#जलदलेखनस्पर्धा
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
विषय:- संसारात नणंदेची भूमिका
शीर्षक:- सासरची जबाबदारी भाग-२
"बोला ताई." निर्विकार चेहऱ्याने शनाया नभा जवळ येऊन बोलली.
"ते... जरा मला काही सामान आणायचे आहे तर तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता का?" ती विचारते.
शनाया आधी सासूबाईंकडे नजर फिरवते आणि त्यांनी हो म्हंटल्यावर ती जाण्यासाठी तयार होण्यास खोलीत जाते आणि नंतर दोघी बाहेर जातात.
"आई आम्ही बाहेरूनच जेवून येऊ. तू विनय आणि तुझे जेवण बनव किंवा तुला करायचे नसेल तर आम्हाला फोन कर आम्ही आणतो." नभा आपल्या आईला म्हणते.
त्या टीव्ही बघत फक्त मान हलवतात.
दोघी एका कॉफी घेण्यासाठी कॅफेमध्ये जातात.
"वहिनी, तुम्हाला कोणती हवे ?"
"मला काही नको. तुम्ही घ्या." ती शांतपणे बोलते.
नभा दोघींना एकसारखीच कॉफी मागवते. त्यामुळे शनायाला नाईलाजाने ती प्यावी लागते.
"वहिनी, तुमच्याशी थोडे बोलायचे होते." वहिनीजवळ विषय काढते.
शनाया प्रश्नार्थक नजरेने आपल्या नणंदबाईकडे बघते.
"मला माहीत आहे. सर्व तुमच्यासाठी नवीन आहे त्यामुळे तुम्ही सर्व ऐकून घेता पण जिथे पटत नसेल तिथे बोलून दाखवा." नभा सांगते.
आपली नणंद अशी का बोलत आहे हे आधी समजत नसल्याने तिचे चेहऱ्यावरचे भाव हे थोडे गोंधळात टाकणारे दिसत होते.
"मी आज सकाळी जे झाले त्याबाबतीत बोलत आहे." नभा म्हणते.
नभाच्या आईने आल्यावर ती गोष्ट बोलता बोलता कानावर घातली होती.
"तुम्ही नाश्ता बनवलात त्यामुळे तुमचे भाऊ आणि सासूबाई ओरडल्या पण तुम्हीच तर जबरदस्तीने करायला घेतले." ती बोलत होती.
आपला भाऊ विनय हा किती रागीट आहे हे नभाला माहीत होते. त्यात आईने ती सकाळी गेल्यावर ही छोटीशी गोष्ट त्याचा मोठा मुद्दा बनवला असणार हे तिला माहीत होते.
म्हणूनच तिने हा विषय काढला.
म्हणूनच तिने हा विषय काढला.
"मी तिथे आलेले तुम्हांला आवडत नाही का?" तिच्या मनाचा अंदाज घेत नभाने आपल्या वहिनीला प्रश्न केला.
"नाही, नाही ताई. असे कसे मला वाटेल? तुमचे हक्काचे माहेर आहे. मी कोण तुम्हांला अडवणार?" पटकन शनाया बोलते.
"हो, मला माहीत आहे पण पुढे जाऊन आपल्यात भांडण नको व्हायला म्हणूनच मी आज तुमच्याशी बोलत आहे.माझा नवरा एकुलता एक मुलगा आणि सासू-सासरे सांगूनही आमच्यासोबत राहत नाहीत. त्यांना गावी चांगले वाटते. माझ्या आईचा स्वभाव असा ह्यासाठी आहे की माझ्या मामीमुळे तिचे माहेर सुटले. माझे आजी-आजोबा होते तो पर्यंत ती जात होती पण आजीचे वर्षश्राद्ध होते तेव्हाच मामीने मामाच्या मार्फत आता जास्त इथे येण्याची गरज नाही. आम्हाला तुझे काही करणे जमणार नाही,असे सांगितले. माझ्या बाबांचे निधन झाले तेव्हाही काही दिवस माहेरी नेतात अशी प्रथा आहे पण कोणीही तिला घ्यायला आले नाही. तसेच माझ्यासोबतही नको व्हायला म्हणून आईला काळजी आहे पण ती तिची अतिकाळजी तुम्हाला त्रास देणारी ठरत आहे. त्यामुळे तुम्ही तिला चुकीचे समजू नका. मीही ह्यावर तिच्याशी एकदा बोलेन." नभाने गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.
"हो. आता मला त्यांच्या वागण्याचे कारण समजले ताई." ती थोडावेळ विचार करून म्हणाली.
"हो आणि जिथे चूक आहे तिथे बोलून मोकळे व्हा.तुम्ही शांत राहिलात तर तुम्हालाच त्रास होईल. कुठे बोलावे आणि कुठे थांबावे हे ज्याला समजले त्याचा संसार सुखाचा झाला. मी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणार नाही पण तुम्हीही आपला संसार सुरळीत कसा राहील ह्याचा विचार करा. हा संसार तुम्हा दोघांचा आहे. त्यासोबत जोडलेली माणसे ही तेवढीच महत्त्वाची आहेत. भावजयांना नणंदा ह्यांचा त्रास होतो कारण त्यांना सर्व कामे करावी लागतात पण मी जमेल तसे मदत करण्याचा प्रयत्न करते आणि पुढेही करत राहीन. जे काही जेव्हाही तुम्हांला माझ्याबाबतीत खटकले असेल तेव्हा मला सांगत जा आणि मीही तसेच करेन. नाती गुंफणे सोपे नसते त्याची वीण बनायला वेळ लागतो पण तेच एका शब्दाने का असेना नात्यात कटुता यायला वेळ लागत नाही." नभा एक मैत्रीण म्हणून आपल्या नवीन असलेल्या वहिनीला समजावून सांगत होती.
"हो, मला तुमचे म्हणणे पटते आहे." शनाया स्मितहास्य करत म्हणाली.
तिचे चेहऱ्यावरचे स्मितहास्य ती मनापासून ऐकत आहे ह्याची ग्वाही देत होते.
"या तुम्हीही बाहेर या." नभाच्या ह्या बोलण्याने शनाया सुद्धा अचंबित झाली.
क्रमश:
कोण असेल ?
© विद्या कुंभार
कथेचा भाग कसला वाटला हे कमेंट करून सांगा.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा