सासू -सून आणि शेजारीण

गोष्ट सासू आणि शेजारणीची
"कल्पना काकू, काल तुमची सून चांगली दोन -तीन तास बाहेर गेली होती म्हणे. मग घरातलं कोण बघणार होतं?" पाटील बाई कुंपणाच्या भिंतीवरून वाकून बघत म्हणाल्या.

"हो अहो. दोघं बाहेर जातात आणि घरची सगळी कामं मी करायची. आम्ही काय रिकामेच आहोत म्हणून यांना हिंडायला रान मोकळं. तुम्हाला सांगते, आम्हाला आमच्या नवऱ्यानं कुठंही नेलं नाही. हिचा नवरा मात्र हिला सगळीकडे फिरवतो! जाऊ दे. आता बोलून तरी काय उपयोग? आपलेच दात आणि आपलेच ओठ." कल्पना काकू आत आल्या. नुकतंच आवरून आपल्या खोलीत गेलेल्या सुनेच्या नावाने खडे फोडून त्या पलंगावर आडव्या झाल्या.
'पाटील बाई म्हणतात तेच खरं. आजकालच्या मुलींना काही करायला नको.'

दुपारी दोन तास मोबाईल बघितल्यानंतर जरा कुठे कल्पना काकूंचा डोळा लागला, तोवर त्यांची सून चहा घेऊन हजर झाली.
"आई, चहा."

"अगं, आत्ता कुठे माझा डोळा लागला होता. तोवर लगेच चहा!"

"आई, पाच वाजून गेलेत." सून घड्याळाकडे बघत म्हणाली.

'अगंबाई, मोबाईल बघता - बघता वेळेचं भानच राहिलं नाही.' सासुबाई मनातल्या मनात म्हणाल्या.
"आण तो चहा."

सुनबाई आत गेल्या आणि पाटील बाई कुंपणावरून परत डोकावल्या.
"झाला का चहा?"
"हे काय! आत्ताच केला बघा." कल्पना काकू चहाचा कप घेऊन बाहेर आल्या.

"सुनबाई कुठं दिसत नाही?" पाटील बाई आत डोकावल्या.
'आत आहे ती.' कल्पना काकू खुणेने म्हणाल्या.
"आता बाहेर जायची तयारी चालली असेल."

इतक्यात त्यांची सून पिशव्या घेऊन बाहेर आली.
"आई, काय सामान आणायचं आहे?"

"सकाळीच यादी करून टेबलावर ठेवली आहे. ती घे आणि सामान आणा. एकटीच निघालीस?आणि तुझा नवरा कुठं आहे?"

"त्याचं ऑफिस संपलं की आम्ही दोघे सोबत जाऊ." सून आत गेली आणि कल्पना काकू आणि पाटील बाई एकमेकींकडे पाहून सूचक हसल्या.
"आता तुम्ही सांगा, हिला एकटीला जायला काय होतं? बघावं तेव्हा नवरा सोबत हवाच आणि तोही नाही म्हणत नाही. लगेच हिच्या मागून पळतो. बरं, गेलं तरी लवकर काही येत नाहीत ही दोघं आणि आता बाहेर जाणार म्हणजे काहीतरी खाऊनच येणार बघा." इतकं बोलून दोघी हळूहळू आवाजात काहीबाही बोलू लागल्या.

इकडे कल्पना काकूंची सून दाराला कान देऊन दोघींचं सगळं बोलणं ऐकत होती. याची कल्पना त्यांना मुळीच नव्हती.
"मला दुधाचा चहा मुळीच आवडत नाही.. म्हणजे दूध आणि पाणी गॅसवर एकत्र उकळून केलेला चहा ओ. पण ही मात्र तसाच चहा करते. दारासमोर माझीच रांगोळी असलेली मला आवडते. इतक्या वर्षांची सवय लगेच कशी जाईल? किराणा दुकानातून सामान आणलेलं मला आवडत नाही. मॉलमध्ये गेलं की आपल्या हाताने घ्यायला येतं ना." कल्पना काकूंचं 'मी' पुराण सुरू होतं. हे बघून त्यांची सून चिडून आपला नवऱ्याकडे गेली.
"आई, अशा का वागतात?"

"आता काय झालं?" आशिष लॅपटॉपमधून डोकं बाहेर काढत म्हणाला.

"आईंना काहीच आवडत नाही. आपण दोघं बाहेर गेले तरी त्यांना खपत नाही. आपण कामासाठी जातो ना.. की फिरायला जातो? आणि गेलो तरी काय हरकत आहे? नुसतं घरात बसून राहायला आपण काही जख्ख म्हातारे झालो नाही अजून. बरं, घरात मी सगळं काही करायचा प्रयत्न करते. तरीही काहीतरी कमी काढायलाच हवी का?" आशिषने आपल्या बायकोकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं.

थोड्या वेळाने जेव्हा सुनबाई बाहेर आल्या तेव्हा कल्पना काकू आणि पाटील बाई अजूनही बोलतच होत्या.
"हम्म..मग काय तर? सदानकदा माझ्याकडे रागाने बघते. जेव्हा बघावं तेव्हा हिच्या कपाळावर आठ्या पडलेल्या असतात. असं कसं चालेल? तुम्ही रोज मला बघता. मी सर्वांशी किती हसून -खेळून वागते? माझा स्वभाव अतिशय बोलका, मनमिळाऊ आहे. पण आम्हाला सून मात्र चांगली मिळाली नाही." कल्पना काकूंनी आपलं तोंड कसंतरी केलं.

"मग काय तर.. आजची पिढीही आपल्या पिढीसारखी मुळीच नाही. त्यात तुमची सून न बोलता सगळं काही स्वतःच्या मनाप्रमाणे करून घेते." पाटील बाई आगीत तेल ओतत म्हणाल्या.


इकडे सून आणि मुलगा सामान आणायला गेले. तोवर कल्पना काकू सगळ्या कॉलनीभर फिरून आल्या. 'साडेसात वाजून गेले, आता स्वयंपाक करायचा आहे ' म्हणून प्रत्येकाच्या घरी सांगून आल्या. कॉलनीत प्रत्येक घरात असंच वाटायचं, सून आली तरी ही सासू अजून सगळं काही करते. यांची सून काही काम करत नाही, केवळ बाहेर फिरते. असा सर्वांचा गैरसमज झाला होता.

पण काकू घरी येण्याआधी सून आणि मुलगा सामान घेऊन आले होते. सुनेचा स्वयंपाक होत आला होता. कल्पना काकूंनी आणलेल्या सामानावर एक नजर फिरवली आणि आपलं डोकं मोबाईलमध्ये घातलं.
"आल्या -आल्या लगेच स्वयंपाक करायला घेतलास? मला वाटलं, तुम्ही बाहेर जाणार याचा अर्थ काहीतरी खाऊन येणार म्हणून मी स्वयंपाक घराकडे फिरकले नाही."

आता सून मात्र आपल्या सासुबाईंकडे खाऊ की गळू या नजरेने बघत होती. कारण मगाशी चहा प्यायलेले कप बेसिनमध्ये तिचीच वाट पाहत होते.
वर सासुबाईंनी काहीतरी करून खाल्लं होतं. तो सगळा पसारा ओट्यावर एका बाजूला तसाच पडला होता. आज काहीही झालं तरी आईंच्या हातात मुळीच ताट नेऊन द्यायचं नाही. असा निश्चय करून सुनबाईंनी पानं वाढायला घेतली.

"अगं, माझाही स्वयंपाक केलास काय? मी मगाशीच पोहे करून खाल्ले त्यामुळे मला जास्त भूक नाही. स्वयंपाक करण्याआधी निदान विचारायचं तरी." सासुबाई जोर देऊन म्हणाल्या.

"आम्ही आलो तेव्हा तुम्ही घरी नव्हता. मग विचारणार तरी कोणाला?" सून शांतपणे म्हणाली.

"झाला का स्वयंपाक?" सासुबाई काहीतरी बोलणार इतक्यात पाटील बाई पुन्हा अवतरल्या.
"कल्पना काकू, हे घ्या. गरम -गरम पिठलं केलंय. खास तुमच्यासाठी. तोंडाला तेवढीच चव येईल. आणि रोज स्वतःच्या हातचं खाऊन कंटाळा येतो माणसाला."

"अगंबाई हे आणि कशासाठी केलंत? उगीचच तुम्हाला त्रास." कल्पना काकू पिठल्याची वाटी हातात घेत म्हणाल्या.

"वाढ बाई मलाही. कधीपासून सांगते हिला मी जेवायला वाढ म्हणून..पण आत्ताच ही दोघं दमून आली. मगाशी सामान आणायला गेले नव्हते का?"
सासुबाईंच्या या बोलण्याने सुनेला मोठं आश्चर्य वाटलं आणि रागही आला. 'असं कसं कोणी वागू शकतं?' मनोमन तिला खूप चीड आली. पण मुकाट्याने तिने दोन पानं वाढली. एक आईंना दिलं आणि दुसरं पाटील बाईंना.
"एक दिवस माझ्या हातचं जेवून बघा. तसं मी रोज सगळं करते. पण तुम्ही मात्र आज बघायला आलात."
पाटील बाईंनी कसानुसा चेहरा करत वाढलेलं पानं हातात घेतलं. "कल्पना काकू, तुमच्या सुनेच्या हाताला मस्त चव आहे हं. कधी बोलला नाहीत ते?" या प्रश्नावर कल्पना काकू नुसत्याच हसल्या. त्यांनी एक खरमरीत नजर पाटील बाईंकडे टाकली. कारण आता ही बातमी पूर्ण कॉलनीभर फिरणार होती आणि कल्पना काकूंपेक्षा त्यांच्या सुनेच्या हाताला जरा जास्तच चव आहे. ही बातमी चवीने बोललीही जाणार होती. अर्थातच काकूंचं महत्त्व कमी होणार होतं.

कल्पना काकूंनी तोंड देखलं हसत -हसत ती पिठल्याची वाटी बाजूला काढून ठेवली.
"तरी मी सांगत होते, मला बाई भूकच नाही." असं म्हणत त्या घरातून बाहेर आल्या आणि पाटील बाई मात्र त्यांच्याकडे आश्चर्याने पाहायला लागल्या. कल्पना काकू का नाराज झाल्या? हे काही त्यांना कळेना. बाकी काही न बोलताही बातमी तिखट मीठ लावून कशी सांगायची याचा विचार करत पाटील बाई पट्कन शेजारच्या घरी निघून गेल्या. जाताना मात्र ती पिठल्याची वाटी न्यायला अजिबात विसरल्या नाहीत!

समाप्त.
©️®️ सौ. सायली धनंजय जोशी.