#जलदलेखनस्पर्धा
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
विषय:- संसारात नणंदेची भूमिका
शीर्षक:- सासरची जबाबदारी भाग- १
"काय गं? कसला एवढा विचार करतेस?" नभाची मैत्रीण विचारत होती.
"काही नाही गं, भावाचे नवीनच लग्न झालं आहे. त्यात आमच्या घरात प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे." नभा म्हणाली.
"अगं, एकदा का पाण्यात पडले की पोहायला शिकणारच. तू नको काळजी करू." ती म्हणाली आणि आपल्या घरी निघून गेली.
नभाच्या भावाच्या लग्नाला साधारण एक महिना झालेला होता. त्यात भाऊ जास्त रागीट असल्याने तिला नवी नवरी असलेली शनायाची काळजी वाटत होती. त्यात भर म्हणजे तिच्या आईला सर्व व्यवस्थित लागायचे.काही पटले नाही तर सारखी तिची बडबड सुरू असायची.
"आई मी उद्या येईन." नभाचे काही काम होते म्हणून तिच्या माहेरी जाणार त्या आधी फोन करून तिने सांगितले.
तिथे गेल्यावर तिच्या नव्या वहिनीने तिचे स्वागत हसून केले होते.
तिची वहिनी शनाया स्वभावाने शांत होती. पुढे ती सगळ्यांमध्ये मिसळून जाईल तेव्हा तिचा स्वभाव आणखी खुलेल असे नभाला वाटत होते.
"वहिनी, जेवण खूप छान झाले आहे." नभाने जेवण झाल्यावर तिचे कौतुक केले.
तिनेही स्मितहास्य करत कौतुक स्वीकारले.
"अगं, शनाया तुम्ही दोघे पिक्चर पाहायला जात आहात तर हिला पण घेऊन जा. तिलाही बरे वाटेल." नभाची आई म्हणजेच शनायाच्या सासूने फर्मान सोडले.
"नको. तुम्ही दोघे जाऊन या. मी आईसोबत गप्पा मारते. उद्या माझे काम आहे तर त्याला लागणारी कागदपत्रे नीट आहेत का बघून ठेवते." उगाच नवीन दाम्पत्यामध्ये आपण कशाला जायचे म्हणून तिने थाप मारली.
सासूबाईंना काही पटले नाही हे चेहऱ्यावरून दिसत होतेच म्हणून तरीही तिने विचारले,"ताई,येत असाल तर चला. मी ऑनलाईन बुकिंग करते."
तरीही ती नकार देते. नवऱ्याचा फोन आल्याने शनाया तिथून निघून जाते.
"हे असे असते बघ. आजकालच्या मुलींना फक्त नवराच जवळ हवा असतो. बाकीचे नातेसंबंध त्यांना नकोसे वाटतात. तुला पण काय गरज होती नाही बोलायची? तेच मला समजत नाही." आपल्या सुनेने लेकीला सोबत घेऊन जावे हाच विचार त्यांच्या स्वतःच्या मुलीनेच मोडीत काढला होता.
"आई, त्यांचे नवीन लग्न झाले आहे. तू समजून घे. उलट असे सारखे मध्ये मध्ये करून संबंध चांगले होण्याच्या बदली बिघडतील हे का तुला समजत नाही?" नभाला आपल्या आईचे वागणे पटत नव्हते.
रात्री दोघे बाहेरूनच जेवून आले आणि येताना भावाने आपल्या बहिणीला जे आईस्क्रीम आवडते ते आणलेले खाण्यास दिले.
दुसऱ्यादिवशी सकाळचा नाश्ता नभाने जबरदस्ती करून सर्वांसाठी बनवला होता. त्यामुळे बाकीचे काही न बोलता शांतपणे खात होते.
नभा कामानिमित्त लवकर घरातून बाहेर पडली.
"हे बघ, माझी मुलगी माहेरी आली आणि तुझ्या बायकोने तिला नाश्ता करायला सांगितला." आता नभा आणि विनयची आई असलेली अन् शनायाची सासू चिडून म्हणत होती.
"पण त्यांनीच हट्ट केला म्हणून मी." शनाया केविलवाणा चेहरा करून म्हणते.
"आईचे बरोबर आहे, ताई इथे माहेरपणासाठी आली आहे आणि तू ती म्हणाली म्हणून लगेच बाजूला झालीस." विनयही शनायावर रागावत म्हणाला.
विनयचा रागीट स्वभाव एव्हाना शनायाला समजला होता. त्याचा राग दूर करणे खूप कठीण होते. तिने आपले अश्रू पुसले आणि लगेच सकाळची भांडी घासायला घेतली.
सासरच्या मंडळींना दुखवायचे नाही आणि वाद निर्माण होत असतील तर शांत बसायचे हेच शनायाच्या माहेरच्या अनुभवी आणि प्रौढ महिलांनी तिला समजावले होते.
'एक वेळ नाश्ता काय ताईंनी बनवून दिला तर लगेच दोघे जण माझ्यावर चिडले.' असे मनात बोलून ती काम करत होती.
"वहिनी ss कुठे आहात?" नभा बाहेरून आल्यावर हाक मारत होती.
क्रमशः
नभा आणि शनायाच्या नात्यात कटुता येईल का?
© विद्या कुंभार
कथेचा भाग कसला वाटला हे कमेंट करून सांगा.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा