अक्षता अॅडव्हर्टायझर्स चं नाव अभिमानाने मिरवणारी ती बैठी इमारत आणि तिच्यात असणारं ते छोटसं अॉफीस...अविनाशची याआधीची नोकरीत असतानाची एसी केबिन आणि थाटमाट इथे कुठेही दिसत नव्हता. अगदी साधी केबिन.. जेमतेम काचेचं पार्टीशन आणि साधं टेबल मांडून एका फायबरच्या खुर्चीत बसून आपलं काम करणारा अविनाश. हे पाहून समिधाचे डोळे पाणावले पण त्याच्या चेहर्यावर दिसणारं मालक असण्याचं तेज आणि आत्मविश्वास पाहून तिला क्षणभर अभिमान वाटला. दिलखुलासपणे हसत तिचं स्वागत करीत अविनाशने तिला हाताला धरून आपल्या खुर्चीत बसवलं.
गेल्या तीन महिन्यांपासून अविनाशने घेतलेली मेहनत आणि आजवरचा अनुभव यांची योग्य सांगड घालत त्याने या क्षेत्रात चांगलंच नाव कमावलं. नोकरीत असणार्या कंपनीला तोडीस तोड टक्कर देणारा अविनाश आणि वाट्टेल ते करून कामे मिळवण्यासाठी धडपडणारा सोहेल. दोघांमधे एक निराळीच स्पर्धा सुरू होती. सशाच्या चालीने पुढे जाणारा सोहेल आणि सातत्याने प्रयत्न करून मेहनत आणि सचोटीवर विश्वास असणारा अविनाश यांची ओळख ससा आणि कासव अशीच झाली होती. या गोष्टीतील कासवाला असणारा संथगतीचा शाप अविनाशलाही होता- अपुरं भांडवल! याउलट सोहेल कंपनीचा पैसा वापरून वाटेल ते करू शकत होता. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तो मोठमोठ्या रकमा प्रतिस्पर्धी कंपन्यांना लाच देऊन कामे मिळवत होता. त्याच्या जोरावर तो एकापाठोपाठ एक प्रमोशन्स मिळवीत चालला होता. सशाची प्रगती वेगाने असली तरी तो गवत खायला थांबला तशी या सशानेही तीच चूक केली. एक मोठं कंत्राट मिळवण्यासाठी समोरील कंपनीच्या अधिकार्यांनी एक मोठी रक्कम मागितली. कंपनीची अवस्था अशी होती की तातडीने इतकी मोठी रक्कम उभी करणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हतं. पण ते काम अविनाशकडे जाऊ नये यासाठी तो प्रयत्न करत होता. शिवाय सोहेलने मिळवलेली कामे आणि त्यांचा दर्जा तसेच ती कामे मिळवताना होणारा खर्च यात खूप तफावत आढळली होती. काही नियमबाह्य गोष्टी केल्या गेल्या होत्या. वरिष्ठ स्तरावर याची चर्चा सुरू झाली होती. हे कॉन्ट्रॅक्ट एकप्रकारे सापळा रचावा तशा प्रकारचे होते. सोहेलसारखा ससा या गवतात हरवला आणि अलगदपणे जाळ्यात सापडला. कंपनीच्या कारभारावर लक्ष ठेवून असणार्या सरकारी संस्थांनी यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत तपास सुरू केला. या गोष्टीचा प्रतिकूल परिणाम सोहेलच्या कंपनीवर झाला. ते मोठं कंत्राट या कंपनीने सोहेलकडून काढून घेऊन अविनाशकडे सोपवलं जाण्याची चर्चा सुरू झाली.
समिधाने या गोष्टीचा वारंवार आग्रह धरला आणि वेळोवेळी हे पटवून दिलं की अविनाशने जी कामे मिळवली ती केवळ गुणवत्ता आणि वेळेचं बंधन पाळून. याउलट सोहेल केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी कंपनीचा वापर करतोय. याचा फायदा म्हणाला तितका होत नाही. वरिष्ठ व्यवस्थापनाने याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.
कंपनीच्या वरिष्ठ लोकांना नेमकं काय चुकलं याची जाणीव झाली. झटपट यश मिळवण्याचा प्रयत्न करताना नैतिक मूल्ये पायदळी तुडवली जाणं घातक असतं. सोहेलसारखे कर्मचारी यश मिळवण्यासाठी कुठलाही गैरप्रकार करून नाव खराब करू शकतात. त्याउलट अविनाश सारखे प्रामाणिक कर्मचारी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून कंपनीच्या भरभराटीला हातभार लावतात हे पुन्हा सिद्ध झालं.
सोहेलवर योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेला. अविनाशला परत बोलावण्याविषयी चर्चा सुरू झाली. आता अविनाश परत आला तर तो सर्वांनाच हवा होता. समिधाकडे एक वरिष्ठ अधिकारी म्हणून हीच जबाबदारी आली होती. त्यासोबत तिला आणखी एक महत्त्वाची जबाबदारी ठाऊक होती. तिने अविनाशच्या कंपनीसोबत रीतसर करार केला आणि त्याची कंपनी ही आपली बिझनेस पार्टनर म्हणून स्वीकारली. अविनाशलाती आतानोकर म्हणून पाहू शकत नव्हती. तिला त्याच्या मेहनतीचा योग्य मोबदला देण्याची वेळ आली आहे हे जाणवलं. कंपनीच्या वरिष्ठ लोकांना हा निर्णय पटला आणि आता अक्षता अॅडव्हरटायझर्स हे नाव समिधा अँड अक्षता अॅडस या नावाने एकत्र घेतलं जाऊ लागलं.
शर्यत जिंकणारा कासव यशस्वी तर ठरला पण त्याच्या सचोटीमुळे जिंकण्यासोबतचे \"इतर \" फायदेही त्याला मिळाले.
समाप्त
फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या
Subscription Plan
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा