Login

कारण सासरा पण कधी नवरा होता..

कथा एका हुशार सासर्याची


कारण सासरा पण कधी नवरा होता..



" घ्या.. बसा घेऊन त्या सटवीला ऊरावर.. तरी सांगत होते.. एवढं डोक्यावर चढवू नका.. पण नाही.. माझं मेलीचं ऐकतंय तरी कोण? देवा तुलाच काळजी रे माझी." तणतणत रेखाताई बोलू लागल्या. बाजूला पेपर वाचत बसलेल्या माधवरावांवर याचा काहीच परिणाम झाला नाही म्हणून अजूनच वैतागल्या.

" समजतच नाही मला मी कोणाशी बोलते आहे ते. भिंतीशी बोलते आहे का मी?" त्यांनी चिडून माधवरावांना विचारले.

" तू मला काही विचारलेस का? बरं भिंतीशी बोलू नकोस.. लोकं वेडी समजतील तुला." माधवराव परत पेपरमध्ये डोकं घालत म्हणाले.

" हो. वेडचं लागलं आहे मला. तुमच्या घरात पाऊल ठेवल्यावर वेगळं काय ते होणार? माझंच मेलीचं नशीब फुटकं. मुलगा तो तसा आणि नवरा हा असा. काहीजणी कसं छान नशीब घेऊन येतात. आणि मी? " रेखाताईंनी रडायला सुरुवात केली. आता मात्र परिस्थिती गंभीर आहे हे माधवरावांना जाणवले. पेपर बाजूला ठेवला नाही तर संध्याकाळचा चहा नाश्ता काही मिळणार नाही हे समजून त्यांनी स्वतःचा अलिप्तपणा सोडला.

" काय झालं बरं रडायला?" त्यांनी समजूतदार नवऱ्यासारखे बोलायला सुरुवात केली.

" ती तुमची भवानी.. नुसती बाबा बाबा करून नाचत असते.."

" कोण सुमेधा? काय बोलल्या आमच्या सूनबाई?" माधवराव आश्चर्यचकित होत म्हणाले.

" म्हणते कशी.. आई हा रंग तुम्हाला शोभणार नाही.. डिझाईन कसली बटबटीत आहे. वय वाढलं की कशा सौम्य रंगाच्या साड्या नेसाव्यात. आणि मला आवडलेली साडी स्वतःच्या आईला घेऊन दिली. ती म्हणे छान कॅरी करेल.. आणि माझ्या गळ्यात मारली काहीतरी विचित्र.. माझं वाढलेलं वय दिसतं तिला आणि तिची आई जणू षोडशा ना.. काहिही शोभून दिसायला. तुम्ही म्हणालात म्हणून गेले.. आणि घेऊन काय आले? न आवडणारी साडी आणि डोकेदुखी." रेखाताईंचा आवाज वाढला होता.

" पण मग आता कुठे गेली आहे सुमेधा? तुझ्यासोबत नाही आली?"

" ती गेली तिच्या आईला सोडायला. मीच म्हटलं माझं डोकं चढलं आहे. मी जाते घरी."

" दाबून देऊ का?" माधवरावांनी प्रेमाने विचारले.

" गळा पण दाबा.. म्हणजे सुटाल दोघेही."

"सासूबाई, बाबा.. बाहेर येता का?" बाहेरून सुमेधाचा आवाज आला.

" आली बघा.. तुमची लेक आणि माझी सून." टोमणा देत रेखाताई बोलल्या. तोवर सुमेधा त्यांच्या खोलीत आलीच.

" अरे या ना बाहेर.. बाबा मी आता ममाला सोडायला गेले होते. तिथे आमचा नेहमीचा वडापाववाला गरम वडे तळत होता. तुम्हाला आवडतात म्हणून आणले आहे. लवकर घ्या. नाहीतर गार होतील. सासूबाई तुम्ही पण घ्या ना." वडा माधवरावांच्या हातात देत सुमेधा बोलली.

" मला वडे आवडत नाहीत. तसंही माझं डोकं चढलंय." रेखाताई रुक्षपणे बोलल्या.

" अरे हो.. बाबा धमालच झाली. तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही साड्या आणायला गेलो. तर यांना एक जुन्या पॅटर्नची साडी आवडली. मी एक नवीन डिझाईनची घेतली. सांगा कशी आहे?" हातातले वडे बाजूला ठेवून बॅगेतली साडी माधवरावांना दाखवत सुमेधाने विचारले.

तोंडात गरम वडा असलेले माधवराव उत्तर द्यायला बिचकले. कारण दोन्ही बाजू अपेक्षेने त्यांच्याकडे बघत होत्या. अशावेळेस सुज्ञ माणूस जे करेल तेच त्यांनी केले. त्यांनी अशाप्रकारे मान हलवली की ज्याचा अर्थ हो पण होतो आणि नाही सुद्धा. रेखाताई खुश कारण माधवरावांना साडी आवडली नाही आणि सुमेधा खुश कारण तिला वाटले आवडली.

सासूसुनेच्या भांडणात अडकलेल्या या सासर्‍याची अवस्था अशीच बिकट राहिल की तो शोधून काढेल यातून काही उपाय बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all