सासर की माहेर अंतिम भाग

About Relations

श्वेताचे सासूसासरे कोरोनातून सुखरूप वाचले होते;पण तिच्या चुलत सासूबाई थोड्या सिरीयस झाल्या होत्या.त्या राहतात की जातात? असे घरातल्यांना वाटू लागले होते.डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते आणि अशातच श्वेताच्या नवऱ्यालाही कोरोनाची लागण झाली. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.तो उपचारांना चांगला प्रतिसादही देत होता.पण मधेच त्याची तब्येत बिघडत होती.डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.आईवडिलांची व श्वेताची देवाकडे सारखी प्रार्थना सुरूच होती.त्याच्या काकू चांगल्या होऊन घरी आल्या त्यामुळे आपला मुलगाही बरा होऊन घरी येईल असे श्वेताच्या सासूसासऱ्यांना वाटत होते.
आपल्याला वाटते काही आणि होते वेगळेच..
एके दिवशी अचानक श्वेताच्या नवऱ्याची तब्येत खूप बिघडली आणि तो सर्वांना सोडून कायमचा या जगातून निघून गेला.
श्वेताच्या माहेरी व सासरी दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.आपल्या आनंदाला कोणाची नजर लागली असेच त्यांना वाटू लागले होते.

आईवडीलांनी मुलाला,श्वेताने नवऱ्याला आणि काव्याने आपल्या वडिलांना गमावले होते.
स्वतःचे दुःख सांभाळायचे की सूनेचे दुःख पाहायचे असे श्वेताच्या सासूसासऱ्यांना झाले होते.
'किती सुखाचा संसार होता! आपल्या लेकीचा आणि असे कसे झाले?' श्वेताचे आईवडील याच विचारात राहू लागले.

आपल्या नणंदबाईला सासर हे कधी सासर वाटलेच नाही अगदी माहेरी असल्यासारखी राहायची. सासूसासरेही मुलीप्रमाणे जीव लावायचे.आपल्याला तर दोन दोन आईवडील आहेत असेच श्वेताला वाटायचे.

मुलगा जाण्याचे दुःख होतेच पण आपल्या सुनेच्या पुढील आयुष्याचे काय? हा प्रश्न श्वेताच्या सासू सासऱ्यांना सतावू लागला.
त्यांनी तिला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला; पण 'मी तुम्हांला सोडून जाणार नाही.इथेच तुमच्याजवळ राहीन.तुमची काळजी घेईन.'
असे ती त्यांना सांगायची.

तिच्या आईवडीलांना तर काय करावे आणि श्वेताला कसे समजावे? हे ही काही सूचत नव्हते. मुलीच्या भवितव्याचाही प्रश्न होता आणि तिच्या सासूसासऱ्यांचीही काळजी वाटत होती.
नवऱ्याचा बिझनेस होता, तो ती सांभाळू लागली.सासरेही तिला मदत करत होते. काव्याही मोठी होत होती. वडिलांची आठवण येऊन रडायची.

श्वेताची नणंद तिला म्हणाली,"वहिनी तू करं दुसरे लग्न.. माझ्याकडे येतील आईबाबा. तू नको काळजी करू."
पण श्वेता ऐकायला तयार नव्हती.

नवरा गेल्यानंतर श्वेताच्या आयुष्यातील रंगच उडून गेला होते.आनंदी,हसतमुख श्वेता निस्तेज दिसत होती. हे पाहून तिच्या सासूसासऱ्यांना अजून वाईट वाटायचे.
दुसऱ्या लग्नासाठी ते तिला नेहमी सांगत असायचे.

"आईबाबा, तुमच्या इच्छेसाठी मी दुसरे लग्न करायला तयार आहे;पण त्या व्यक्तीने तुमचीही जबाबदारी स्विकारली पाहिजे. तरच मी लग्न करेन."

श्वेताने आपली अट सांगितली.


असेच एके दिवशी एक नातेवाईक भेटण्यासाठी घरी आलेला होता आणि बोलता बोलता त्याने एका मुलाची दुःखद कहाणी सांगितली.त्या मुलाचेही लग्न झालेले होते. वडील तर कधीचेच वारले होते पण आई आणि त्याची बायको दोन्हीही कोरोनामुळे गेल्या होत्या.त्यालाही परिवार नव्हता. एकटाच आपल्या दुःखात जगत होता.
भेटायला आलेल्या व्यक्तीला दोघीकडची परिस्थिती समजली होती आणि त्याने मग मार्ग सूचवला.
त्या मुलाला श्वेताची अटही ऐकवली.आणि इकडे त्याची सर्वांशी भेट घडवून आणली.

श्वेताशी लग्न करून त्याने काव्याची व श्वेताच्या सासूसासऱ्यांची जबाबदारी स्विकारण्याचे मान्य केले. त्यामुळेच श्वेताही लग्नाला तयार झाली.

'आपली नणंद अगोदर सून म्हणून सासरी राहिली पण आता आपल्या प्रेमळ सासूसासऱ्यांची तिने सून नाही तर एक मुलगी म्हणून जबाबदारी स्विकारली.'

याचा प्रज्ञाला अभिमान वाटला.

समाप्त
नलिनी बहाळकर


कोरोनाकाळात अशा अनेक घटना ऐकायला मिळाल्या होत्या,ज्यात कोणाचे आईवडील तर कोणाची मुले मृत्यू पावत होती.
कोणी ना कोणी कोणाला गमावत होते.
या घटनांना अनुसरून ही कथा लिहीली आहे.

🎭 Series Post

View all