Login

सर सुखाची (भाग-१०)

सर सुखाची


सर सुखाची (भाग- १०)

मल्हारने ब्लॅक स्ट्रॉंग कॉफीची ऑर्डर दिली होती. गौरीने कॉफी प्यायला नकार दिला होता.

"पिऊन तर बघ. कदाचित जुनी टेस्ट आठवल्यावर आवडेल." मल्हारने म्हटलं आणि गौरीने कॉफीचा एक घोट घेतला. एका घोटाबरोबरच तिला तरतरी जाणवू लागली आणि ती तिच्या चेहर्‍यावर दिसू लागली.

"इतके दिवस कुठे होतो? वगैरे विचारणार नाहीस." मल्हार

"त्याने काय फरक पडणार आहे? आयुष्य खूप पुढे निघून आलंय आता." गौरी

"पण मला तुला सांगायचंय… त्यादिवशी तुझ्यावर चिडून गेलो आणि रागातच फार्म हाऊसवर राहायला गेलो. मुद्दाम कोणालाच सांगितलं नव्हतं. काही दिवसांनी अचानक माझ्या बाबांची तब्येत खराब झाली होती. त्यांना बिझनेसमध्ये खूप लॉस झाला होता आणि खर्च भरून काढण्यासाठी त्यांनी खूप सारे कर्ज घेऊन ठेवले होते. त्याच टेन्शनमध्ये त्यांच्या डोक्यातली नस फुटली आणि ते कोमात गेले. इतके दिवस बेफिकिरपणे जगणारा मी अशी अचानक अंगावर जबाबदारी पडल्याने बराच गोंधळून गेलो होतो. अडचणींची मालिका सुरुच होती. कर्जामुळे आम्हाला आमचे दोनही प्लांट बंद करावे लागले. सगळं विकून लोकांची देणी दिली. एखाद्या राजमहालात राहणारे आम्ही क्षणातच रस्त्यावर आलो होतो. तुला भेटून हे सगळं सांगावं असं वाटंत होतं पण तू आधीच एवढी चिडून गेलेली होती म्हणून मग ठरवलं स्वतःला सिद्ध केल्याशिवाय तुझ्यासमोर यायचं नाही. जवळपास तीन महिने मी स्वतःला तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी रोखून धरलं पण शेवटी मी न राहावून तुला संपर्क करायचा प्रयत्न केला. तुझा फोन लागतच नव्हता. मग प्राचीला फोन केला तेव्हा तुझ्या लग्नाबद्दल कळलं… माझं सर्वच मी गमाऊन बसलो होतो. मग झपाटल्यासारखं स्वतःला कामात गुंतवून घेतलं. बिझनेस परत सुरु केला. ज्या कारणामुळे तू मला सोडून गेली होतीस त्यात मी माझं नाव कमावलं…" मल्हारने एका दमात सगळं सांगितलं.

"आणि तुझी गिटार… संगीत…" गौरी खूप भावनिक झाली होती.

"तू सोडून गेली त्यादिवशीच गिटारची तार तुटली. कदाचित नियतीलाही तेच म्हणायचं असेल. ती तार मी कधीच परत जोडली नाही. गौरी माझ्या आयुष्यात तू नव्हतीस मग संगीत कसं राहणार होतं?" मल्हार

"लग्न…" गौरी पुढे बोलत होती मल्हारने तिला थांबवलं.

"हृदयातल्या काही जागा कुणालाच देता येत नसतात. मी लग्न केलं नाहीये." मल्हार म्हणाला. गौरीला मात्र या सगळ्याला आपण स्वतः दोषी आहोत असं वाटायला लागलं. तिच्या डोळ्यांत पाणी जमा झालं. मल्हारसोबत काहीच न बोलता ती तिथून उठून निघून गेली.


दुसऱ्यादिवशीपासून मात्र ती मल्हारसोबत थोडं नीट बोलायला लागली. गौरीला काय आवडतं, काय आवडत नाही, कशाचा राग येतो हे मल्हारला चांगलंच ठाऊक होतं. मल्हार तिची तशी काळजी घ्यायला लागला होता. गौरीलाही हे सगळं परत आवडायला लागलं होतं. गौरी आणि मल्हारविषयी ऑफिसमध्येही कुजबुज सुरू झाली होती. पण गौरी त्याकडे कानाडोळा करत होती.

गौरीचं घरातलं वागणं आता अगदीच बदललं होतं. ती फक्त मुलांकडे लक्ष देत होती. बाकी स्वप्नील, त्याचे आईवडील यांना ती तिच्या गिणतीतही धरत नव्हती. साधीशी राहणारी गौरी आता थोडी फॅशनेबल राहायला लागली होती. रोज तिच्याजवळ काही ना काही महाग वस्तू दिसायला लागली होती. सुमनताईंनी तिचं हे बदलेलं वागणं स्वप्नीलच्या कानावर टाकलं.

"आई चांगलं राहण्यात काही वाईट आहे का? नाही ना. तिच्या कष्टाचे पैसे आहेत, तिला वाटेल तसे तिने खर्च केले तर काय बिघडलं? तू या गोष्टीचा जास्त विचार करू नको. अगं, ऑफिसमध्ये असं प्रेझेन्टेबल रहावं लागतं." स्वप्नीलने सुमनताईंनाच समजावून सांगितलं. खरंतर गौरीतला बदल स्वप्नीलच्या केव्हाच लक्षात आला होता तरी तो गौरीसाठी यावर अगदी गप्प बसून होता. गौरी मात्र आपल्या या नविन विश्वात मशगुल होत चालली होती.