प्रिया सकाळी आठ वाजता उठून हॉलमध्ये आली तेव्हा अमोल नाश्ता करत होता. अमोल सकाळी शिरा खात होता ते बघून ती चिडली आणि त्याला म्हणाली,
“अमोल, तू हे काय खातो आहेस? मी तुला सकाळी ओट्स खा म्हणून सांगितले ना. अरे ह्यामुळे तुझं वजन वाढेल.”
“प्रिया सकाळी सकाळी भांडण नको करुस.
मला नाही आवडत ते ओट्स वगैरे. माझं पोट नाही भरत त्याने.”
“मी भांडण करते आणि काल कोण भांडण करुन झोपलं? तू काल पार्टीला येणार होतास. पण आला नाहीस. सगळेजण विचारत होते तुझा नवरा नाही आला. माझ्या कलेचा आता तुला कौतुकचं राहिलं नाही. त्यामुळेच तू ते मला सोडायला सांगतो आहेस.”
“प्रिया मी तुला आधीच म्हणालो होतो. मी नाही येणार पार्टीला. मला नाही आवडत ती पार्टी. तुला आपल्या संसारापेक्षा नाटक महत्त्वाचे आहे ना तर तू नाटक कर. तू म्हणतेस तसं आपण वेगळं होऊन जाऊ. तू तुझ्या मार्गाने. मी माझ्या मार्गाने. असं म्हणून रागाने दार लावून अमोल ऑफिसमध्ये गेला.”
प्रिया रडत तिथेच डायनिंग हॉलमध्ये खुर्चीवर बसली. तिच्या सासूबाई तिच्या जवळ आल्या आणि डोक्यावरुन हात फिरवत म्हणाल्या,
“तुला कॉफी देऊ का?”
“सॉरी आई, काल तुम्ही गावावरुन आलात आणि मी घरी नव्हते. काल माझ्या नाटकाचा हजारावा प्रयोग होता त्याची पार्टी होती. आई काल मी ड्रिंक्स घेऊन आलेलं तुम्हाला आणि बाबांना आवडलं नसेल सॉरी. पण मी आधीपासूनच ड्रिंक्स घेते. माझे आईबाबा पण घेतात. म्हणजे आमच्या घरी चालतं हे. मला अमोलने सांगितले होते आपल्या घरी चालतं नाही ड्रिंक्स. पण काल पार्टी होती आणि सहकलाकारांनी आग्रह केला म्हणून मी केलं ड्रिंक्स. पण म्हणजे मी रोज नाही घेत ड्रिंक्स. कधीतरी घेते.”
“आमची काही हरकत नाही प्रिया तुझ्या ड्रिंक्स घेण्यावर. तू त्या वातावरणातून आली आहेस. तुझ्या क्षेत्रात ते चालत. महत्वाचे म्हणजे अमोलला चालतं. मला काल राग फक्त एकाच गोष्टीचा आला की तू ड्रिंक्स घेऊन स्वतःचा तोल सावरू शकत नव्हतीस ह्याचा. बाई असू दे किंवा पुरुष एकदा तोल गेला की तो सावरणे अवघड असते. व्यसन कुठलेही असो ते वाईटच असते. त्यात ते लपून छपून करणे चुकीचे. अमोल सुद्धा ड्रिंक्स घेतो हे तुझ्याकडून आम्हाला कळले. माझं एवढंच म्हणणे आहे ड्रिंक्स पायी तुमचा संसार पणाला लावू नका. तुमच्या लग्नाला आता कुठे सहा महिने झाले आहेत. पण तुमच्यामध्ये मला कुठेच प्रेम, संवाद दिसत नाही. तुमचा संसार चांगला चालू आहे ना प्रिया.”
“ आई मला तुमच्याशी खोटं नाही बोलता येणार, पण सध्या अमोल आणि माझ्यामध्ये फार भांडणे होतात. आई तुम्हाला तर माहिती आहे मला एक यशस्वी अभिनेत्री व्हायचे आहे. पण अमोलला वाटते मी ते सर्व सोडून एक संसारी बाई व्हावं. करीयर करायचं असेलतर डांन्स क्लास उघडावा. पण मला ते शक्य नाही.”
“अगं प्रिया तुमच्या लग्नाला आता कुठे सहा महिने झाले आहेत. तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायला हवा. त्याला तुझं नाटक, सिरीयलमुळे होणाऱ्या दौऱ्याचा विरह सहन होत नसेल. म्हणून तो तुला तसं म्हणत असेल. तसं काही त्याच्या मनात नाही. त्याला तुझ्या कलेचा किती अभिमान आहे.”
“अहो, आई अमोलला हे सर्व लग्नाच्या आधी माहिती होते. लग्नाच्या आधी पण मी नाटक, सिरीयलच्या दौऱ्यासाठी पंधरा,पंधरा दिवस बाहेर असायचे. नाटक, सिरीयल करण्याच्या आधिच आम्ही तारखा दिलेल्या असता निर्देशकाला आई आणि समजा अमोल माझ्या जागी असता तर तुम्ही त्याला म्हटला असता का? तुझं नवीन लग्न झालं आहे दौऱ्यावर जाऊ नकोस. बायको सोबत वेळ घालव मला पण वाटतं एकमेकांसोबत वेळ घालवावा पण कामामुळे ते शक्य नाही आई.”
“तुझं सगळं बरोबर आहे प्रिया. पण त्यासाठी घटस्फोट हा एकचं उपाय तर नाही ना. तुम्ही दोघे एकत्र बसा एकमेकांशी बोला. काहीतरी मार्ग काढा.”
“तुम्हाला बोलला का अमोल घटस्फोटबद्दल?”
“हो बोलला तो."
“मग काय करणार आई? रोजच्या भांडणापेक्षा घटस्फोट घेऊन वेगळे झालेलं बरं.”
“अगं, लोक काय म्हणतील? सहा महिने नाही झाले लग्नाला आणि घटस्फोट झाला ह्यांचा.”
“अहो आई लोकांचं काय करायचं आपल्याला? आम्ही दोघं एकमेकांना सात वर्षांपासून ओळखतो पण लग्नानंतर नाही जुळले आमचे विचार.”
“अगं प्रिया लग्न, संसार म्हणजे भातुकलीचा खेळ नव्हे. थोडा वेळ खेळला आणि कंटाळा आला म्हणून संपवला. मी फक्त तुला नाही समजावत अमोलला पण समजावते. विचार करा दोघे जण. घरात ढेकूण झाले म्हणून कोणी घर नाही जाळत गं. त्या ढेकणांना मारण्याचा उपाय शोधतात.”
प्रिया आणि अमोल घटस्फोट घेण्याचा विचार बदलतील का? अमोलने प्रियाला समजून घ्यायला हवे का? की प्रियाने पण अमोलला समजून घ्यायला हवे. वाचा पुढच्या भागात.
©️®️ ज्योती सिनफळ
