सापळा द ट्रॅप 2

एका आईच्या संघर्षाची गोष्ट
सापळा द ट्रॅप.
भाग २


मागील भागात आपण पाहिले ऍडव्होकेट विद्या कोर्टातून सरळ तिच्या मुलाला भेटते. आपल्या मुलाची अवस्था पाहून विद्याला मागील काळ आठवायला लागतो. पोलीस चौकशी सुरू असतानाच मिडिया विवान दोषी आहे असे जाहीर करते.

आता पाहूया पुढे.


सगळीकडे एकच चर्चा चालू होती. घरी आल्यावर कितीतरी वेळ विवान सुन्न बसून होता. विद्या हतबल होऊन आपल्या लेकाकडे बघत असताना तिला जाणीव झाली की आपणच असे हरून बसणे योग्य नाही. तिने प्रशिक्षकांना फोन लावला.


"सर, हे सगळे काय चालू आहे? डोपिंग चाचणी घेऊन आठवडा तर झाला आहे. आता पुन्हा कशाला?" विद्या चिडून बोलत होती.


"मॅडम, पोलीस चौकशी आणि प्रक्रिया करावीच लागेल. तसेही आपण घाबरायचे कारण नाही." सरांनी समजावले.


"पिल्लू, मी आहे ना. काहीही होणार नाही. बातम्या काय? लोक नवीन बातमी आल्यावर विसरून जातात." विद्याने फोन ठेवला आणि विवानजवळ जात त्याला खूप समजावले तेव्हा तो शांत झाला.


रात्री उशिरा त्याला झोपवून विद्या तशीच पडून राहिली. विवान तिच्या जगण्याचा एकमेव आधार होता. बाहेरच्या जगात प्रसिद्ध लढावू वकील असलेली विद्या इथवर पोहोचताना प्रचंड संघर्ष करून आली होती. काहीही झाले तरी विवान ह्यात अडकता कामा नये. या विचारांच्या गर्तेत असताना झोप कधी लागली तिला समजलेच नाही.


दुसऱ्या दिवशी सकाळी विद्याने आपल्या सगळ्या अपॉइंटमेंट रद्द केल्या आणि ती विवानसोबत निघाली. दोघेही दिलेल्या ठिकाणी पोहोचले. गाडीतून उतरत असतानाच एक पत्रकार धावत आला.


"विद्या मॅडम, आपण नेहमी गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी लढला आहात. आता तुमचा लेक दोषी असेल तर तुम्ही काय करणार?" पत्रकार खोचकपणे म्हणाला.


"पोलीस, कोर्ट आणि यंत्रणेवर माझा जितका विश्वास आहे तितकाच माझ्या लेकावर देखील आहे." विद्याने शांतपणे उत्तर दिले.


विवान सँपल देऊन आला. विद्या आपल्या लेकाला घेऊन घरी आली. आता दोन दिवसांनी चाचणीचे रिपोर्ट येणार होते. विवान अगदी बावरला होता.

‘कर्रऽऽ’

ब्रेक दाबल्याचा आवाज झाला आणि विद्याच्या विचारांची तंद्री तुटली.


"रघु काय झाले ? एवढा अचानक ब्रेक दाबला?" विद्या जोरात ओरडली.


"मॅडम, एक बाई गाडीच्या समोर आली आहे. आपण खाली उतरून बघू. मी ब्रेक लावला त्यामुळे तिला जास्त लागले नसेल." रघु घाईने दार उघडत बोलत होता.


पाठोपाठ विद्या खाली उतरली. एक कृश देहयष्टी असलेली स्त्री पडली होती. तिला बरेच खरचटले होते. रात्रीचे अकरा वाजले होते.


"रघु , हिला उचलून गाडीत घे. हॉस्पिटलमध्ये नेऊ. "
विद्याने तिला पाहून सूचना दिली.


रघुने आणि विद्याने त्या स्त्रीला गाडीत टाकले आणि गाडी हॉस्पिटलकडे वळवली. नेहमीचे डॉक्टर असल्याने त्यांनी तिला तपासले.


"विद्या, सिरियस काहीच नाही; पण पोलिसांना इन्फॉर्म करायला हवे." डॉक्टरांनी उपचार करताना म्हणाले.


विद्याने पोलिसांना कळवले. सगळी प्रक्रिया पूर्ण करून घरी यायला रात्रीचे तीन वाजले होते. बिछान्यावर पडल्यावर विद्याला थकवा आल्याने झोप केव्हा लागली तेही समजले नाही.


दुसऱ्या दिवशी फोनच्या आवाजाने विद्याला जाग आली. तिच्या मदतनीस आल्या होत्या. विद्याने दरवाजा उघडला.


"ताई, तुम्ही अंघोळ करून या. जरा कडक कॉफी करते." सुमनताई हसून म्हणाली.


विद्या अंघोळीला गेली. काल विवानची अवस्था पाहून विद्याला अजूनही काही सुचत नव्हते. आठवणी थांबतच नव्हत्या.

विवान पहिल्यांदा डोपिंग चाचणी करताना एवढा अस्वस्थ होता. दोन दिवसांनी रिपोर्ट आले. विवान दोषी नसल्याचे सिद्ध झाले आणि विद्याने सुटकेचा निःश्वास सोडला. विवान पुन्हा एकदा सराव करू लागला.

लवकरच आशियाई स्पर्धा होणार होत्या. एक दिवस विवान आनंदाने ओरडतच घरी आला.


"मॉम, मॉम लवकर बाहेर ये. मी सिलेक्ट झालो आहे. देशासाठी खेळायचे स्वप्न पूर्ण झाले." विवान ओरडत होता.


विद्याला प्रचंड आनंद झाला. तिने लगेच देवापुढे साखर ठेवली.


"ताई, फोन वाजतोय कधीचा." सुमनताई ओरडल्या आणि विद्या विचारांना आवरून बाहेर आली.
मोबाईलवर जवळपास सात आठ मिसकॉल होते.


"ऍडव्होकेट विद्या राघव स्पीकिंग." विद्याने शांतपणे संभाषण सुरू केले.


"इन्स्पेक्टर राजन बोलतोय मॅडम. काल तुम्ही अपघाताची तक्रार नोंदवली त्याबाबत जरा बोलायचे होते. तुम्ही पोलीस स्टेशनवर येऊ शकता का?"
राजनने विचारले.

विद्याने नाष्टा केला आणि रघुला गाडी काढायला सांगितली. विद्या पोलीस स्टेशनवर पोहोचली. समोर उभा असलेला एक पोलीस अधिकारी आहे की चित्रपट अभिनेता? असा तिला प्रश्न पडला.

"ऍडव्होकेट विद्या राघव?" तितक्यात समोरून त्याने हाक मारली.

विद्याने होकार दिला.


"इन्स्पेक्टर प्लीज थोडे लवकर पूर्तता करा. मला कोर्टात जायचे आहे." विद्या घाई करत होती.


"मॅडम, काल तुमच्या गाडीसमोर आलेल्या बाई कोण आहेत ओळखले नाही का तुम्ही?" इन्स्पेक्टर राजन अंदाज घेत होता.


"नाही, त्यांना मी पूर्वी पाहिले आहे असे नाही वाटत."
विद्याने सरळ उत्तर दिले l.


राजन मंद हसला. त्याने काही फोटोग्राफ विद्याच्या समोर ठेवले. फोटो पाहताच विद्या दचकली. रात्री अंधारात रस्त्यावर मळकट अवतारात सापडलेली ती बाई म्हणजे अनामिका रॉय आहे?


"इज शी अनामिका रॉय?" विद्याला अजूनही विश्वास बसत नव्हता.

"येस, शी इज अनामिका रॉय. मदर ऑफ प्रणिती रॉय."
राजन शांतपणे म्हणाला.


"इन्स्पेक्टर, ती बोलू शकते का?" विद्याने विचारले.


"नाही, त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसलेला आहे."
राजन म्हणाला.


विद्याने सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि गाडी सरळ हॉस्पिटलकडे वळवली. आजच्या केसेस बघायची सूचना मायाला देऊन तिने आपला फोन सरळ बंद केला.


इकडे पोलीस स्टेशनवर राजन सावध होता.

"माने, आपली माणसे कामाला लावा. ऍडव्होकेट विद्या आणि अनामिका दोघींवर लक्ष ठेवा. विद्या नक्कीच तिला घरी घेऊन जाईल." राजनने भराभर सूचना दिल्या.


विद्या मनात देवाचे आभार मानत होती. गेले तीन महिने ज्या बाईला तिने वेड्यासारखे शोधले होते ती स्वतः च तिला सापडली होती.


"रघु गाडी समोरच्या हॉटेलजवळ घे.” विद्याने सूचना दिली.

रघुने गाडी पार्क केली. विद्या वेगाने आत शिरली. थोड्याच वेळात हॉटेलच्या मागच्या दारातून एका रिक्षात बसून विद्या निघाली. तिने डॉक्टर विनयला फोन लावला.


"विनय, मला तुमची मदत हवी आहे." फोन संपला आणि दहा मिनिटांनी एक नर्स पेशंट घेऊन बाहेर पडत असल्याचा फोटो विद्याच्या मोबाईलवर आला.


विद्याने रिक्षा थांबवली. रिक्षावाला जाताच तिने दुसरी रिक्षा केली आणि तासाभरात विद्या आणि डॉक्टर विनय बदलापूरजवळ भेटले.


कोण असेल ही अनामिका? विवानशी याचा काही संबंध असेल का? विनय विद्याला नेमकी काय मदत करेल?

वाचत रहा, सापळा द ट्रॅप.

©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all