Login

सासू ती सासूच असते

सासू कठोर असली तरी तिला सगळ्यांची काळजी असते
सासू ती सासूच असते

श्रावणीचं नुकतंच लग्न झालं होतं. ती पुण्यात शिकलेली आणि आधुनिक विचारांची, स्वतंत्र स्वभावाची मुलगी होती. आणि आता तिचं लग्न झालं होतं ते सातार्‍यातल्या एका पारंपरिक कुटुंबात.

पहिल्याच दिवशी तिनं घरातलं वातावरण अनुभवलं. ते असं की सकाळी पाच वाजताच स्वयंपाकघरातून सासूबाईंच्या बडबडण्याचा आणि भांड्यांचा आवाज कानावर पडला.

सकाळी सहा वाजता श्रावणी कसं बसं आळस झटकून उठली आणि हळूच खाली आली. आणि पाहिलं तर स्वयंपाकघरात सासूबाई, सुमतीबाई, हातात झाऱ्या घेऊन काहीतरी करत होत्या. तिला आलेलं बघून लगेच त्यांच्या डोळ्यात राग जमा झाला.

"श्रावणी, पाच वाजता उठायचं असतं. घरात देवपूजा करायची असते. बाहेर अंगण झाडायचं असतं, आता मी जर ही कामं केली तर लोक मला काय म्हणतील.... तू नवीन सून आहेस, त्यामुळे लोकांच्या नजरा तुझ्यावरच असणार." सुमतीबाई म्हणाल्या.

"माफ करा आई... खूप दमले होते काल... पण यापुढे मी लक्षात ठेवीन." श्रावणी थोडं ओशाळून म्हणाली.

"हो तेच बरं होईल, हे असं पुण्यात चालत असेल, पण इकडं नाही ग बाई. इथे सासर आहे. इथं सून म्हणजे घराच्या प्रतिष्ठेचा आरसा असतो." सुमतीबाई नाक मुरडत म्हणाल्या. त्यावर श्रावणी काही बोलली नाही. पण तिच्या मनात सल निर्माण झाली होती. सून म्हणजे आरसा? पण मग माझ्या भावना, माझं स्वतःचं अस्तित्व? त्याचं काय...? असा विचार तिच्या मनात आला.

श्रावणी नवीन होती तरीही तिच्या परीने जमेल तसं काम करत होती. हळूहळू दिवस पुढे ढकलत होते. सुमतीबाईंच्या छोट्या छोट्या कुरघोडी चालूच होत्या. पण श्रावणीचा नवरा अमित चांगला होता. तो तिचं मन जपत होता, तिचं दुःख जाणून घेत होता, त्यामुळे तीही हळूहळू काही छोट्या मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू लागली होती.

एक दिवस भाजी करत असताना श्रावणी जरा मोबाईल बघत होती. त्यात तिचं काहीतरी काम चालू होतं. तिचं त्या भाजीकडे लक्ष न गेल्यानं भाजी करपली. त्या वासाने सुमतीबाई लगेच तिथे आल्या आणि तिच्यावर रागावल्या.

"हे काय केलंस? तुला तुझ्या आईने काही शिकवलं की नाही? अन्न हे देवासारखं असतं, त्याची अशी नुकसान होऊ द्यायची नसते." सुमतीबाई ओरडून बोलल्या.

"आई, माझी चूक झाली आणि ती मला मान्य आहे पण माझ्या आईवर आरोप करू नका. तिने चांगलंच शिकवलंय मला." श्रावणी शांत पण स्पष्ट बोलली.

"मग ते दिसायला हवं ना? सासर म्हणजे मोकळं मैदान नाही. इथं आदर करता यायला हवा, जबाबदारी घेता यायला हवी." सुमतीबाई म्हणाल्या तसं श्रावणी तडक खोलीत गेली. तिच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले. अमित ऑफिसला गेला होता. तिला कोणाशी बोलावं हेच सुचत नव्हतं. ती बराच वेळ तशीच रडत बसली.

दोन दिवसांनी श्रावणी तापाने चक्कर घेऊन पडली आणि बेशुद्ध झाली. तिला डायरेक्ट सकाळीच जाग आली. सकाळी डोळे उघडले, तर कपाळावर ओला कपडा जाणवत होता. आणि हातही होता...तिने पाहिलं तर तो हात सासूबाईंचा होता.

"घरातल्या कोणाला काही झालं तर माझा जीव अस्वस्थ होतो. किती ताप आलाय तुला…" सुमतीबाई काळजीने बोलल्या. त्यांना बघून श्रावणी आश्चर्य चकित झाली. त्यात त्यांच्या डोळ्यात जी माया दिसत होती ती बघून तर ती अजूनच चकित झाली.

"आई… तुम्ही…?" श्रावणीने आश्चर्याने विचारले.

"तुला काय वाटलं, सासूबाई म्हणजे फक्त टोमणे मारणाऱ्या बाई असतात का? प्रेमही असतं ग पण ते लवकर असं दाखवता येत नाही." सुमतीबाई तिचा हात हातात घेत म्हणाल्या.

त्या क्षणी श्रावणीचं हृदय हलकं झालं. पण मनात अजून प्रश्न होता, या एवढ्या मायाळू आहे मग माझ्याशी इतकं कठोर का वागतात? मनात प्रश्न असूनही आता तिने काहीच विचारलं नाही. तिला बरं वाटेपर्यंत सुमतीबाईंनी तिची खुप काळजी घेतली.

एक दिवस श्रावणी सासूबाईंचं कपाट आवरत होती, तेव्हा तिला एक जुनी डायरी सापडली. तिने ती उघडून पाहिली आणि त्यात एक नोंद वाचली:

"माझी सासू रोज माझ्या चुका दाखवायची. मी खूप रडले, पण कधी बोलले नाही. मग ठरवलं की एक दिवस मी सासू होईन, तेव्हा सुनेला शिस्त लावेल, पण सावरूनही घेईल. कारण, प्रेम केलं तर ती माझी होईल, पण शिस्त लावली तर घर सावरेल." ते वाचून श्रावणी स्तब्ध झाली. तिला सुमतीबाईंचा स्वभाव आता कुठे समजू लागला.

एक दिवस संध्याकाळी दोघी एकत्र चहा घेत होत्या. श्रावणीने आज सुमतीबाईंशी मनमोकळेपणाने बोलायचं ठरवलं. आणि ती बोलू लागली.

"आई, तुम्ही खूप छान आहात. पण थोडंसं प्रेमाने का सांगत नाही सगळं?" श्रावणीने हळू आवाजात विचारलं. तसं सुमतीबाई हलकसं हसल्या.

"प्रेम असतं ग श्रावणी... पण सासू म्हणून थोडं बंधनही असतं. आई म्हणून लाड करता येतो, पण सासूबाई म्हणून थोडं आवरावं लागतं." सुमतीबाईंच्या बोलण्यावर श्रावणी पण हसली.

"म्हणजे तुम्ही डबल रोल करता... एक सॉफ्ट कॉर्नर आणि एक कडक शिस्त?" श्रावणी हलकसं हसत म्हणाली. तसं सुमतीबाईंनी हसून मान डोलावली.

"हो. कारण सासू ती सासूच असते. ती आई होऊ शकते, मैत्रीण होऊ शकते, पण तिच्या बोलण्यात नेहमी एक धागा असतो... हे घर माझं आहे, ही माझी जबाबदारी आहे, ती मी सुरळीत पार पाडली तशीच ती सुनेनेही पार पाडावी एवढी एकच अपेक्षा आहे, म्हणून कधी कधी डबल रोल करावा लागतो." सुमतीबाईंचं मन श्रावणीला आता चांगलंच कळलं. या घरावर, घरातील माणसांवर आणि या संसारावर त्यांचं किती प्रेम आहे हे तिला समजलं.

आता श्रावणी हळूहळू घराच्या सगळ्या कामांमध्ये रमू लागली. ती सकाळी  पाचला उठू लागली, सासूबाईंना मदत करू लागली, आणि दोघी संध्याकाळी एकत्र बसून चहा पिता पिता गप्पा मारू लागल्या. अमितही ते बघून खुश झाला.

आज तो घरी आला आणि त्या दोघींजवळ जाऊन बसला.

"आई, आता आपलं घर घरासारखं वाटतं… तुम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी शोभून दिसताय." अमित खुश होऊन म्हणाला. त्यावर सुमतीबाई हसल्या.

"मुलगा तर माझा आहेच, पण सून सुद्धा आता माझं मन जाणू लागली आहे." सुमतीबाई पण आनंदाने म्हणाल्या आणि ते तिघेही मस्त एकत्र चहा पिऊ लागले.

श्रावणीच्या डायरीत आता ही ओळ असते

"सासू ती सासूच असते... कधी ती वादळासारखी असते, पण काही वेळा सावलीसारखी पण असते."