ससा आणि कासवाची शर्यत ठरली. खूप वर्षांपूर्वी झालेल्या शर्यतीत कासवाने सशाला हरवलं होतं.त्यामुळे ही शर्यत सर्वांसाठी एक प्रचंड कुतूहलाचा विषय होती. यावेळी सशाने कासवाला हरवावं आणि आपल्या जुन्या पराभवाचा वचपा काढावा यासाठी संपूर्ण ससा जमात आतुर होती. इकडे कासवाने पुन्हा एकदा सशाला हरवून त्याचा गर्व कायमचा नष्ट करावा यासाठी कासवांनीही आग्रह धरला होता.
ठरल्याप्रमाणे शर्यतीत भाग घेतलेला ससा आणि कासव त्या शर्यतीच्या ठिकाणी आले. यावेळी शर्यतीचं परीक्षण करायला पंच म्हणून कोल्ह्याऐवजी खारूताईला बोलावलं गेलं. ती एका उंच शिळेवर चढून बसली. शर्यत पहायला सारे प्राणी आणि पक्षी मोठ्या संख्येने आलेले होते. ससा आणि कासव ज्या वाटेने धावणार होते त्या वाटेच्या दुतर्फा प्राण्यांची प्रचंड गर्दी जमलेली होती. स्पर्धा सुरू असताना झोप येऊ नये किंवा भूक लागू नये यासाठी सशाला खास सूचना दिल्या होत्या.शिवाय पोटभर खायला घालून आणि पुरेशी विश्रांती देऊन मगच त्याला स्पर्धेत पाठवण्यात आलं होतं.स्पर्धेची वेळ होताच खारूताईने शिट्टी वाजवली आणि शर्यत सुरू झाली. ससा नेहमीप्रमाणे जोरात धावला आणि कासवाच्या पुढे निघून गेला. कासव त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीने हळूहळू चालत निघालं. ससा खूप पुढे निघून गेला होता. जमलेले प्राणी कासवाच्या गतीला आणि संथपणे धावण्याला हसत होते.अनेकजण त्याची टिंगल टवाळी करत होते. कासव मात्र कुणाकडेही न पाहता आपल्या धेयाकडे एकसारख्या गतीने जात होतं. ससा पुढे गेला आणि त्याने मागे वळून पाहीलं. कासव बरंच मागे होतं. मग तो थोडा थांबला. आजूबाजूला हिरवंगार, कोवळं लुसलुशीत गवत होतं. ते खाण्याचा त्याला क्षणभर मोह झाला. तितक्यात त्याला आपल्या कळपाच्या प्रमुखाने दिलेली सूचना आठवली. मन मारून तो मागे वळून कासवाकडे पहायला लागला. दूरवरुन एक ठिपका हलत येत होता. तेच कासव असावं असं वाटून त्याने विचार केला की याला आणखी खूप वेळ लागेल. तोवर घासभर गवत खाऊन घ्यावं. गवतापर्यंत जाऊन तो थांबला आणि परत एकदा त्याला ती सूचना आठवली. क्षणभर मनाशी विचार करत तो उभा राहीला. गवत खाऊ की नको? जर थोडंसं खाल्लं तर मला आणखी खाण्याचा मोह होईल. मग माझा स्वतःवर ताबा राहणार नाही. त्यापेक्षा न खाणंच उत्तम. पण कासव तर खूप लांब आहे. तोवर थोडंसं खाल्लं तर कुठे बिघडणार? सशाची मनःस्थिती दोलायमान झाली होती. काय करावं त्याचा निर्णय होत नव्हता. अखेर त्याने कळपाच्या प्रमुखाने दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं आणि तो गवत खायला लागला. थोडंसं गवत खाल्ल्यावर त्याची भूक चाळवली गेली. सकाळी पोटभर खाऊन तो स्पर्धेत उतरलेला असूनही या गवताच्या मोहाने तो खायला लागला. खाऊन खाऊन पोट गच्च भरलं. खाण्याच्या नादात तो स्पर्धा विसरून गेला. गवत खातेवेळी त्याला शिट्टी ऐकू आली पण तिकडे त्याने दुर्लक्ष केलं. काहीवेळाने गवत खाऊन पोट भरल्यावर तो भानावर आला. मागे फिरून त्याने पाहीलं पण कासव दिसलं नाही. तो स्पर्धेच्या शेवटच्या ठिकाणी धावत येऊन पोहोचला तेव्हा त्याने पाहीलं की कासव आधीच तिथे येऊन पोहोचलं आहे. कासवाने त्याच्याकडे पाहून परत शिट्टी वाजवली. आता सशाच्या लक्षात आलं की गवत खाताना कासवाने शिट्टी वाजवून आपल्याला खुणावलं होतं पण आपणच दुर्लक्ष केल्यामुळे आपण पुन्हा एकदा हरलो आहोत. खजील होऊन तो परतला.
दुपारच्या सत्रात सर्व प्राण्यांची मीटींग सुरू झाली. खारूताई स्पर्धेचा निकाल ऐकवणार म्हणून सारे जमलेले. खरंतर स्पर्धेचा निकाल आधीच लागलेला होता. त्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून ते सर्वजण उपस्थित होते. कासवांनी तर जल्लोष सुरू केला होता. विजयी कासवाची जंगी मिरवणूक काढायचीदेखील तयारी होती. अखेर खारूताईने निकालपत्र वाचायला सुरू केले. स्पर्धेच्या विजेत्याची निवड ही तीन बाबी नजरेसमोर ठेवून केली गेली आहे. त्यानुसार विजेता घोषीत केला जाईल. या निकालावेळी परीक्षकांचा निर्णय अंतीम असेल आणि त्याला कुणीही अपील करू शकणार नाही. अटी वाचून दाखवत खारूताईने निकाल वाचायला सुरूवात केली.
पहिला निकष : स्पर्धेत उतरायची मानसिक आणि शारीरिक तयारी..!
सशाचा उत्साह आणि स्पर्धा सुरू होताच त्याने घेतलेली आघाडी हे त्याच्यासाठी फयद्याचं ठरलं. कासव मात्र नेहमीप्रमाणे सावकाश चाललं म्हणून इथे सशाला एक गुण मिळाला तर कासवाला शून्य गुण मिळतील. मात्र त्याची नैसर्गिक क्षमता लक्षात घेता अर्धा गुण दिला जाईल.
दुसरा निकष : प्रतिस्पर्ध्याशी स्पर्धा करतानाची मानसिकता आणि त्याच्याशी केलं जाणारं वर्तन...!
सशाने कासवाची अर्ध्या वाटेत काहीवेळ वाट पाहीली. कासव मात्र त्याला ओलांडून पुढे गेलं. नुसतंच गेलं नाही तर त्याने शिट्टी वाजवून त्याचा तेजोभंग करायचा प्रयत्न केला. शिवाय स्पर्धा संपतेवेळी त्याने अंतर पूर्ण करण्याबद्दल सशाचं अभिनंदन करायला हवं होतं त्याऐवजी तो शिट्टी वाजवत होता. म्हणजेच हे वर्तन अतिशय गलिच्छ असून आम्ही याचा निषेध करतो. कासवाच्या या वर्तनामुळे त्याला शून्य गुण मिळतील तर सशाला एक गुण मिळेल.
तिसरि निकष : स्पर्धा पूर्ण करतेवेळी दिसलेली कामगिरी...!
इथे ससा कमी पडला. स्पर्धा सोडून त्याने गवत खाल्लं. कासव मात्र इमानेइतबारे इकडे तिकडे न पाहता अंतर कापीत राहीलं. एकाग्रतेने काम करण्याबद्दल कासवाला एक गुण मिळेल. सशाने मात्र थांबून विश्रांती घेऊन आणि पोटभर खाऊन स्पर्धा पूर्ण केली म्हणजेच स्पर्धेत भाग घेऊनही त्याने इतर गोष्टींचा लाभ घेतला. याचाच अर्थ ससा सर्वगुणसंपन्न ठरला आणि त्यामुळे त्याला दोन गुण मिळतील.
अशाप्रकारे ससा अधिक गुण मिळवून स्पर्धेचा विजेता ठरला. कासवावर मात्र स्पर्धा पूर्ण करूनही हार पत्करण्याची वेळ आली. खारूताईचा निकाल ऐकून सारे प्राणी आश्चर्यचकीत झाले. बर्याचजणांनी या निकालाचं स्वागत केलं. ससा आणि त्याचे जातभाई आपल्या जमातीवरील पराभवाचा कलंक धुवून निघाला म्हणून आनंदी झाले.
गोष्ट संपली आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या. फक्त अविनाश तेवढा शांतपणे बसून होता. त्याच्या मनाला ही गोष्ट पटत नव्हती. त्याचा प्रश्नार्थक चेहरा पाहून समिधा त्याच्यासमोर गेली आणि तिने चुटकी वाजवत त्याला सावध केलं.
"ए, एवढा कसला विचार करतोयस? गोष्ट संपली केव्हाच ...!"
"ही गोष्ट चुकीची आहे. हे मॅनेजर स्वतःला काय विश्वगुरू समजतात काय? " अविनाशच्या लक्षात गोष्टीचा आशय आलेला होता. कार्पोरेट क्षेत्रातील चढाओढ आणि मूल्यांची मोडतोड करून काहीही करून यश मिळवायची मानसिकता तो चांगल्याप्रकारे जाणून होता. याच नकारात्मक बाबींना तो आजवर विरोध करत आलेला होता. समिधा ही एकमेव सहकारी त्याच्या भावना समजू शकत होती. बाकीचे सहकारी म्हणजे घाण्याला जुपलेल्या बैलासारखे होते. भावना, मन, विचार वगैरे त्यांना सुचत नसत. त्यामुळे अविनाश नेहमीच त्या कंपूत एकटा पडलेला असे. यावेळी मीटींगमधे ही गोष्ट ऐकून तो चांगलाच चिडला होता. अशा प्रतिकात्मक गोष्टी सांगून तेजोभंग करणारे वरिष्ठ आणि त्यांचा माज उतरवण्याचा त्याने यावेळी निश्चय केला पण ससा आणि कासवाची शर्यत एवढ्यावर थांबलेली नव्हती. कासवांनी या शर्यतीच्या निकालाविरोधात कोर्टात अपील केलं.....
क्रमशः
फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या
Subscription Plan
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा