सापळा द ट्रॅप भाग 4

एका आईच्या संघर्षाची गोष्ट
सापळा द ट्रॅप.
भाग ४


मागील भागात आपण पाहिले की अनामिका तिच्या मुलीच्या मृत्यूनंतर गायब होते. विवान कुठलाश्या दबावामुळे काहीच बोलत नाही. डॉक्टर विनय आणि विद्या यांची जुनी ओळख असल्याने विनय खोलात जाऊन चौकशी करतात.
आता पाहूया पुढे.


विनयने इथे जॉईन झाल्यापासून सगळी माहिती काढली होती. विवान एकदम शांत झाला होता. कोणाशीही एकही शब्द न बोलणारा हा मुलगा गेल्या तीन महिन्यात चार वेळा स्वतः ला संपवायचा प्रयत्न करतो ह्यात नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे विनयला आतून जाणवत होते. त्याने सगळी तपशीलवार माहिती गोळा केली होती. तीच माहिती पुन्हा चाळताना अचानक विनयला काहीतरी क्लिक झाले. त्याने मावशींना अनामिकाबद्दल सूचना दिल्या आणि सरळ हॉस्पिटल गाठले.


विनय तिथल्या कर्मचारी वर्गाशी खेळीमेळीने वागत असल्याने ते त्याला मनापासून मदत करत असत. ऑफिसात जाताच त्याने शिपायाला दत्तुला बोलवायला पाठवले. दत्तू इथे त्याच्या वडिलांच्या निधनानंतर नोकरीला लागला होता. व्यवहारी आणि चतुर असलेला दत्तू कामातदेखील अत्यंत प्रामाणिक होता. निरोप मिळताच दत्तू हजर झाला.


"डॉक्टरसाहेब,काही काम आहे का?" दत्तूने विचारले.

विनय जागेवरून उठला. त्याने दरवाजा आतून बंद केला.


"दत्तू, आता मी जे बोलणार आहे ते आपल्या दोघातच राहिले पाहिजे." विनय एकेक शब्द बोलत दत्तूचा अंदाज घेत होता.


"डॉक्टर, माझ्या गेल्या तीन वर्षांच्या नोकरीत तुम्ही पहिले डॉक्टर आहात ज्यांनी इतक्या प्रेमानं वागवलं आहे. तुम्ही विश्वास ठेवा." दत्तू भावनिक होऊन म्हणाला.


"आजपासून तू आणि तूझ्या सोबत विश्वासू दोन माणसे विवानची देखभाल करतील." विनयचे बोलणे पूर्ण झाले आणि दत्तू रुग्णाचे नाव ऐकताच थबकला.


"डॉक्टर पण त्या पेशंटला सुशीला सिस्टर आणि त्यांची टीम बघते. खुद्द डीन साहेबदेखील सुशिला सिस्टरची ड्युटी बदल करत नाही. तुम्ही नका यात पडू." दत्तू काळजीने बोलला.


"दत्तू, सुशिला तिच्या राजकीय ओळखी मोठ्या असल्याने मनमानी करते याची मला जाणीव आहे; पण आपण बदल करायचा नाहीच आहे. तुझी तयारी आहे का काम करायची? बाकी सगळे मी बघतो." विनय ठामपणे म्हणाला.


"पण डॉक्टर तुम्ही कशाला यात पडता? हे सगळं प्रकरण दिसतं तितकं सरळ नाही." दत्तू काळजीने म्हणाला.


"दत्तू ,असे समज की त्या मुलाला मदत करायलाच देवाने मला पाठवले आहे." विनय आपल्या मतावर ठाम होता. शेवटी दत्तुने संपूर्ण मदत करायचे आश्वासन दिल्यावर डॉक्टर विनय निवांत झाले.


इकडे विद्याने पुन्हा एकदा प्रणिती रॉय प्रकरण संदर्भ शोधायला सुरुवात केली. सहा महिन्यांपूर्वी ही केस आत्महत्या म्हणून बंद करण्यात आली होती. विद्याने तिच्या असिस्टंट मायाला बोलावले.


"माया, मला प्रणिती रॉय केसमधील सगळे संदर्भ हवे आहे. सुसाईड नोट, पी.एम. रिपोर्ट सगळे काही." विद्या सूचना देत असताना माया काहीतरी विचार करत असल्याचे तिला दिसले.


"माया, तुझे लक्ष कुठे आहे? एवढे महत्वाचे सांगत आहे." विद्या थोडीशी चिडली होती.


"मॅडम, हे सगळे रिपोर्ट तपासून काहीच होणार नाही. आपल्याला प्रणितीच्या मैत्रिणी आणि तिचे प्रशिक्षक, सहकारी खेळाडू यांच्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. खर तर जेव्हा ती गेली तेव्हाच माझा विश्वास बसला नव्हता. परंतु फाईल अचानक बंद झाली." माया भराभर आपले मुद्दे मांडत होती आणि आपण हे विसरलो याचे विद्याला आश्चर्य वाटले.


"माया, ही सगळी माहिती गोळा करशील? आई म्हणून माझ्या जीवाचा प्रश्न आहे हा." विद्या अचानक भावुक झाली.


इकडे इन्स्पेक्टर राजन देखील ह्या सगळ्याचा अभ्यास करत होता. मुळात विद्यासारखी प्रख्यात वकील असताना तिचा मुलगा दोषी ठरला हेच त्याला पटत नव्हते. राजनने मागील संदर्भ शोधायला सुरुवात केली. सब इन्स्पेक्टर मयंक गावडेला बोलावले. गेले पंधरा दिवस अपघात झाल्याने मयंक कामावर नव्हता. आज तो कामावर हजर होणार होता.


"मे आय कम इन सर?" एक पंचविशीत असलेला रुबाबदार तरुण समोर उभा होता.


"येस, यंग मॅन. खरतर तुला भेटायची खूप इच्छा होती." राजन पुढे झाला.


"सर, मलाही तुमच्या हाताखाली शिकायला आवडेल." मयंकने हसून उत्तर दिले.


"मयंक, प्रणिती रॉय आत्महत्या केस कोणाकडे होती?" राजनने प्रश्न विचारताच मयंक सावध झाला.


"सर सिस्टीम विरोधात जाणारा.. जाऊ द्या." इकडे तिकडे बघत हळूच म्हणाला.


"मयंक, आपण ह्या केसवर काम करतोय. फक्त कोणालाही न कळू देता." मयंक एक धाडसी केस सोडवता येईल म्हणून प्रचंड खुश झाला.


इन्स्पेक्टर राजनने हवालदाराला ऍडव्होकेट विद्या राघव यांना पोलीस स्टेशनवर बोलवायला सांगितले. परंतु विद्याने कोर्टात जायचे असल्याने हवालदार कदमला परत पाठवून दिले. विद्या कोर्टाचे कामकाज संपवून बाहेर पडली आणि समोरच पोलिसांची गाडी उभी होती.


"मॅडम तुम्हाला आमच्यासोबत यावे लागेल." हवालदार म्हणाला.


"का पण? मी एक वकील आहे विसरू नका." विद्या चिडली.


"मॅडम राजन साहेबांनी सांगितले आहे की अनामिका रॉय गायब झाली त्याबाबत तुमची चौकशी केली जाणार आहे." हवालदार म्हणाला.


विद्या नाईलाजाने तिकडे पोहोचली. जवळपास तासभर झाला तरी राजन येत नाही ते बघून विद्या चिडली.


"हे बघा कदम तुमच्या राजन साहेबांना निरोप द्या. वॉरंट घेऊन या. मग बोला." विद्या सरळ उठून बाहेर आली.


समोरून राजन एका स्त्रीसोबत भाजीची पिशवी घेऊन येत होता.


"मिस्टर राजन, माझ्या तासाभराच्या हिअरींगसाठी लोक लाखो रुपये मोजतात. तुम्ही सरळ मला इथे बसवून भाजी आणायला गेलात?" विद्या चिडली होती.


"मॅडम पोलीस असलो तरी मला भूक लागते हो." राजन पटकन बोलून गेला. विद्या धाडकन कारचा दरवाजा बंद करून निघाली.


"प्रणिती सोबत दुहेरीत खेळणारी एक खेळाडू आपल्याशी गुप्तपणे बोलायला तयार आहे." आत बसताच मॅसेज पिंग झाला.


"रघु, आता पुढचा तासभर मला झोप घेऊ दे.” काहीतरी चांगले घडल्याचे पाहून विद्या शांतपणे रघुला म्हणाली.


तिने डोळे मिटले आणि विवानचा चेहरा समोर आला. गालावर खळी पडणारा, रेशमी केस असलेला आणि प्रचंड आनंदी असलेला आपला लेक असा संकटात असल्याचे आठवून तिला भरून आले.

‘नाही एक वकील हरली तरी आई हरणार नाही. विवान बेटा लवकरच तुझी सुटका करेल तेव्हाच नाव लावेन, ऍडव्होकेट विद्या राघव.’ विद्याच्या मनात अनेक विचारांची आवर्तने उमटत होती.


मयंकने हवालदार शर्माला चहा आणायला बाहेर पाठवले आणि तेवढ्या वेळात प्रणिती रॉय प्रकरणाची सगळी माहिती असलेल्या फाईलचे फोटो काढले. एक यशाच्या शिखरावर जाण्याच्या बेतात असलेली तरुण खेळाडू अचानक आत्महत्या करते आणि त्याची फार चौकशी होत नाही. इथेच काहीतरी चुकत असल्याचे दिसत होते.


त्याने आधी प्रणितीच्या घरच्या लोकांचा शोध घ्यायचा ठरवले. त्यासाठी तिच्या वडिलांनी दिलेला मुंबईतील पत्ता एकदा मनात रिपीट केला आणि इन्स्पेक्टर मयंकने बुलेटला किक मारली.

दत्तूच्या मदतीने विनय नेमके काय शोधून काढेल?
सुशिला सिस्टरचा यात काय संबंध असेल?
प्रणितीची मैत्रीण नेमके काय सांगेल?

वाचत रहा.
सापळा द ट्रॅप.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all