“आई आठ वाजले आपण जेवायला बसू या. तुला आणि बाबांना नंतर औषध पण घ्यायची असतात. प्रियाला आज उशीर होणार आहे.” अमोल त्याच्या आईला म्हणाला.
“अमोल तुझा आणि प्रियाचा संसार छान चालू आहे ना.”
“हो आई, आमचा संसार खूप छान चालू आहे. तू अजिबात काळजी करू नकोस.”
“काळजी कशी नको करु म्हणतोस? अरे गावावरुन आल्यापासून बघत आहे मी. तुम्ही दोघे जण आपापल्या कामात व्यस्त आहात. माझ्याशी दोन मिनिटे बोलायला तुला काय, तिलाही वेळ नाही? तुम्ही दोघेजण सकाळी जाता ते रात्रीच येता. तुम्हा दोघांना पण एकमेकांशी जास्त कधी बोलताना बघितले नाही मी.”
“अगं, आई शहरातील आयुष्य असच आहे. आमच्या दोघांचे कामाचे क्षेत्र वेगळं त्यामुळे कामाच्या वेळा वेगळ्या. त्यामुळे रोज नाही देऊ शकत एकमेकांना वेळ. पण त्याची कसर आम्ही शनिवार, रविवार भरुन काढतो.”
“अहो, तुमची चौकशी झाली असेल करुन तर जेवायला वाढा. मला भूक लागली आहे आणि मुलाच्या संसारात लुडबुड करण कमी करा. त्यांचं आयुष्य आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या.”
अमोलचे वडील म्हणाले.
“काही काय बोलता? मी काय लुडबुड केली त्यांच्या संसारात? जे दिसलं ते बोलले मी. दोघांचे लग्न होऊन आता सहा महिने झाले आहेत. दोघांनी एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायला हवा, एकमेकांशी संवाद केला तर एकमेकांच्या आवडीनिवडी समजतील.”
“अगं दोघेजण एकमेकांना चांगली सात वर्ष ओळखत आहे. म्हणून तर एकमेकांच्या प्रेमात पडून त्यांनी लग्न केले.”
“बस झाली चर्चा आईबाबा. आता आपण जेवण करु या आई. तुम्ही दोघे प्रवास करुन थकला असाल.” असं म्हणून अमोलने आई बाबांची चर्चा थांबवली. जेवण झाल्यावर अमोल आणि आईवडिलांसोबत गप्पा मारत बसला. रात्रीचे दहा वाजले तरी प्रिया घरी आली नाही.
“अरे अमोल रात्रीचे दहा वाजले अजून प्रिया घरी आली नाही. तिचा काही फोन आला होता का?”
अमोलची आई, दिशा अमोलला म्हणाली.
“अगं आई किती काळजी करतेस? ती पार्टीला गेली आहे, येईल ती. तू आणि बाबा झोपा जाऊन.” असं म्हणत असताना अमोलच्या डोळ्यात पाणी आले. ते बघून अमोलची आई त्याला म्हणाली,
“अमोल तू रडतो आहेस, अहो बघा ना अमोल रडत आहे.खरं सांग तुमच्या दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे ना.”
“नाही आई, आम्ही दोघेजण घटस्फोट घ्यायचा विचार करत आहोत. आम्ही दोघेजण एकमेकांना सात वर्ष ओळखत असलो तरी तिचे आचारविचार आणि आपले आचारविचारमध्ये खूप फरक आहे. तिला शिरा, पोहे असा नाश्ता नाही आवडत. तिला नाश्त्याला ओट्स, अंडी, ज्यूस आवडत. जेवायला तिला उकडलेल्या भाज्या, सॅलड लागत. मला रोज भाजीपोळी, भात वरण हवं असते. प्रियाच म्हणणं असतं मी जे खाते तसा नाश्ता, जेवण करावे. तिच्या पार्टींना जावे, ती म्हणेल तसं फॅशनेबल, ब्रॅंन्डेड कपडे घालावे. मला नाही आवडत तसं राहयला. मी तसं वागत नाही त्यामुळे तिची चिडचिड होते. आमची रोज भांडण होतात. मला आता तिने नाटकात काम करु नये असं वाटतं. पण तिला ते मान्य नाही. ती नाटकासाठी मला सोडायला तयार आहे. असं म्हणून अमोल ओंजळीत तोंड लपवून रडू लागला.
तेवढ्यात प्रिया दाराचे लॅच उघडून घरात आली. ती अमोल आणि त्याच्या आईबाबांना समोर बघून हसली आणि म्हणाली,
“अरे, आईबाबा तुम्ही झोपला नाही अजून.” असं म्हणे पर्यंत तिचा तोल गेला. ती पडेल म्हणून अमोलची आई तिला सावरायला गेली तर त्यांना तिच्या तोंडातून दारुचा वास येऊ लागला. त्या रागाने तिच्याकडे बघत म्हणाल्या,
“अगं प्रिया तू दारु पिऊन आली आहेस. शोभत का तुला हे. तुझ्या आईवडिलांनी हेच संस्कार दिले का तुला? अमोल तुला हे सर्व चालत. म्हणूनच का तू मघापासून आम्हाला झोपायला जा म्हणतं होतास.”
“आई एक मिनिट. माझ्या आईवडिलांचे संस्कार काढायचे नाही. तुमच्या मुलाने दारु पिलेली तुम्हाला चालते आणि मी दारु पिले तर वाईट. अमोल तू तरी काहीतरी बोल. तुला तर माहितीच आहे मी दारू पिते.”
“प्रिया तू आधी आत चल आपण ह्यावर नंतर बोलू. आईबाबा तुम्ही पण जाऊन झोपा आता.” अमोल प्रियाला घेऊन आपल्या खोलीत गेला.
प्रिया आणि अमोलचा संसार सुखाचा नाही का? दुसऱ्या दिवशी प्रियाच्या ह्या वागण्यावर अमोलचे आईवडील काय प्रतिक्रिया देतील? वाचा पुढच्या भागात.
©️®️ ज्योती सिनफळ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा