माझ्या प्रिय बालदोस्तांनो,
तुमच्या आवडत्या जोकरचे सप्रेम नमस्कार !
तुम्हाला आश्चर्य वाटतं का? आजच्या मोबाईलच्या जमान्यात मी तुम्हाला पत्र का लिहितो ते? त्याच कारण म्हणजे तुम्हीच आहात. नाही का तुम्हाला कळलं! थांबा, थांबा सांगतो. हल्ली तुम्ही माझी सगळी दोस्त मंडळी एकतर त्या मोबाईल नाही तर त्या टि. व्ही. च्या दुनियेत रमून जाता. माझी साधी आठवणही येत नाही तुम्हाला. त्यामुळे मी तुमच्यावर नाराज आहे. पूर्वी कसे तुम्ही सगळे माझ्याकडे येत होतात अन् तुम्हाला पाहून मीही उत्साहात, उर्मीने तुम्हाला हसवण्याचे नाना करतब करून दाखवायचो. अगदी जरी मी दुःखात असलो तरी तुम्हाला हसवायचे काम करायचो. जे की खूप कठीण काम असतं बरं. पण मी माझं दुःख बाजूला ठेवून ते काम करायचो. माझ्या त्या करतबाने, विचित्र, वेडेवाकडे तोंड केल्याने तुम्ही जे खळखळून हसता ना तेव्हा मलाही छान वाटतं. आपण या कामात यशस्वी झालो म्हणजे आमच्या कामाचे चीज झाल्याचे समाधान वाटतं. पण आता अगोदरसारखं काहीच नाही राहिलं. सगळं बदलत चाललंय मान्य आहे, दोस्तानों ; पण कधी एक चक्कर माझ्याकडे मारा. माझ्या समाधानासाठी या माझा खेळ पाहायला. त्या टि. व्ही व मोबाईलच्या जगातून फक्त तास दोन तास तरी माझ्याकडे कधीतरी डोकावून पाहा. छान वाटेल मला.
येत जा कधी कधी मला भेट द्यायला मग मीही तुम्हाला भरपूर हसवेन अगदी पोट दुखेपर्यंत. राजांनों, तुमच्यावर तर आमचं पोट असतं. तेवढचं मला आधार होईल, दोन घास खायला मिळेल.
आता सांगा बरं, कसे आहात तुम्ही सगळे? काय म्हणताय ? पत्र निम्म्यावर आल्यावर तुमची खुशाली विचारतोय असे वाटतं का? नाही रे दोस्तानों, तसं काहीच नाही हं. मलाही थोडं समजून घ्या बाळांनों, थोडंसं वय झालंय ना, म्हणून थोडं विसरायला होतंय. ठीकच असाल तुम्ही. छान अभ्यास करा. मैदानी खेळही खेळत जा हं. कारण तुम्ही मुलं सतत त्या इंटरनेटच्या जगात वावरत असता. त्यामुळे सांगतोय तब्बेतही महत्त्वाची असते ना! काळजी घ्या.
चला थांबतो आता. भेटल्यावर भरपूर हसू. याल ना मग हसायला. मला विसरू नका हं. काय म्हणताय नाही ना विसणार! छान हं.. असेच हसत व आनंदी राहा.
कळावे,
तुमचाच दोस्त
जोकर
तुमचाच दोस्त
जोकर
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा