Login

संवाद भाग - चार

बोलण्याने प्रश्न सुटतात
अमोलची आई त्याच्या वडिलांना म्हणाली,


“काय झालं हो हे? मुलांच्या सुखासाठी आपण त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आणि आता ते सहा महिने नाही झाले लग्नाला तर घटस्फोट घेणार. लोक काय म्हणतील आपल्याला? माझ्या मते अमोलच म्हणणं बरोबर आहे. प्रियाने आता लग्न झालं तर नाटक वगैरे बंद करायला हवे आणि काल काय ते तिचे जीन्स आणि टि शर्ट कपडे घालणं बंद करायला हवं आणि काल ते ड्रिंक्स घेतलेलं पण मला पटलं नाही पण आपला मुलगा पण घेतो तर त्याबद्दल काय बोलणार आपण? लग्न झालेल्या बाईने कसं घर संसार सांभाळून करीयर करायला हवं”


“अगं पण ते तिचं करीयर आहे. ती स्त्री आहे, लग्न झालं म्हणून तिने ते सोडावं हा तुझा आणि तुझ्या मुलाचा आग्रह का?”


“आता बरोबर सुनेची बाजू घेता. मी पण बी एड केलं होतं. मला शिक्षिका व्हायचे होते. चांगली इंग्रजी शाळेत नोकरी मिळाली होती. पगार पण चांगला होता. पण तुमची आई नाही म्हणाली म्हणून तुम्ही मला करु दिली नाही नोकरी.”


“त्या वेळी चूक झाली माझी. आता त्यासाठी तुझी माफी मागतो. आपला संसार झाला आहे आता. तुझी सासू तुझ्याशी तसं लागली म्हणून तू त्याचा वचपा म्हणून तुझ्या सुनेची तसं वागणार आहेस का? आता आपण आपल्या मुलाचा संसार वाचवायचा ह्यावर चर्चा करतो आहोत. ती करायची की थांबवायची. नाहीतर ते बघतील त्यांचं ते.


“चूक झाली म्हटलं की विषयच संपला.” असं पुटपुटत अमोलची आई त्याच्या बाबांना म्हणाली,


“सॉरी, बोला काय म्हणणं आहे तुमचं”


“रात्री अमोल घरी आल्यावर आपण दोघांना समोर बसवून दोघांचे म्हणणे ऐकू. आपल्या परीने दोघांना समजवण्याचा प्रयत्न करु. एका हाताने कधी टाळी वाजत नाही? आपल्या मुलाचं पण काही तरी चुकत असेल. फक्त प्रियाला दोष देऊन उपयोग नाही.”


“फक्त समजवायचा त्यांना”


“मग काय तिला शिक्षा देऊन जबरदस्तीने संसार करायला लावायचा विचार आहे का तुझा. ते माझ्याकडून शक्य नाही. माझा त्यासाठी तुला अजिबात पाठिंबा नाही. मी फक्त चार समजुतीच्या गोष्टी सांगणार त्यांना, पटल्या तर त्यांनी संसार करावा नाही तर वेगळं व्हावं.”


रात्री अमोल घरी आल्यावर अमोलचे वडील अमोल आणि प्रियाला म्हणाले,


“अमोल आणि प्रिया जेवण झाल्यावर तुम्हा दोघांशी मला काही बोलायचे आहे. सध्या तुम्हा दोघांचे एकमेकांशी पटत नाही. तुम्ही दोघे जण घटस्फोट घेणार आहत. माझे त्याबद्दल काहीही म्हणणं नाही. तुमचा व्यक्तीक प्रश्न आहे. पण घरातील मोठी व्यक्ती म्हणून सल्ला द्यायचा आहे. तो सल्ला पटला तर घ्या नाहीतर सोडून द्या.”


रात्रीचे जेवण चौघांनी शांतपणे केले. जेवण झाल्यावर प्रियाने स्वयंपाकघर आवरले आणि ती हॉलमध्ये आली. तिथे आधीच अमोल आणि आईबाबा टीव्ही बघत बसले होते. प्रिया आल्यावर अमोलचे वडील दोघांना म्हणाले,


“अमोल आणि प्रिया तुम्ही दोघं एकमेकांना सात वर्षांपासून ओळखता. तुम्हा दोघांनाही एकमेकांच्या आवडीनिवडी लग्नाच्या आधी माहिती होत्या. त्या तुम्हाला मान्य होत्या किंवा आवडत होत्या म्हणूनच तुम्ही लग्न केलं ना. मग आता तुम्ही दोघं लग्न झाल्यानंतर एकमेकांना बदलायचा का अट्टाहास करत आहात? अमोल तुला आधीपासून माहिती होतं प्रिया नाटकात काम करते. ते तिला आवडत. तिला त्यात करीयर करायचं आहे. तिला नाटकाचे दौरे असणार आहे. ती तुला जास्त वेळ नाही देऊ शकणार. मग आता तू तिच्याकडून अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. ती एक स्त्री आहे म्हणून तिने लग्नानंतर आपल्या आवडीनिवडी, करीयर सोडायचे का? तू मला नेहमी म्हणतोस आई एवढी शिकलेली असताना तुम्ही तिला नोकरी करु दिली नाही. मग आज तू काय करत आहेस?


“पण बाबा मी तिला डान्स क्लास घे म्हणतो आहे ना. उद्या आमचं मुलं झाले की त्यांना तिला वेळ द्यावाच लागेल ना. त्यामुळे आतापासूनच तिने हळूहळू नाटक, सिरीयल करणे बंद करावे असे मला वाटते.


“अरे पण तिला आता मुलं हवं आहे का हे विचारलस का? तू तिच्यावर तुझे निर्णय लादतो आहेस. अमेय तू दारु पितोस हे आम्हाला कधी बोलला नाहीस? काल कळलं आम्हाला प्रियामुळे आणि प्रिया लग्नाच्या आधीपासून ड्रिंक्स करते हे पण तुला माहीत होतं. माझं एवढंच म्हणणं आहे तुझे विचार तिच्यावर लादू नकोस. बाकी तू समजुतदार आहेस.”


“प्रिया मी आता तुझ्या बाजूने बोललो त्यामुळे तू आनंदी असशील. पण तुझे ही कुठेतरी वागणं चुकत आहे. तुला चालत असेल तर बोलतो मी.”



“अहो बाबा बोला ना, न चालायला काय झालं. माझं काही चुकत असेल तर मी ते नक्की दुरुस्त करायचा प्रयत्न करेल. मला अमोल पासून दूर नाही व्हायचं आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम करते. पण तसचं मी माझ्या नाटकावर पण खूप प्रेम करते. ते फक्त माझं करीयर नाही तर तो माझा श्वास आहे.”


“हे बघ प्रिया तू खूप हेल्थ कॉन्शस आहे मला माहित आहे. ते तुझ्या करीयर साठी अगदी गरजेचं आहे. पण तसच हेल्थ कॉन्शस अमयनी पण पाळावं हा तुझा हट्टहास नको करत जाऊ. अगं तू रोज सकाळी ज्यूस, कॉंर्नफ्लेक, ओट्स खाते, जेवणात सॅलड, उकडलेल्या भाज्या खातेस ते खाणं अमोलने खावे हा अट्टहास करुन रोज वाद करण्यात काय अर्थ आहे. तो रोज व्यायाम करतो, पोहे, थालीपीठ, उप्पीट हा नाश्ता काही अनहेल्दी नाही. भाजी पोळी खाणे चुकीचे नाही. ते खाऊन तो फिट आहे. तुला वाटते त्याने फॅशनेबल कपडे घालावे, तुझ्या पार्टीला यावे. तो माझ्या मते बऱ्याच वेळेला येतो. पण नेहमीच तुझ्या पार्टीला येण नसेल जमतं. ह्यावरुन वाद घालणे कितपत योग्य आहे. ह्याचा तू विचार कर.‌ तू काल ड्रिंक्स घेऊन आलीस मला त्यावर आक्षेप नाही. पण स्वतःचा तोल जाईल एवढं ड्रिंक्स घेऊन स्वतःचं नाव खराब करण्यात काय अर्थ आहे. तू नाटकात काम करतेस. त्यामुळे सोशल मिडियाचा तुझ्या मागे सतत पाठपुरावा असतो. तुमचं आयुष्य पर्सनल कमी सोशल जास्त असते.”


“बाकी आता तुम्ही दोघं समजूतदार आहात. तुम्ही दोघे एकत्र बसून बोला आणि निर्णय घ्या. घटस्फोट घ्यायला वेळ लागत नाही. लग्नानंतर एकमेकांसोबत राहिल्यावर एकमेकांचे गुणदोष जास्त कळतात. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या वातावरणात, संस्कारात वाढलेली असते. तिचं लग्न झालं म्हणून तिने बदलावे. आपल्या रंगात रंगावे हे चुकीचे आहे. संसार म्हटलं की वादविवाद होणारचं. पण म्हणून लगेच घटस्फोट घेण हा त्यावरील उपाय नाही.


बाबांचे बोलणं ऐकून प्रिया आणि अमेय काय निर्णय घेतील? वाचा शेवटच्या भागात.