Login

कारण सासरा पण कधी नवरा होता.. भाग २

कथा एका हुशार सासर्याची


कारण सासरा पण कधी नवरा होता.. भाग २


" बाबा.. मला स्वयंपाक जमत नाही का?" रेखाताई मंदिरात गेल्या आहेत हे बघून रडत सुमेधाने विचारले.

" नाही ग बाळा.. काय झाले?" माधवराव प्रेमळ पित्याच्या भूमिकेत शिरले.

" बघाना.. आज सकाळी अनयला शिरा खायचा होता. म्हणून मी एका बाजूला रवा भाजायला घेतला , दुसरीकडे कांदा चिरायला घेतला. तर लगेच सासूबाई टोमणा मारून गेल्या. आमच्याकडे शिर्‍यात कांदा नाही घालत म्हणे. आणि हसल्या. त्यांचे बघून अनयही हसला."

सुमेधाला बोलताना रडू आवरत नव्हते. माधवराव कमालीचा गंभीर चेहरा करून बसले होते.

" अनय हसला काय?"

" हो ना.." नाक ओढत पुढे सुमेधा सांगू लागली." नंतर म्हणाला, आई तूच कर शिरा.. नाहीतर ही त्यात काजूबदामाऐवजी आलंलसूण टाकायची. आता याला गोड शिरा हवा होता तर तसं सांगायचं ना.. मला काय समजणार याला गोड हवा की तिखट?"

" पण तो सांजा किंवा उपमा म्हणाला होता का ?"

" नाही.. पण मला एवढे वाईट वाटले. आमच्या लग्नाला सहा महिनेसुद्धा झाले नाहीत. मला वेळ लागणार ना याच्या मनातलं समजून घ्यायला. लगेच हसायचं? तुम्ही किती समजून घेता मला. याला नको का समजून घ्यायला? " सुमेधाने परत भोकाड पसरलं.

" तू रडू नकोस. जा तोंड धू.. छान चहा कर आपल्याला. तो ऑफिसमधून आला की बोलतोच त्याच्याशी. आणि तुला ऑफिसला नाही जायचे?"

" जायचं आहे ना.. पण सकाळी तुम्ही वॉकला गेल्यावर हे झालं. मग तुम्हाला सांगायचे होते. आता आवरते आणि जाते." सुमेधा डोळे पुसत बोलली.

" जायच्या आधी चहाचं तेवढं बघ.."

" हो बाबा.."

गरम चहात बटर बुडवून माधवराव खाणार तोच रेखाताई दत्त म्हणून समोर उभ्या राहिल्या.

" हे काय खाताय?"

" चहाबटर.. तू खाणार का? सुमेधाने फक्कड चहा केला आहे."

" तेवढंच जमतं तिला. आणि मी मरमरून हा शिरा केला आहे, तो कोणाच्या तोंडात घालू?"

" अग पण.." माधवरावांनी बोलायचा प्रयत्न केला. त्यांना शब्दही बोलू न देता रेखाताईंनी बशीभर शिरा समोर आणून ठेवला.

" गरम गरम देईल म्हटलं तर त्या नानानानी पार्कात मित्रांसोबत चकाट्या पिटत बसलात. तोवर म्हटलं पटकन मंदिरात जाऊन यावं तर इथे हे खात बसलात. किती ते छळायचे माणसाने.. खा हा शिरा गपगुमान."

तेवढ्यात ऑफिसची तयारी करून सुमेधा आली. माधवरावांनी तिच्याकडे हतबल नजरेने बघितले. तिचे डोळे पाण्याने डबडबले. मग काय.. माधवरावांनी एक घास शिर्‍याचा एक घास चहाबटरचा असं करत नाश्ता संपवला. सुमेधा विजयी नजरेने ऑफिसला गेली तर रेखाताई स्वयंपाकघरात.. आणि माधवराव???

तुम्हाला काय वाटतं कुठे गेले असतील? सासूसुनेच्या भांडणात माधवरावांचा जीव अडकला आहे. जीव अडकला तर सोडवून घेता येईल एकवेळ.. पोट अडकल्यावर काय करायचे? कसे सुटतील माधवराव या जाचातून. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all