Login

संवाद भाग - पाच

बोलण्याने प्रश्न सुटतात
अमेय आणि प्रिया आपल्या खोलीत आले. दोघे जण बराच वेळ, शांत बसले. थोड्यावेळाने अमेय प्रियाला म्हणाला,


“प्रिया मला माफ कर मी तुझ्या स्वप्नांच्या आड येत होतो. मी थोडा अहंकारी होऊन तुझ्यावर नवरेपणाचा माझा हक्क गाजवत होतो. मी विसरुन गेलो होतो तुलाही तुझं मत, स्वप्न आहे. मी बाबांना नेहमी म्हणायचो, तुम्ही आई एवढी हुशार असतानासुद्धा तिला तिचे करीयर करु दिले नाही. तिला फक्त चूल आणि मूल ह्या बंधनात अडकवून ठेवले. मी पण आज तेच करत होतो.”


“अमेय फक्त तुझे नाही चुकले. माझेपण चुकले आहे. मी पण माझ्या कलेच्या रंगात तुला रंगवायचा प्रयत्न करत होते. तुला पार्टी, फॅशनेबल कपडे आवडत नाही हे लग्नाच्या आधीपासून मला माहीत आहे. पण मी सुद्धा तुला टिपिकल बायको प्रमाणे आता आपलं लग्न झालं आहे तुला माझं ऐकायला हवं असं वागत होते. तुला माझ्या मुठीत ठेवायला बघत होते. अमेय आपण दोघांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करताना एकमेकांची स्पेस जपायला हवी. एकमेकांच्या क्षेत्राचा मान ठेवायला हवा.”


“अगदी खरं आहे प्रिया. पण आता जे झालं ते झालं. आता आपण दोघांनी एकमेकांना वेळ मिळेल तेव्हा एकमेकांन सोबत वेळ घालवायचा. एकमेकांच्या आवडीनिवडी जपायचा प्रयत्न करायचा. आता तुझे नाटकाचे दौरे नसतील तर आपण कुठेतरी फिरायला जाऊ. आईबाबा आले आहेत. त्यांना पण घेऊन जाऊ या. तुझी हरकत नसेल तर. आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करुया.”


“हो चालेल अमेय पुढच्या एक आठवडा मी मोकळी आहे. चल आईबाबांना आपला निर्णय सांगू या.”


“आईबाबा तुम्ही सांगितले आम्हा दोघांना पटलं आहे. आम्ही दोघेजण आता एकमेकांच्या आवडीनिवडी. विचार एकमेकांवर लादणार नाही. आमचा संसार सुखाचा होण्यासाठी आम्ही दोघेजण प्रयत्न करु. त्यासाठी एकमेकांना वेळ देऊ. एकमेकांशी संवाद करु. आईबाबा आता आमच्या नव्या नात्याची सुरुवात करण्यासाठी आम्ही कुठेतरी फिरायला जायचं ठरवत आहोत. तुम्ही पण चला आमच्या बरोबर.” असं अमेय आईवडिलांना म्हणाला.


“खूप छान बातमी दिली असंच कायम एकमेकांसोबत प्रेमाने रहा. संसार करताना अडचणी येणार, रुसवेफुगवे होणार म्हणून लगेच घटस्फोट घेऊ नका. त्यावर उपाय शोधा. महत्त्वाचे म्हणजे एकमेकांना वेळ द्या. संवाद करा एकमेकांसोबत. ते मोबाइलवर नाही तर समोरासमोर. संवादाने आयुष्यातील बरेच प्रश्न सुटतात. कोणाचं कुठे चुकत आहे ते बघा. कोणीतरी एकाने एक पाऊल मागे घ्या. नवराबायकोमध्ये मी पणा येऊ देऊ नका आणि ह्यावेळी तुम्ही दोघेजणचं फिरायला जा. तुमच्यामधील गैरसमज दूर करा. पुढच्या वेळी आम्ही येऊ तुमच्या सोबत."

©️®️ ज्योती सिनफळ


0

🎭 Series Post

View all