Login

सासर - माहेर भाग 3 अंतिम

गोष्ट सासर -माहेरची
तृप्ती आपल्या नवऱ्याच्या आठवणीत रमली होती.
' इतकं चांगलं कोणी कसं वागू शकतं? सासू -सासऱ्यांशी इतकं चांगलं वागणं आपल्याला जमेल का? पण काहीही झालं तरी यांच्या मनाचा थांग लागत नाही हेच खरं.' आता आपल्या नवऱ्यावरचं तिचं प्रेम शतपटीने वाढलं होतं.

दोन्ही भावंडांनी मिळून तिला ह्या दोन दिवसात खूप चिडवलं. आपल्या भाऊजींच्या स्वभावाने ते भारावून गेले होते. चार दिवस नवऱ्याशिवाय कसं काय राहणार बाई म्हणून काकू येता - जाता तिची चेष्टा करत होती. आपल्या जावयाचं कौतुक करताना थकत नव्हती.

मंगळागौरीचा दिवस उजाडला. सुषमा ताई नवऱ्यासह सुनेच्या माहेरी हजर झाल्या. आपल्या जावयाने दिलेले पैसे उमा काकू आणि अशोकरावांनी पूजेच्या तयारीसाठी खर्च केले होते. बाकी आहेर मात्र आपल्या पैशाने आणला होता.

ही सगळी तयारी बघून सुषमा ताईंना आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नाही. कार्यक्रमासाठी तृप्तीच्या मैत्रिणी, माहेरची जवळची माणसं असा गोतावळा जमला. तृप्तीचे नातेवाईक बेताची परिस्थिती असले तरी स्वभावाने साधे होते. प्रत्येकाने आपापल्या परीने काही ना काही भेटवस्तू आणल्या होत्या. जो तो सुषमा ताई आणि त्यांच्या यजमानांची आस्थेने विचारपूस करत होता. उमा काकू आणि अशोकराव यांच्या घरची मंडळी सुषमा ताईंना काही कमी पडू नये याकडे लक्ष ठेवून होती.

मंगळागौर उत्साहात साजरी झाली. जमलेल्या साऱ्या बायका रात्रभर खेळ खेळून दमल्या. दुसऱ्या दिवशी सुषमा ताईंना भरभरून आहेर दिला गेला. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान दिसत होतं.
'आपण माणसं ओळखायला चुकलो की काय? ही सगळी पैशाने गरीब असली तरी हुशार आहेत. यांच्या व्यवहारात कुठलाही कमीपणा नाही. रीतभात धरून आहेत. लग्नातही आपल्या साऱ्या मागण्या यांनी लेकीच्या प्रेमाखातर मान्य केल्या होत्या आणि आपण काय केलं? सासू म्हणून नुसतं मिरवलं. सुनेच्या पहिल्या मंगळागौरीसाठी नको त्या मागण्या केल्या. इतकंच काय तर तिच्या माहेरच्या माणसांना चक्क टाळलं! का? तर आपला आणि त्यांचा स्टेट्स जुळत नाही म्हणून..'

उमा काकू आणि घरच्या मंडळींनी सुषमा ताईंना आजही राहण्याचा आग्रह केला. हो, नाही करत अखेर त्याही तयार झाल्या. केवळ या माणसांना पारखून घेण्याची संधी पुन्हा एकदा मिळते, ती का सोडायची म्हणून. चांगुलपणाची पारख झाली तरी स्वभावातली खोच लगेच जाईल कशी?

सासुबाईंच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून तृप्ती मात्र आनंदात होती. आपल्या सासुबाई म्हणून सर्वांशी ओळख करून देत होती. सासरचं, नवऱ्याचं भरभरून कौतुक करत होती.
-----------------------------------------------

"माफ करा सुषमा ताई, यावेळी आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू शकलो नाही. " उमा काकू आणि ताई जेवणानंतर रात्रीच्या नीरव शांततेत बाहेर बसल्या होत्या.
"लेकीची हौस करायची होती, पण हातचं राखूनच. सासू म्हणून तुमचा मान आहे आणि नव्या सासूला हा मान मिरवावासा वाटतो, हे एकदम मान्य. पण परिस्थिती अशी होती की इतका खर्च करणं शक्य नव्हतं.
आज ना उद्या आमची धाकटी जाऊ अन् मी आम्ही दोघीही सासवा होणार हेही खरं आहे. मात्र परिस्थिती सुधारली तरी आम्ही मुलीकडे काहीही मागणार नाही, केवळ नारळ आणि मुलगी इतकंच द्या म्हणून सांगणार. आपण ज्या परिस्थितीतून गेलो, तिचा मान राखणं हे माणूसपणाचं लक्षण असतं. आमचं नशीब चांगलं की तुम्ही आमच्या लेकीला पसंत केलंत म्हणून मनाजोगा नवरा आणि सासर तिच्या नशिबी आलं." बोलता बोलता उमा काकूंच्या डोळ्यांत पाणी आलं.

हे पाहून सुषमा ताईंचा उरला -सुरला अहंकारही गळून पडला.

"आमच्या लेकाची पसंती म्हणून आम्ही तृप्तीला सून करून घेतली. जशी मी सासू झाले तशीच ती सून म्हणून आमच्या घरी आली. तुम्हीही माझ्या लेकाच्या सासू झालात. जसा माझा मान तसा तुम्हा दोघींचा मान, हे मी विसरले होते.
मनात आलं म्हणून सुनेच्या माणसांची पारख केली. पण यातून माझे बुरसटलेले विचार, पात्रता सिद्ध झाली. नाही का? खरंतर मी माफी मागायला हवी."
ताईंनी उमा काकूंचा हात हातात घेतला.

"आजवर मी आमच्या स्टेट्सशी जुळणारे नातेवाईक, मित्रमंडळी गोळा केली. पण घरची परिस्थिती बेताची असो वा श्रीमंत, माणसांचं मन महत्त्वाचं, हे आज लक्षात येतंय. तुमच्या लेकीला सासरी कुठलाही त्रास होणार नाही हे वचन देते मी तुम्हाला."

दाराआड उभं राहून सासू आणि आईचं बोलणं ऐकणाऱ्या तृप्तीच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहत होते.

सासुबाईंच्या आग्रहाखातर आणखी काही दिवस माहेरी राहिलेली तृप्ती रक्षाबंधनाची ओवाळणी घेऊन मोकळ्या मनाने सासरी आली. भावाने दिलेले आपल्या नवऱ्याचे पैसे सौरभच्या हातात देताना तिला होणारा आनंद काही वेगळाच असणार होता. आपल्या सासुबाईंनी केलेल्या मनमोकळ्या स्वागताने सारं काही आलबेल असल्याची तिची खात्री पटली होती.
'बरं झालं गरीब -श्रीमंतीचा अबोल वाद मिटला. नाहीतर यामुळे माझं माहेर खूप दूर गेलं असतं आणि हे सासर -माहेरचं अंतर मला मिटवता आलं असतं की नाही कोण जाणे?' तृप्तीने घरात पाऊल टाकले, ते अगदी समाधानाने!

समाप्त.
©️®️ सायली जोशी.

🎭 Series Post

View all