सापळा द ट्रॅप भाग 3

एका आईच्या संघर्षाची गोष्ट
सापळा द ट्रॅप.
भाग ३

मागील भागात आपण पाहिले की विवान पुन्हा खेळायला सुरुवात करतो आणि त्याची देशाकडून खेळण्यासाठी निवड होते. ही आठवण येत असतानाच विद्याला पोलीस स्टेशनवर जावे लागते. तिथून अनामिका रॉयला घेऊन विद्या अज्ञात ठिकाणी जाते. आता पाहूया पुढे.


अनामिका रॉयला बंगल्याच्या आत सोडून नर्स माघारी फिरली. डॉक्टर विनय आतमध्ये होतेच. अनामिका सुन्न अवस्थेत दारात उभी होती. नर्स निघून गेल्याची खात्री पटल्यावर डॉक्टर विनयने तिला आत घेतले. त्यानंतर तिथल्या मदतनीस मावशींना हाक मारली.


"मावशी, हिला स्वच्छ आंघोळ घाला आणि काहीतरी खायला द्या."


त्यांच्या सांगण्यावरून मावशी तिला हाताला धरून आत घेऊन गेल्या. तितक्यात दारावरची बेल वाजली. विनयने दरवाजा उघडला.


"विनय ती सुखरूप पोहोचली का?" विद्याने घाईने आत येत विचारले.


"येस, शी इज. पण तुमच्या मुलाच्या केसबरोबर तिचा काय संबंध आहे?" विनयने विचारले.


"डॉक्टर विनय, तुम्ही नुकतेच इथे जॉईन झाल्याने तुम्हाला काही गोष्टी माहित नाहीत. ही अनामिका रॉय आहे. तिची मुलगी प्रणिती रॉय." ऍडव्होकेट विद्याने एवढे वाक्य उच्चारले आणि विनयने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले.


"म्हणजे तीच प्लेअर ना जिने आत्महत्या केली. डोपिंगमध्ये सापडल्याने आत्महत्या केली." डॉक्टर विनय अधीर होऊन विचारत होता.


"विनय, प्रणिती आणि विवान दोघेही एकाच ठिकाणी सराव करत होते. त्यांनी अनेक स्पर्धा एकत्र गाजवल्या आहेत. परंतु प्रणिती दोषी सापडली आणि अचानक अनामिका गायब झाली. त्यानंतर पंधरा दिवसांनी विवान दोषी सापडला तेदेखील परदेशात चालू असणाऱ्या स्पर्धेत." एवढे बोलून विद्या थांबली.


"एक मिनिट म्हणजे कोणीतरी ह्या खेळाडूंना फसवत आहे किंवा काहीतरी षडयंत्र यामागे असावं." विनय शक्यता व्यक्त करत म्हणाला.


"येस, मी विवान बरोबर बोलायचा खूप प्रयत्न केला डॉक्टर. तो फक्त मी काहीच केलेले नाही इतकचं सांगतो. प्रणिती गेल्यावर तिच्या आईचे गायब होणे मला तेव्हाही खटकले होते." विद्या एकेक मुद्दा मांडत होती.


"प्रणितीचे बाबा किंवा इतर कोणी नातेवाईक?" विनय म्हणाला.


"ही घटना झाल्यावर अनामिका गायब झाली आणि मग ते कुटुंब कायमचे बंगालला निघून गेले. सोशल मीडिया आणि पत्रकारांचा त्रास चुकवून त्यांनी अज्ञातवास पत्करला." विद्या हताश होऊन म्हणाली.


"अनामिका नीट झाली तर बऱ्याच गोष्टी समजतील." विनय पटकन बोलून गेला.


"येस, म्हणूनच मला तुझी मदत हवी आहे." विद्या म्हणाली.


"डोन्ट वरी, मी अनामिका बरी होण्यासाठी सगळे प्रयत्न करेल." विद्या तिथून बाहेर पडली आणि थेट सिद्धिविनायक मंदिरात गेली.


रात्रीचे दहा वाजले होते. आता गर्दी थोडी कमी झाली होती. विद्याने मनोभावे हात जोडले आणि प्रसाद घेऊन निघाली. आजवर आलेल्या अनेक संकटात बाप्पा तिचा आधार होता. त्याच्यावर असलेली श्रद्धा तिला लढायला बळ देत असे.


मेंटल हॉस्पिटलच्या त्या अंधाऱ्या खोलीत कितीतरी वेळ पडून असलेला विवान आता शुद्धीवर आला होता. त्याने किलकिल्या डोळ्याने आसपास पाहिले. हात आणि पायावर असलेल्या जखमा आणि आपण अजूनही जिवंत असल्याची जाणीव झाल्यावर त्याला जोरात रडावे वाटत होते. परंतु तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हता.


आपली आई समोर दिसत असूनही विवान तिच्याशी गेले सहा महिने काहीच बोलत नव्हता. आईसमोर दिसत असूनही विवान गप्प होता. आताही आपण वाचलो ह्याचा त्याला पश्चाताप होत होता. तितक्यात आत जेवण आले आणि त्यासोबत एक चिठ्ठी.


"तुझी आई तोपर्यंत जिवंत असेल जोवर तू गप्प बसशील. ही चिठ्ठी कोणालाही सापडली तर तोच तुझ्या आईच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल." चिठ्ठी वाचली आणि विवान शांत झाला. त्याने चिठ्ठी सरळ खाऊन टाकली आणि न जेवता तसाच झोपून गेला.


इकडे अनामिका फक्त सुन्न बसून होती. डॉक्टर विनयने तिला काहीही विचारले नाही. कितीतरी दिवसांनी तिला खायला,अंघोळ आणि व्यवस्थित कपडे मिळाले असावेत. तिने शांतपणे औषधे घेतली आणि शांतपणे झोपी गेली. गेल्या सहा सात महिन्यात काय भोगले असेल हिने? विनय तिच्याकडे बघून विचार करत होता. हे सगळे दिसते तेवढे सोपे नसल्याची त्याला जाणीव झाली होती.


गेले पंधरा दिवस ह्या हॉस्पिटलमध्ये जॉईन झाल्यावर त्याने स्वतः विवानची केस मागून घेतली होती. कारण ऍडव्होकेट विद्या राघव म्हणजेच त्यांच्या चाळीत राहणारी त्यांची मैत्रीण विद्या शिंदे होती. फक्त हे आतातरी कोणालाच माहित होणार नाही याची ते दोघे पुरेपूर काळजी घेत होते.


गेले पंधरा दिवसात विनयने संपूर्ण अभ्यास केला होता. बाल सुधारगृहात असताना विवानची मानसिक स्थिती खराब झाल्याने त्याला इथे गेले तीन महिने ठेवले होते. त्या तीन महिन्यात त्याने चारवेळा स्वतःला संपवायचा प्रयत्न केला होता.


एखादा मानसिक रुग्ण इतका व्यवस्थित विचार करू शकेल यावर डॉक्टर म्हणून विनय साशंक होता. नक्कीच काहीतरी लपवत असल्याचा त्याला संशय होता. म्हणूनच त्याने एकदा विनयच्या खोलीत असलेल्या कॅमेऱ्याचे फुटेज तपासले होते. त्यात काहीवेळा विवान घाबरलेला असल्याचे दिसत होते. उद्या याचा शोध घ्यायचा त्याने ठरवले.


विद्या घरी आली. आज दिवसभर ती कुठे होती कोणालाच माहित नव्हते. तिने फोन सुरू केला आणि त्यात पहिलाच मॅसेज इन्स्पेक्टर राजनचा होता.


"उद्या संध्याकाळी मला भेटा. लोकेशन भेटीच्या आधी शेअर करेल." विद्याने फोन बाजूला ठेवला आणि आतापर्यंत अडवून ठेवलेला बांध फुटला. तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले.


"ताई, दोन घास खाऊन घ्या." त्यांनी हळू आवाजात विचारले.


“सुमनताई, माझं लेकरु तिकडे त्या कोठडीत आहे हो. काय उपयोग माझ्या वकिलीचा? माझा विवान माझ्यासाठी सगळे जग आहे. राघव अपघातात गेला आणि प्रेमविवाह असल्याने सगळ्यांनी पाठ फिरवली. हा गोड पोरगा माझ्या जगण्याचा आधार आहे. सांगा ना आता कुणासाठी जगू?"


"अग बाय, पार्वती स्वतः च्या नवऱ्याशी भांडून आपल्या लेकाला परत घेऊन आली नव्हं? त्योच गणपती बाप्पा हाय बघ पाठीशी. तुमच्या लेकासाठी जगायला पायजे. लेकरु अंधारात हरवल तर आई अशी त्याला शोधायचं सोडून देत नसती." विद्याचा आकांत पाहून सुमनताई सरळ पुढे झाल्या. त्यांनी तिला सरळ मिठीत घेतले.


सुमनताई जे सुचेल ते बोलत होत्या. गेले चौदा पंधरा वर्षे त्या इथे काम करत होत्या. त्यांनी समजावले आणि थोडे खायला घालून विद्याला झोपवले.


"देवा गजानना, पोरीला हिंमत दे." सुमनताई प्रार्थना करत होत्या.

अनामिका काही सांगेल का?
व्हिवानला कोण धमक्या देत असेल?
विद्या सगळे सत्य शोधून काढेल का?

वाचत रहा.
सापळा द ट्रॅप.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all