अमोल आणि प्रियाचा प्रेमविवाह. अमोल आणि प्रिया दोघे जण एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच त्यांचे विचार जुळून दोघेजण एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रिया लहानपणापासून नाटकात काम करायची. तिला नाटकात काम करायला खूप आवडायचे. तिला पुढील आयुष्यात एक यशस्वी अभिनेत्री व्हायचे होते. दोघांचे कॉलेजचे शिक्षण संपल्यावर अमोल बॅंकेत नोकरीला लागला. तर प्रिया नाटक, टीव्ही सिरीयल व जाहिरातीमध्ये काम करु लागली. प्रियाच्या नाटक, सिरीयल या व्यापामुळे अमोल आणि तिची बरेच दिवस भेट व्हायची नाही. प्रियाच्या घरचे वातावरण खूप फ्री होते. तिच्या घरी मुलगा, मुलगी असा भेद नव्हता. प्रियाचे आईवडील दोघेही ड्रिंक्स घ्यायचे. त्यामुळे प्रिया पण वीस वर्षाची झाल्यावर ड्रिंक्स घ्यायला लागली. तिच्या घरच्यांना ह्यात काही गैर वाटत नव्हते.
अमोलच्या घरचे वातावरण सर्वसामान्य लोकांसारखे होते. तिथे ड्रिंक्स घेणे म्हणजे पाप होते. त्याच्या वडिलांनी कधीच ड्रिंक्स घेतले नव्हते. अमोल शहरात शिकायला आल्यावर मित्रांच्या संगतीने ड्रिंक्स घ्यायला लागला होता. त्याच्या आईवडिलांना ते माहीत नव्हते. अमोलला माहीती होते त्याच्या घरी प्रिया सून म्हणून चालणार नाही त्यामुळे दोघेजण लिव्ह इन रिलेशनशिप राहू लागले. प्रियाच्या आईवडिलांना त्याबद्दल काहीही हरकत नव्हती. पण अमोलच्या आईवडिलांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांना अमोल आणि प्रियाचे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे पटले नाही म्हणून मनाविरुद्ध का होईना अमोल आणि प्रियाच्या लग्नाला त्यांनी परवानगी दिली.
अमोलने प्रियाला लग्नाच्या आधीच सांगितले होते. माझ्या घरी ड्रिंक्स पिलेले चालत नाही. त्यामुळे प्रिया अमोलच्या आईवडिलांसमोर कधीच ड्रिंक्स करत नव्हती. पण आज तिच्या नाटकाचा हजारावा प्रयोग होता म्हणून पार्टी होती. नाटकातील सहकलाकारांच्या हट्टाला बळी पडून ती आज ड्रिंक्स करुन घरी आली. तिला असं बघून अमोलला खूप राग आला. तो तिला खोलीत घेऊन आल्यावर तिच्यावर ओरडत म्हणाला,
“प्रिया तुला माहीत आहे ना आपल्या घरी ड्रिंक्स घेतलेलं चालत नाही. तरी तू आज ड्रिंक्स करुन आलीस. ते पण आईबाबा घरी असताना. मी तुला ड्रिंक्स घ्यायची परवानगी दिली ह्याचा तू गैरफायदा घेते आहेस.”
“एक मिनिटं अमोल. मी तुझा काहीही गैरफायदा घेत नाही आणि मला ड्रिंक्स घ्यायला तुझ्या परवानगीची अजिबात गरज नाही. नाटकातील सहकलाकारांनी खूप आग्रह केला त्यामुळे मी केलं ड्रिंक्स. सॉरी, आईबाबांच्या समोर ड्रिंक्स करुन यायला नको होते. मी त्यासाठी त्यांना सॉरी म्हणेल. पण एका दृष्टीने बरंच झालं. मला हे लपून छपून ड्रिंक्स घ्यायला आवडत पण नव्हते. आईबाबा माझ्यावर किती विश्वास ठेवतात. त्यांना माझ्या कलेचा किती अभिमान आहे.”
“प्रिया मला वाटतं आता तू नाटकात काम करणं सोडून दे. मला तुझे हे उशिरा येण आवडत नाही. त्यात आज तू ड्रिंक्स घेऊन आलीस. आता आपलं लग्न झालं आहे. मी म्हणत नाही तू घरी बस. पण हे नाटाकात, सिरीयलमध्ये काम नको करुस. त्याऐवजी तू डान्सिंगचे क्लासेस घे. तू उत्तम डान्सर आहेसचं. आपण एखादा फ्लॅट भाड्याने घेऊ त्यासाठी.
“परत चालू झाले का अमोल तुझे? अमोल माझ्या नाटकातील भूमिका बघूनच तू माझ्या प्रेमात पडलास ना. एवढे दिवस तुला माझ्या अभिनयाचा अभिमान होता आणि आता लग्न झाल्यावर काय झालं? मी अजिबात अभिनय करणं सोडणार नाही. ते माझं पॅशन आहे. मी तुला लग्नाच्या आधीच सांगितले होते. आपण लग्न करायला नको आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू. मला हे संसार, स्वयंपाक, पाणी जमणार नाही. पण तू तुझ्या आईबाबांच्या इच्छेखातर लग्न केलेस. लग्नाच्या आधी तू मला म्हणाला होतास. तू तुझी सर्व स्वप्न पूर्ण कर मी तुझ्या स्वप्नांच्या मध्ये येणार नाही, मग आता काय झालं? अमोल आपण रोज ह्याच विषयावर भांडण्यापेक्षा घटस्फोट घेऊन टाकू.”
“सारखं काय प्रिया तुझं घटस्फोट घेऊ चाललं आहे. अगं, तुझ्या नाटक, सिरीयल दोऱ्यामुळे आपण किती दिवसात एकमेकांशी नीट बोललो सुद्धा नाही. बाकीच्या गोष्टी लांबच राहिल्या. अगं आपल्या लग्नाला आता कुठे फक्त सहा महिने झाले आहेत.”
“अमोल आता मी खूप थकले आहे. मला खूप झोप येत आहे. ह्या विषयावर आपण उद्या बोलू, प्लीज. शुभ रात्र.”
सकाळी प्रियाचे सासू सासरे तिच्या ड्रिंक्स घेण्यावर काय प्रतिक्रिया देतील? वाचू या पुढच्या भागात.
©️®️ ज्योती सिनफळ
