सापळा द ट्रॅप भाग 1

मुलाला वाचवण्यासाठी लढणाऱ्या एका आईची गोष्ट
सापळा द ट्रॅप. भाग १

"मॅम, दे आर कॉलिंग फ्रॉम लास्ट टू अवर्स." कोर्टात सुरू असलेली सुनावणी संपली आणि तिची असिस्टंट ऍडव्होकेट मायाने तिच्या हातात फोन ठेवला.


"हॅलो, ऍडव्होकेट विद्या राघव स्पीकिंग." तिने फोन हातात घेऊन एक दीर्घ श्वास घेतला आणि चेहरा स्थिर करून शक्य तेवढा शांत आवाज ठेवून संभाषण सुरू केले.


"ऍडव्होकेट विद्या, प्लीज तुम्ही शक्य होईल तितक्या लवकर इकडे या." समोरून इतकेच बोलून फोन ठेवला.


विद्या कोर्टाच्या बाहेर आली. मायाला घरी जायला सांगून ती गाडीत बसली.

"रघु,गाडी तिकडे घे." विद्याने ड्रायव्हरला सूचना दिली आणि शांतपणे डोळे मिटून घेतले.


रघु सफाईदार गाडी चालवत होता. गेली पाच वर्ष तो विद्यासोबत होता. थोड्याच वेळात गाडी शहराच्या बाहेर पडली. एका खाजगी मेंटल असायलमेंट बाहेर गाडी थांबली. विद्या गाडीतून उतरून इमारतीच्या दिशेने चालू लागली. आता जाताच तिला डॉक्टर विनय भेटले.


"डॉक्टर काय झाले? असे इतके फोन कधी येत नाहीत इथून?" विद्याचा आवाज कापत होता.


"टेक अ सीट मिसेस विद्या राघव. तुम्ही आधी शांतपणे मी सांगतो ते ऐका." विनय शक्य तितके नॉर्मल बोलत असला तरी काहीतरी अघटीत घडल्याचे विद्याने ओळखले होते.


डॉक्टर विनय समोर बसले आणि त्यांनी लॅपटॉप ऑन केला. समोरचे फुटेज बघूनच विद्याला घाम फुटला. तिचा अवघा पंधरा वर्षांचा मुलगा विहानने आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. त्याने विवस्त्र होऊन संपूर्ण अंगावर जखमा केल्या होत्या.
‘आई मला माफ कर. पण खरच मी काहीच केलेले नाही. बाप्पा शपथ.’ भिंतीवर रक्ताने लिहिलेले शब्द वाचून विद्याच्या सर्वांगाला कंप सुटला होता.


"ऍडव्होकेट विद्या, विनय गेले तीन महिने इथे आहे. तो कोणाशीच एकही शब्द बोलत नाही. त्याला ड्रग घेतले म्हणून बालसुधार गृहात टाकले आणि नंतर मग तो इथे आला. तर तो इथे कसा?" लॅपटॉप बंद करत विनय एकेक शब्द शांतपणे बोलत होता.


आता डॉक्टर विनयच्या समोर सुप्रसिद्ध वकील ऍडव्होकेट विद्या नव्हती तर होती एक हतबल आई.


"डॉक्टर, विवान अतिशय हुशार मुलगा आहे, ही वॉज अ बॅडमिंटन प्लेअर अँड अ रायझिंग स्टार. पण एका स्पर्धेत डोपिंग चाचणी झाली आणि त्यात विवान ड्रग घेत असल्याचे सापडले. आय वॉज शॉक. त्यानंतर कोर्टाने त्याला सुधारायची संधी दिली. परंतु दुसऱ्या स्पर्धेत पुन्हा सापडला आणि त्याची रवानगी सुधारगृहात झाली." विद्या बोलायची थांबली.


"मिसेस विद्या, तुम्ही स्वतः एक वकील आहात. तुम्ही सत्य शोधायचा प्रयत्न नाही केला?" डॉक्टर विनयने विचारले.


"डॉक्टर विनय मी एक वकील आहेच पण त्याच्या आधी एक आई आहे. मी एकेक धागा शोधला परंतु विवान ड्रग घेत आहे हे सिद्ध झाले. पुरावे स्वच्छ होते." विद्याने उत्तर दिले.


"पण जर कोणी नकळत त्याला ड्रग देत असेल तर?" डॉक्टर विनय म्हणाले.


"डॉक्टर, कायदा जर आणि तरचे तर्क मानत नाही. मला आता फक्त विवान ठीक व्हायला हवा आहे." विद्याने एकदा आपल्या लेकाला दुरूनच पाहिले आणि डोळ्यातले अश्रू थोपवत ती बाहेर पडली.


बाहेर पडल्यावर विद्या गाडीत बसून शांतपणे बसून राहिली. तिने कितीही अडवायचा प्रयत्न केला तरी आठवणी थांबत नव्हत्या. किंबहुना गेले सहा महिने विद्या आणि विवान दोघांसाठी काळ जणू गोठला होता. आजही विद्याला तो दिवस लख्ख आठवत होता.


"मॉम, निघतो मी. आज अंडर सेवेंटिन फायनल आहे." विवान बाहेरून ओरडला.


"विवान, थांब. दही घेऊन जा." विद्या पटकन बाहेर आली. तिच्या मदतनीस कमलताई दही घेऊन आल्या.


"बेस्ट ऑफ लक चॅम्प." विद्याने त्याला शुभेच्छा दिल्या.


"विवान सॉरी पण आज खूप महत्वाची केस आहे. मला जमणार नाही रे तुझी मॅच पाहायला येणे." विद्या अपराधी स्वरात म्हणाली.


"कम ऑन मम्मा, तू सगळे सांभाळताना तुझी होणारी कसरत मी पाहतोय. काळजी नको करुस." विवान एवढे बोलून निघून गेला आणि विद्या कोर्टात जायला निघाली.


त्या दिवशी अतिशय महत्वाची केस होती. एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची केस विद्या लढत होती. तिच्या शेजारी राहणाऱ्या दोन नराधम तरुणांनी अमानुष अत्याचार करून तिला मारायचा प्रयत्न केला होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून ती वाचली होती. त्यावेळी ते दोन्ही तरुण अमली पदार्थांच्या अंमलाखाली असल्याचे सिध्द झाले होते. त्याच केसची आज अंतिम सुनावणी होती.


विद्या कोर्टात कोर्टात उभी राहिली आणि तिने युक्तिवाद सुरू केला. शेजारीच राहणाऱ्या ह्या दोन तरुण मुलांनी व्यसनाच्या आहारी जाऊन केलेला अमानुष गुन्हा लक्षात घेऊन त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी असा युक्तिवाद तिने कोर्टात मांडला. ह्या तरुणांना इतक्या सहज असे पदार्थ कसे मिळतात याबाबत देखील कोर्टाचे लक्ष तिने वेधले होते. गेले वर्षभर चाललेली केस अखेर संपली होती. न्यायाधीशांनी अंतिम निकाल दिला.


त्या तरुणांना शिक्षा झाली आणि विजयी मुद्रेने विद्या आपल्या चेंबरमध्ये आली. तिने मोबाईल हातात घेतला. विवान जिंकला असल्याचा मॅसेज आला असेल याची तिला खात्री होती. जवळपास पंधरा वीस मिसकॉल एका अनोळखी नंबरवरुन आले होते. विद्याने घाईने तो नंबर फिरवला.

"हॅलो, कोण बोलतेय?" तिने शक्य तेवढा संयम राखला.

"ऍडव्होकेट विद्या, इन्स्पेक्टर राम हिअर, तुम्ही आता पोलीस स्टेशनवर या लगेच." पलीकडून उत्तर आले.


"एक मिनिट इन्स्पेक्टर,माझ्या मुलाचा फोन तुमच्याकडे कसा? विवान कुठेय? आज त्याची मॅच होती?" विद्या एकापाठोपाठ एक प्रश्न विचारत होती.


"ऍडव्होकेट विद्या प्लीज, तुम्ही इथे या. तुम्हाला फोनवर काहीच सांगता येणार नाहीय." इन्स्पेक्टर राम परत एकदा म्हणाले. विद्याने फोन ठेवला आणि तडक बाहेर पडली.

पुढच्या पंधराव्या मिनिटाला विद्याची गाडी पोलीस स्टेशनवर होती. गाडीतून उतरून धावतच ती.पायऱ्या चढून गेली. समोर विवान होता. विद्या दिसताच तो पटकन तिच्याकडे धावला.


"मॉम,त्यांना सांग मी काहीच केले नाहीय." विवान रडत म्हणाला.


"इन्स्पेक्टर नक्की काय झालेय एवढे? एका राष्ट्रीय खेळाडूला तुम्ही असे अडकवून ठेवले आहे?" विद्याने प्रश्न विचारला.


"विद्या मॅडम, त्यालाच नाही तर आम्ही सगळ्यांना बोलावले आहे. ह्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंना ड्रग पुरवले गेले आहेत. आम्हाला खेळाडू चेंज करतात तिथे ब्राऊन शुगरची पाकिटे सापडली आहेत." इन्स्पेक्टर राम शांतपणे उत्तर देत होते.


सगळ्या प्रक्रिया करून विद्या आणि विवान बाहेर पडले. समोर झाडून सगळ्या चॅनलच्या एबी उभ्या होत्या. सगळीकडे बातमी झळकत होती. उगवता बॅडमिंटन खेळाडू विवान यास ड्रग प्रकरणात अटक. विद्या आणि विवान कसेबसे गाडीत बसले आणि गाडी सुरू होताच विवान ओक्साबोक्शी रडू लागला.


"मॉम, मी काहीही केलेलं नाहीय गं." विद्या त्याला आधार द्यायचा प्रयत्न करत असतानाच उद्या डोपिंग चाचणीसाठी यायचा मॅसेज झळकला.

काय येईल निकाल?
विवान दोषी आढळेल का?
विद्या आपल्या मुलाला वाचवू शकेल?

वाचत रहा.
सापळा द ट्रॅप.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all