलक्या हलक्या हालचाली, तो अनुभव अपरिमित आनंद देणारा होता. आठवड्यात दोन तर कधी तीन वेळा केल्या जाणाऱ्या सोनोग्राफ्या, वारंवारच्या ब्लड टेस्टस्, बाळाच्या वाढीसाठी त्याच्या सुरक्षिततेसाठी दिली जाणारी मनस्ताप वाढवणारी ट्रीटमेंट. ट्रीटमेंटला माझं बाळ ही आतून छान प्रतिसाद देवू लागलं. दसऱ्या, दिवाळी, कोजागिरीच्या दिवशी हॉस्पिटलच्या वातावरणात सणाचा उत्साह ओसंडून वाहत होता. नववा महिना लागला आता प्रतीक्षा संपली होती. सिझेरीयन ऑपरेशनच्या दोन दिवस आधी, मनातली डोहाळे जेवनाची इच्छा मी डॉक्टरांना बोलून दाखवली. आणि सुट्टी घेऊन घरी येऊन मी माझी डोहाळे जेवणाची इच्छा पूर्ण करून घेतली.

माझ्या पोटी गोंडस बाळ जन्म घेतला त्या दिवशी आई म्हणून माझा ही जन्म झाला होता. अत्यंत नाजूक असलेलं बाळ बाहेर survive करू शकेल की नाही, डॉक्टरांना ही खात्री नसलेलं माझं नाजूक-साजूक बाळ, जन्मानंतर त्याला इनक्यूबेटरमध्ये सुद्धा ठेवायची सुद्धा गरज पडली नव्हती.

बाळ हळूहळू मोठ होऊ लागलं. माझ्या हट्टी, घणघण्या, तडतड्या, चिडचिड्या, चंचल बाळाला वाढवताना माझी चांगलीच कसोटी लागत होती.

सिव्हिल इंजिनिअर असलेला नवरा, सतत पायाला भिंगरी लावून फिरतीवर. घर फक्तच पत्त्यासाठी असावं की काय असं वाटायचं. मुलाच्या शैक्षणिक प्रगतीत, फिरतीच्या नोकरीचा अडथळा येऊ नये म्हणून, मुलाची सगळी जबाबदारी एकटीवर घेतली, त्याच्या पालनपोषणात पुरती गुंतून गेले.

आपलं ही हक्काचं घर असावं मनात सुप्त इच्छा साद घालत होती. त्यासाठी, हवे ते प्रयत्न आणि हवी तेवढी काटकसर करण्याची तयारी होतीच. तसा योग ही लवकरच जुळून आला. नावाची पाटी दारावर लागली. आपलं म्हणू असं आमच्या हक्काचं घर आता आमच्या नावावर होतं.

शिवण कामाची आवड मला होतीच. दरम्यान मी ड्रेस डिझायनिंगचा कोर्स ही केला. जमेल तशी, शिवणकामाची आवड जोपासू लागले. जवळजवळ सतरा वर्ष लेडीज वेअर, बुटिक स्टाईल, ब्लाऊज पासून तर लाछा लेहेंगे, वन पिस पर्यंत सर्व प्रकारचे कपडे शिवण्यात स्वतःला व्यस्त केलं. मला माझी म्हणू शकेल अशी, स्वतःची मिळकत होती. पिको फॉल आणि शिवलेल्या कपड्यांच्या बारीक सारीक फिनिशिंगसाठी फुल ना फुलाची पाकळी का होईना पण दोन सख्यांना, रोजगार देण्याचा प्रयत्न ही केला.

मुलाचं पालनपोषण, त्याची शाळा, त्याचे खेळ, त्याचा अभ्यास, परीक्षा यात स्वतःला गुंतवून घेतलं. एकटी, मुलाला घेऊन राहत असल्याने, त्याच्या दुखण्या खुपण्यात, आजारपणात तारांबळ उडायची. मुलाला दहावीपर्यंत कधीच ट्युशन लावावी लागली नाही. गणितात जेमतेम असलेली मी, सीबीएससीचं गणित त्याला शिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सरावाने त्याच्या बरोबरीने सोडवू लागले.
"आई, मी ट्युशन लावली नसती आणि तू माझा अभ्यास घेताना तुझा गणिताचा सराव सोडला नसता, तर तू ही आज माझ्यासारखी इंजिनीरिंगची गणित सोडवत असतीस. असं लेकरू म्हणत तेव्हा, अशक्य अस काहीच नाही याची प्रचिती येते.

मुलांना शिकवताना, बरोबरीने शिकण्याचा प्रयत्न केला तर, अवघड काही नसतंच. छोट्या छोट्या मुलांना ट्युशनला पाठविणाऱ्या पालकांसाठी मला हे मुद्दाम अधोरेखित करावं वाटत.

सगळं छान सुरळीत चालू असताना, एक दिवस अचानक.. कमरेत दुखणं भरलं. मोठमोठया हॉस्पिटलच्या फेऱ्या, ढीगभर औषध, फीजियोथेरेपी आणि काय काय? डॉक्टरांच्या सांगण्यावरून शिवणकाम बंद करावं लागलं. मला आवडत असलेलं काम हातातून सुटलं. पण पर्याय नव्हता. दैनंदिन हालचालींवर मर्यादा आल्या. घर झाड पुस करताना, कोपऱ्या कोपऱ्या वरून हात फिरवताना मिळवता येणारा आनंद आता हरवला होता. घरकाम काय पण उठण्या-बसण्या, चालण्या फिरण्यासारख्या दैनंदिन हालचालींवर मर्यादा आल्या. अंग काठीने सडपातळ, धडपडी, उठाठेविची काम करणाऱ्या, माझं आयुष्य आता पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. एक एक दुखणं अंग वर काढत होतं, त्यात खांद्याच दुखणं वाढलं, एमर्जेन्सी मध्ये ऑपरेशन करावं लागलं.


कोरोना काळात वाचन, लिखाण करता येणाऱ्या आणि लिखाणाची आवड असणाऱ्या नवोदित लेखकांसाठी.. लिखाणाची संधी उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची माहिती मिळाली. वाचनाचा छंद होताच, जो थोडा मागे सुटला होता दरम्यान अनेकानेक लेखक लेखिकांच साहित्य वाचनात आलं. आवडणाऱ्या , भावणाऱ्या कथा, कहाण्यांना कमेंट्सच्या माध्यमातून अनेकानेक लेखकांपर्यंत पोहचता आलं.

"तुमचा हात लिहिता आहे , तुम्ही ही लिहू शकता. प्रयत्न करा." मी दिलेल्या अभिप्रायावर अनेक लेखकांनी "मी ही लिहू शकते" हा विश्वास मला दिला. आणि तिचं प्रेरणा, लेखणी हातात घेऊन व्यक्त होण्यास कारणीभूत ठरली. दुखण्या खुपण्याने त्रस्त, हरल्या हरल्याची भावना मनात येऊन मनोबल ढासळत चाललेल्या मला, "एक नवी उमेद" लिखाणाने दिली आणि माझ्यातल्या लेखिकेचा जन्म झाला.

मोमस्प्रेसो मराठी वर.. शंभर शब्दांची गोष्ट (अलक) प्रकार माझा प्रचंड आवडता. अनेकदा कथा विजेत्या म्हणून निवडल्या जात होत्या. विजेता कथांच्या सन्मानार्थ, फेस बुक लाईव्हला येण्याची संधी मिळत गेली. फेसबुकवरचे ते अठरा लाईव्ह शो आत्मविश्वास वाढवणारे होते. लेख, कथा, कविता, चारोळी, सुविचार असे अनेक प्रकार हाताळताना, ब्लॉगर आणि हळूहळू Vlogger म्हणून ही ओळख मिळाली.

कोरोना काळातच इरा ने "जोडीदाराला पत्र" ही स्पर्धा घेतली होती. या आव्हानात मी पहिल्यांदा इराशी जोडल्या गेले. कोरोना काळात, एकवीस दिवसांच कडक lockdown आणि दुसऱ्या राज्यात अडकलेल्या जोडीदाराला लिहिलेलं हळवं पत्र वाचकांच्या मनात घर करून गेलं.

विजेते म्हणून अनेक डिजिटल cerrtificate मिळालेच पण, " 2020 ची इरा चॅम्पियन्स ट्रॉफी", "सर्वोकृष्ट लेखिका" म्हणून मिळालेली ती ट्रॉफी आणि तो सन्मान माझ्यासाठी "हळव्या प्रेमाची महती" जपणारा होता. त्यासाठी मार्गदर्शक कॅप्टन गीता गरुड ताई आणि संजना मॅडमची शतश: आभारी आहे.

मला टीव्ही मालिका बघायला आवडतं नाही, त्या रटाळ वाटतात. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय पोहचवण्याचा प्रयत्न मी करते. त्यामुळेच की काय लघुकथा लिहायला मला खूप आवडतात. मी लघु कथांमध्ये रमते. इरा वर वेगवेगळ्या आव्हानाच्या निमित्ताने मात्र, कथामलिका लिहिण्याचा प्रयत्न ही केला. "तू लिहू शकतेस" प्रोत्साहन देणाऱ्या अनेक मैत्रिणी मला इरामुळे मिळाल्या, दीर्घकथा लिखाण ही त्याचीच प्रचिती.

फेसबुकच्या निमित्ताने अनेकानेक वाचक माझ्या लिखणाशी जोडल्या गेले. माझं लेखन आवर्जून वाचून, लिखाणाचं भरभरून कौतुक करणारे अमेरिकेत वास्तव्यास असलेले, वाचक मित्र... "ज्येष्ठ वैज्ञानिक, आदरणीय डॉ. तारेंद्र लाखनकर" त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित आत्मचरित्र लिहिण्याची इच्छा त्यांनी मला बोलून दाखवली. आणि त्या दिशेने माझा प्रवास सुरू झाला.

गरीब परिस्थीत अडीअडचणी, संकटांवर मात करत.. मार्ग काढत छोट्याशा गावातून सातासमुद्रापार अमेरिकेपर्यंतचा त्यांचा प्रवास शब्दबध्द करण्याची संधी "झेप एका ताऱ्याची" च्या निमित्ताने मला मिळाली. "झेप एका ताऱ्याची" छोट्याशा गावातून साता समुद्रापार एका वैज्ञानिकाचा प्रवास... पुस्तकं रुपात प्रकाशित हा एक लेखिका म्हणून मला मिळालेला सन्मानच होता. पुस्तक प्रकाशन सोहळा तर डोळ्याचे पारणे फिटणारा होता. एक लेखिका म्हणून, आपलं ही एक पुस्तकं असावं, हे स्वप्न "झेप एका ताऱ्याची" च्या निमित्ताने पूर्णत्वास आलं होतं..

आयुष्यात आलेले चढउतार.. आपली परीक्षा बघण्यासाठी असतात. विचार सकारात्मक ठेवून, उत्तर शोधत प्रयत्न पूर्वक प्रवास करत राहायचा. आयुष्यातले खाच खळगे ही अनुभवाच्या रुपात आयुष्य समृध्द करून जातात. आलेले अनुभव गुरू सारखे पाठीशी उभे राहतात, याचा प्रत्यय आयुष्यात पावलोपावली येतोच आणि तेच अनुभव आयुष्य सोप्प करून जातात.

पती - पत्नीच्या नात्यात चार पैसे कमी असतील तरी चालतील पण जोडीदाराचा आपल्यावर विश्वास ही गोष्ट संसारासाठी मला खूप महत्वाची वाटते. गेले वीस वर्ष.. आपआपल्या वाट्याच्या जबाबदाऱ्या स्वीकारत आम्हा दोघांना ही वेगवेगळ्या राज्यात दूर राहावं लागलं. सरळ नाकाच्या रेषेत चालणाऱ्यांनाही हा समाज शांतपणे जगू देत नाही, हा ही अनुभव आला. अविश्वासाच्या छोट्याशा ठिणगीने संसाराची राखरांगोळी ही होते. पण एकमेकांवर अतूट "विश्वास" असला की गालबोट लावणाऱ्यांच्या सर्टिफिकेटची ही गरज पडत नाही हे सुद्धा खरंच. "विश्वास" नावाच्या सुंदर अलंकारांनी सजलेला आमचा संसार, ही मला दैवी कृपाच वाटते.

आपले संस्कार आपल्या मुलांमध्ये दिसतात. मुलांमध्ये आदर्श घडवून आणायचा असेल तर, आपले विचार, मुलांसमोर तसा आदर्श ठेवणारे असावे हे माझं स्पष्ट मत. गेली तीन वर्ष लेकरू शिक्षणासाठी वेगळ्या राज्यात राहतोय. लेकरू आपल्या पासून दूर जाणार या विचाराने, सुरवातीला अस्वस्थ होणारी मी, तो काळ माझ्यासाठी खूप हळवा होता. याच अनुभवातून गेलेल्या माझ्या सख्यांनी मात्र त्या काळात मला मोलाचा आधार दिला. या सख्यांना धन्यवाद नाहीच म्हणणार तर मला सदैव त्यांच्या ऋणातच राहायला आवडेल.

राहत्या हक्काच्या घराला कुलूपबंद करून नवऱ्याच्या कर्तव्याच्या जागी, सध्या विंचवाच बिऱ्हाड पाठीवर घेऊन प्रवास करतोय. वर्षाकाठी होणाऱ्या बदल्यांमुळे, आयुष्यात नवीन अनुभव जगायला मिळतायत. प्रत्येक सेमीस्टर नंतर येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये, "लेकराच माहेरपण" हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर अध्याय वाटू लागलाय.

आजवर स्वतःची पाहिजे तशी फार ओळख निर्माण करू न शकणाऱ्या मला... मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देणारं हे "लिखाण". या लिखाणाने, मला माझ्याच नाही तर इतरांच्या नजरेत ही मानाचं स्थान मिळवून दिलंय. आज सर्वदूर लिखाणाचं कौतुक होतं तेव्हा मन उभारी घेत. अधिकाधिक छान छान लिखाणाची प्रेरणा मिळते. स्वतःला लेखिका म्हणवून घेण्या एवढं, साहित्य क्षेत्रात माझं योगदान नाहीच. समुद्राच्या पाण्यात टिपूसभर, तेवढी ही माझी पात्रता नाही.

अवतीभोवतीच्या कलात्मक गोष्टींना, शब्दात गुंफून.. आवड म्हणून व्यक्त होत गेले आणि कथा कहाण्या जन्म घेऊ लागल्या. एखादा वाचक आपल्या कथेशी संलग्न होतो. कथा वाचून आनंदी तर कधी हळवा ही होतो. आपली कथा, एखाद्या वाचकाला अगदी जवळची वाटावी एवढी भावते. ही कथा माझीच आहे की काय? अशी प्रतिक्रिया द्यायला तो विसरत नाही. कधीतरी आपल्या कथेतून एखाद्याला जगण्याचा मार्ग सापडतो. आपण लिहिलेली एखादी कथा एखाद्याची प्रेरणा बनून जाते. वाचकांच्या अशा सुरेख प्रतिक्रिया, मनोबल वाढवतात, लिखाणाचं सार्थक झाल्याची भावना देऊन जातात. एक लेखिका म्हणून याहून मोठा आनंद नाही. तेच खरं...

अतिशय बुजऱ्या स्वभावाची असलेली मी, "मी लिहिते" या गोष्टीचं प्रामुख्याने शाळेत आणि कॉलेजमधल्या मित्र मैत्रिणीना विशेष कौतुक वाटतं. "आम्ही तुझं लिखाण वाचतो," मित्र मैत्रिणी जेव्हा हे अभिमानाने सांगतात तेव्हा.... ती फिलिंगच भारी असते.

आठ दहा महिन्या पूर्वीचा एक अनुभव मुद्दाम शेअर करावा वाटतोय... एक दिवस अचानक शाळेतल्या सरांचा मेसेज, मेसेंजेरवर आला.. "तुम्ही खूप छान लिहिता "... लेखिका म्हणून त्यांनी दिलेला आदर, त्यांचा मोठेपणा होता.. "आनंदाचे डोही आनंद तरंग" असच काहीस त्या क्षणी वाटलं. "छान लिहितेस, लिहीत रहा" माझ्या प्रत्येक लिखाणावर त्यांच्या कौतुकाची थाप, मला भारावून टाकते. गुरुजनांकडून आपल्या लिखाणाचं कौतुक होतं तेव्हा.... हा आनंद शब्दात व्यक्त करण अवघडच. तो आनंद जगावा लागतो फक्त.

आयुष्य सुख, दुःख, संकटांनी व्यापलेलं असतंच. सगळं च आलबेल असेल तर मग काय?.. म्हणतात ना दुःखा शिवाय सुखाची किंमत कळत नसते. तशीच संकट आमच्या ही आयुष्यात आली. जी संकट 360 डिग्रीमध्ये आयुष्य बदलाला कारणीभूत ठरली. पण आम्ही खचलो नाही, पुन्हा त्याच ताकदीने उभ राहिलो. सुख दुःखात, एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. आयुष्याच्या बिकट काळात आपल्या परक्याची ओळख ही झाली. साथ सोडून जाणारी, मन दुखावणारी, आपलीच माणसं असल्यावर तक्रार तरी कोणाला करायची. नाही का!!....

स्वकर्तृत्वावर, प्रामाणिकपणे, प्रयत्नपूर्वक आयुष्याचा हा प्रवास करत राहायचा. आयुष्यात जे काही मिळालंय ते खूप सुंदर आहे.... ती त्या भगवंताचीच कृपा.. हा वरदहस्त असाच डोईवर निरंतर असावा, सर्वांच सगळं छानच व्हावं, प्रयत्नांना यश मिळावं... आयुष्यात आलेला प्रत्येक क्षण सकारात्मक आणि स्वस्थ असावा.. क्षणोक्षणी भगवंताची कृपा अशीच रहावी....मनोकामना मनात ठेवून माझ्या शब्दसुमनांची ओंजळ भगवंताच्या चरणी अर्पण करते.

व्यक्त होताना कधीतरी
शब्दांना ही पंख फुटावे
मनी दडलेल्या भावनांनी
हळुवार मग पानावर उतरावे.......
-©®शुभांगी मस्के....