Login

सारं काही तुमच्यासाठीच

एक पत्नी इच्छा नसताना नवऱ्याचा अपराध स्वतःच्या मनात ठेवून मुलांसाठी संसार करत राहते

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

लघुकथा

सारं काही तुमच्यासाठीच!

मेघाचं लग्न झालं. ती सासरी म्हणजेच सानेंच्या घरात येऊन तीन महिने पूर्ण झाले होते. या तीन महिन्यात तिच्या लक्षात आलं होतं की आई बाबांशी सर्वांसमोर वागताना खूप व्यवस्थित वागतात, त्यांचे सर्व अगदी नीट करतात परंतु फक्त घरातलेच असतात तेव्हा आई बाबांशी बोलत नाहीत. मेघाला हे सर्व खटकत होतं. उघड उघड ती कोणाला विचारू शकत नव्हती. त्यांच्या अशा वागण्यामुळे वातावरणात उगाचच एक प्रकारचा तणाव निर्माण झाला होता. तिच्या माहेरचं वातावरण खूपच खेळकर होतं. आई बाबा, दादा वहिनी सर्वच एकमेकांशी खूप समजूतीने वागत होते. सासरी सुद्धा असंच वातावरण असावं असं तिला नेहमीच वाटायचं. एकदा तर तिने आईने त्यांच्या कपाटातील एक वस्तू तिला आणायला सांगितली तेव्हा तिने एका कप्प्यात खूप साड्या तशाच कोऱ्या, घडी न मोडता ठेवलेल्या पाहिल्या. बहुतेक त्या बाबांनीच आईना दिलेल्या असाव्यात. शेवटी एक दिवस सर्व काम आटोपल्यावर तिने मनीषला विचारलंच,

"मनीष माझं लग्न झाल्यापासून मी पाहते आहे आई आणि बाबा एकमेकांशी बोलत नाहीत. सर्वांसमोर ते एकमेकांशी खूप चांगले वागतात, असं का?"

"मेघा गेली अनेक वर्ष हे असंच चालू आहे. मी आणि महेशने आई-बाबांना याबद्दल खूप वेळा खोदून खोदून विचारलं. दोघांपैकी कोणीही त्याचे उत्तर देत नाही फक्त एवढेच म्हणतात नाही रे सगळे नीटच आहे."

"हो पण हे साधारण नक्की कधीपासून चालू आहे?"

"अगं मी दहावीत असल्यापासून हे सगळं असंच सुरू आहे. त्याआधी आम्ही चौघेजण खूपच आनंदात होतो. नेहमी बाहेर फिरायला जायचो. घरात सगळे सण समारंभ अगदी खूप सुंदर रीतीने साजरे व्हायचे. एकमेकांशी मस्करी व्हायची."

"तुला आणि महेशला या सगळ्याचा खूप त्रास होत असेल ना!"

"हो गं खरंच! माझे बाबा आईशी खूपच प्रेमाने वागतात. तिच्या वाढदिवसाला नेहमी भेटवस्तू घेऊन येतात. आई त्यांच्याशी खूपच तुसडेपणाने वागते. त्यामुळे माझ्या आणि महेशच्या मनात आईबद्दल एक सूक्ष्म अढी निर्माण झाली आहे. माझे बाबा बँकेत होते त्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या व्हायच्या. प्रत्येक वेळी आम्ही सर्वजण तिथे जाणं योग्य नव्हतं कारण तीन तीन वर्षासाठी शाळा बदलणं बरोबर नाही ना. मी दहावीत असताना एकदा आई एकटीच बाबांच्या बदलीच्या गावी गेली. त्यावेळी तिने दोन दिवसासाठी मामीला आमच्या सोबत रहायला बोलावलं. तिथून आल्यानंतर आईचं वागणं बदललं."

"मी एकदा आईंशी याबाबत बोलून पाहू का! मला हा घरच्या वातावरणातील तणाव सहन होत नाही."

"तू प्रयत्न करून बघ कदाचित तुझ्या बोलण्याने काही चांगलं घडू शकेल."

एक दिवस मेघा आणि आई दोघीच घरात असताना मेघाने आईना विचारलं,

"आई मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. खरं तर तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा मला काहीही अधिकार नाही परंतु आपण सगळे एक कुटुंब आहोत आणि घरात आनंदाने राहायला हवं असं मला वाटतं."

"हो बरोबर आहे तुझं. विचार ना कायं विचारायचं आहे?"

"आई माझं लग्न झाल्यापासून मी बघतेय की तुम्ही आणि बाबा सर्वांसमोर खूप व्यवस्थित वागता पण फक्त आपणच असलो की तुम्ही बाबांशी काहीच बोलत नाही. असं कायं कारण आहे की तुम्ही बाबांशी अबोला धरला आहे?"

"मेघा आहे कारण पण मी ते आता कोणालाच सांगू इच्छित नाही. त्यामुळे जे जसं आहे तसं तू पण सांभाळून घे."

मेघाचा नाईलाज झाला परंतु जास्त खोलात जाणं शक्य नव्हतं म्हणून ती शांत राहिली. दोन वर्षांनी बाबांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना हॉस्पिटलमध्ये काही दिवसांसाठी ऍडमिट केलं होतं. त्यानंतर ते घरी आले. मेघाला वाटले आता तरी आई बाबांशी प्रेमाने वागतील. छे! काहीच फरक झाला नाही. पुन्हा काही दिवसांनी बाबांना अस्वस्थ वाटू लागलं म्हणून त्यांनी सगळ्यांना जवळ बोलावलं,

"हे बघा आता माझं काही खरं नाही. मला कधीही बोलावणं येईल. त्यामुळे मी जे सांगतो ते सगळ्यांनी नीट लक्षपूर्वक ऐका. तिजोरी मध्ये सगळ्यात वर एक फाईल आहे त्यामध्ये मी सगळं आपल्या प्रॉपर्टीचं लिहून ठेवलं आहे. मी गेल्यानंतर सर्व दिवस कार्य झाल्यावर मनीष तू सर्वांसमोर ते कागदपत्र वाच."

"बाबा असं का बोलता? तुम्ही आम्हाला हवे आहात. प्रॉपर्टी कायं करायची आहे."

बाबांचा चेहरा वेडावाकडा होऊ लागला. त्यांनी मनीष आणि महेशचा हात हातात घेतला मेघा आणि आईना पण जवळ बोलावलं. आईच्या डोळ्यात पाणी होतं परंतु त्या काहीच बोलत नव्हत्या. बाबा म्हणाले एकमेकांची काळजी घ्या. आईकडे बघून ते फक्त एवढेच बोलले,

"आता तरी मला माफ कर."

एवढं बोलून बाबांनी त्यांची इहलोकीची यात्रा संपवली. सर्व कार्य व्यवस्थित पार पडल्यावर आई मुलांना म्हणाल्या,

"बाबांनी काही कागदपत्र लिहिले ते मनीष तू वाच आणि त्याप्रमाणे तुम्हा दोघात ती प्रॉपर्टी वाटून घ्या. काही दिवसांनी मी पण आता तीर्थयात्रेला जाईन म्हणते."

मनीषने तिजोरी उघडून ती फाईल काढली. फाईल मध्ये सर्वात वरती एक कागद होता तो वाचू लागला,

"मुलांनो तुमच्या मनात आईबद्दल अढी आहे परंतु तिचा त्यात काहीच दोष नाही. माझ्याकडून खूप मोठा अपराध घडला आहे. आज मी त्याची कबुली देत आहे. मनीष तू दहावीत असताना माझी सांगलीला बदली झाली होती. त्यावेळी मी तिथे एका असहाय्य विधवा बाईला मदत करता करता आमची चांगली मैत्री झाली. मलाही तिचं आकर्षण वाटू लागलं. ती काहीतरी देण्याच्या निमित्ताने माझ्या घरी येऊ लागली. आम्ही दोघं जवळ आलो आणि नको ते घडलं. कसं कोण जाणे पण कोणीतरी तुमच्या आईला शीलाला त्याबद्दल कळवलं. ती लागलीच तिथे आली. नेमके त्याचवेळी ती बाई माझ्याबरोबर होती. शीलाने तिला कानाखाली लगावून घराबाहेर काढलं. मला पण खूप काही बोलली. त्यावेळी मी खूप मोठी चूक केल्याचं माझ्या लक्षात आलं. मी शीलाची माफी मागितली. खूप गयावया केली, शेवटची संधी दे म्हणालो पण तिने मला माफ केले नाही आणि मला सुनावलं,

"आपली मुलं आता मोठी झाली आहेत आणि या वयात तुम्ही असले धंदे करता पण मुलांच्या मनावर काही विपरीत परिणाम होऊ नये, बाबा म्हणून तुमची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून मी तुमच्याबरोबर एकत्र राहीन पण आपल्या दोघांमध्ये यापुढे नवरा बायकोचं नातं कधीच नसेल. तुम्ही सुद्धा मुलांना हे कधीच कळून देणार नाही एवढं लक्षात ठेवा. नातेवाईकात आणि समाजात तुमची छी थू होऊ नये म्हणून सर्वासमोर मी तुमची पत्नी म्हणून वागेन. फक्त तेवढंच, बाकी काहीच नाही."

तिथून ती लगेच घरी आली मी सुद्धा तिच्या मागोमाग सुट्टी घेऊन घरी आलो. मला वाटलं होतं काही काळाने तरी ती मला माफ करेल. परंतु ती जे बोलली ते आयुष्यभर तिने खरं केलं. एवढ्या मोठ्या चुकीची शिक्षा म्हणून तिने मला नाकारलं पण माझं तुमच्या मनातलं आणि समाजातलं स्थान ढळू दिलं नाही. ती एकटीच सारं काही सहन करत राहिली. हा तिचा खूपच मोठेपणा आहे. तुम्ही सुद्धा मला माफ करा आणि आईबद्दल असलेली तुमच्या मनातील अढी काढून टाका. तिला आता खऱ्या अर्थाने तुमचं प्रेम द्या. तिने सारं काही तुमच्यासाठीच केलं आहे."

पत्र वाचून झाल्यावर सगळे सुन्न झाले. मनीषने आईकडे पाहिलं आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. तिघेही आईकडे गेले आणि आईचा हात हातात घेतला,

"आई खरंच आम्ही तुला समजून घेतलं नाही. तू बाबांशी अशी वागतेस म्हणून आम्हाला तुझा राग यायचा. तुझ्या दृष्टीने तू योग्यच वागत होतीस." आई हुंदका देऊन बोलली,

"त्यावेळी एक स्त्री म्हणून बाबांनी माझा खूप मोठा अपमान केला. माझ्यासारख्या मानी स्त्रीला ते अजिबात सहन झालं नाही. तुम्ही माझ्या जागी असतात तर त्यांना माफ केलं असतं का?"

सर्वजण निरुत्तर झाले आणि एका सुरात म्हणाले,

"आई आता बाबा गेले त्यांच्याबरोबर मागचं सगळंही गेलं. आता आमच्या अशा वागण्याबद्दल तू आम्हाला माफ कर आणि आता तू कुठेही जायचं नाहीस आपण सगळे एकत्र आनंदाने राहायचं आहे." इतक्यात मेघा लाजत म्हणाली,

"आई आता तुम्हाला तुमच्या नातवाला खेळवण्यासाठी इथेच राहायचं आहे. मी आई होणार आहे."

आईला खूप आनंद झाला तिने मेघाला प्रेमाने जवळ घेतलं. चौघांच्याही चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.


©️®️सीमा गंगाधरे
0