मागील भागात आपण पाहिले की सुनेच्या आणि बायकोच्या मध्ये माधवराव अडकले आहेत. पुढे बघू काय होते ते.
" जसा असशील तिथून निघून ये.. ही काय मेसेज करायची पद्धत आहे का बाबा? किती घाबरलो होतो मी. तुम्हाला माहिती होतं ना आज माझी मित्रांसोबत पार्टी आहे ते." अनय वडिलांवर वैतागला होता.
" हे बरं आहे. दिवसभर त्रास मी सहन करणार. आणि तू मस्त पार्टी करणार." माधवराव वैतागले होते.
"त्रास.. कसला त्रास?" अनयने आश्चर्याने विचारले.
" तुझ्या बायकोचा आणि आईचा. हिला वाटणार ही बरोबर तिला वाटणार ती. मधल्या मध्ये माझी वाट लावतात. त्या दिवशी शिरा आणि चहाबटर खाल्लं मी.. विश्वास बसेल तुझा?" माधवराव बोलत होते आणि अनय हसत होता.
" हसा हसा.. तुमचा खेळ होतो आणि आमचा जीव जातो. म्हटलं लोकाघरची पोर आहे तिला परकं वाटू नये म्हणून तिला समजून घेऊ लागलो तर आमच्या सहचारिणीने असहकार आंदोलन सुरू केले. या दोघींना एकमेकींच्या गोष्टी पटणार नाहीत आणि यांचा न्यायाधीश मात्र मी. नको रे बाबा नको. हे असंच चालू राहिलं तर मी लवकरच परत कामाला जाणं सुरू करीन." माधवरावांचे शब्द ऐकताच अनयला परिस्थितीचे गांभीर्य समजले.
" पण मग बाबा यावर उपाय काय? तुमचं लग्न झाल्यावर सुद्धा आई आणि आजीचं भांडण झालं असेलच ना.. मग तेव्हा तुम्ही काय केलंत?"
"तोच उपाय सांगायला ती तुला इथे एकट्याला भेटतो आहे. हाच उपाय माझ्या वडिलांनी केला होता, आजोबांनी ही वापरला होता.. पणजोबांनीही.."
" हा आपला पिढीजात उपाय आहे, हे समजलं मला.. पण उपाय तर सांगा." उतावीळपणे अनय बोलला.
" ऐक मग.." माधवरावांनी अनयच्या कानात बोलायला सुरुवात केली. अनयचा चेहरा खुलू लागला.
" सुमेधा.. ए सुमेधा.. हा ओला टॉवेल सोफ्यावर कोणी टाकला. आणि या पेपरची घडी कोणी मोडली?" माधवरावांचा आवाज चढला होता.
" तो माझा टॉवेल आहे. मला उशीर होत होता म्हणून तिथेच टाकला आणि मॅचचा स्कोर बघायचा होता म्हणून पेपर घेतला होता. त्यात काय एवढं?" अनय बेफिकीरपणे बोलला.
" त्यात काय एवढं? स्वतःच घर असतं तर समजलं असतं.." माधवराव गर्जले. या दोघांचा संवाद ऐकणार्या सुमेधा आणि रेखाताई जरा घाबरल्या. अनय कधी वडिलांना उलट बोलला नव्हता. मस्करी चालायची पण भांडण.. कधीच नाही.
" अहो.. मी काय म्हणते.." रेखाताई मध्ये बोलायला गेल्या.
" काही बोलू नका. जराही शिस्त नाही. आयते मिळाले ना सगळे."
" आयतं कसं मिळेल? पैसे देतो दर महिन्याला.. शी.. सकाळी सकाळी कटकट. पूर्ण दिवस खराब जाणार." अनय तोंड वाकडं करत तिथून निघाला.
" बघितलं.. कसे बोलतात तुमचे चिरंजीव. तुमचेच लाड." माधवराव तणतणत बाहेर पडले. दोघेही नाक्यावरच्या टपरीवर भेटले.
" कशी वाटली माझी संवादफेक?" अनयने फुशारकी मारत विचारले.
" बरी होती. पण माझ्याइतकी प्रभावी नव्हती. आता हे असेच चालू ठेवायचे. कमीतकमी घरातली कटकट कमी होईपर्यंत." माधवराव चष्मा नीट करत म्हणाले.
" जशी आपली आज्ञा पिताश्री. आम्ही आपल्या शब्दाबाहेर नाही." इथे या दोघांचे चहापान होईपर्यंत घरी सासूसुना टेन्शनमध्ये होत्या.
" सासूबाई.. अचानक हे काय झाले ओ?"
" आपल्या घराण्याला हा शापच आहे बघ. मुलाचं लग्न झालं की बापमुलाचे संबंध बिघडतात. आमच्या लग्नाला वर्ष झालं होतं तेव्हा माझ्या सासूबाई बोलल्या होत्या. माझा इतके दिवस विश्वास नव्हता. पण आता हे बघून खात्री पटली. मामंजी तर आम्हाला घराबाहेर काढायला निघाले होते. सासूबाई मध्ये पडल्या म्हणून नाहीतर काही खरं नव्हतं."
" मग आता? बाबा पण आम्हाला वेगळं काढणार?" सुमेधा रडवेली झाली.
" असे कसे काढतील? मी आहे ना?" रेखाताई ठामपणे बोलल्या.
माधवराव चहा पिऊन घरी आले. येताच रेखाताईंनी समोर पोहे ठेवले.
" मी काय म्हणते.. कशाला ती एवढी चिडचिड करायची? त्याने काही साध्य होणार आहे का? शेवटी आपलाच मुलगा तो. आता मी बघा. सुमेधा आपली सून पण वागवते ना तिला आपल्या मुलीसारखी? आम्ही चिडतो का एकमेकींवर की भांडतो? सोडून द्यायचं. पटतंय ना मी काय म्हणते आहे ते?" त्यांचं बोलणं ऐकून माधवराव गालातल्या गालात हसले. ते का हसले हे रेखाताईंना नाही समजलं.. पण तुम्हाला समजलं का? ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा