Login

सासूबाई प्लिज ऐका ना.. भाग २

सासूबाई, प्लिज ऐका ना.. व्यथा एका सुनेची..
सासूबाई, प्लिज ऐका ना.. भाग २

विवाह सोहळ्याचा दिवस उजाडला. शाल्मलीच्या आईवडिलांनी एका आलिशान हॉटेलमध्ये दोघांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने लावून दिला. संपूर्ण पंचक्रोशीत इतका सुंदर विवाह सोहळा कोणाचा झाला नव्हता. विवाह सोहळा संपन्न झाला. आणि शाल्मली देशमुख आता 'शाल्मली स्वप्नील केळकर' झाली.

शाल्मली केळकरांच्या घरचा उंबरठा ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरी आली. लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा, देवदर्शन, जागरण गोंधळ अगदी सर्व विधी साग्रसंगीत पार पडल्या. त्यानंतर स्वप्नील आणि शाल्मली हनिमूनसाठी स्वित्झर्लंडला फिरायला गेले. स्वप्नीलच्या सहवासात,त्याच्या प्रेमात शाल्मली सुखाने नाहून निघाली. ते मंतरलेले दिवस, मोहरलेले क्षण, त्या आठवणी मनात रुजवत शाल्मली स्वप्नीलसमवेत परत घरी, सासरी आली.

शाल्मलीचा संसार सुरू झाला. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे ती सासरी सर्वांची लाडकी झाली. स्वप्नील तिच्यावर अगदी मनापासून प्रेम करत होता. तिचे सासुसासरेही तिच्यावर मुलीसारखी माया करत होते. शाल्मली खूप आनंदात होती. पदवीधर झाल्यानंतर शाल्मलीने एम.बी.ए.(फायनान्स) केलं होतं. एका मोठ्या कंपनीत ती नोकरी करत होती. पण लग्नानंतर तिला एक छानसं कौटुंबिक, वैवाहिक आयुष्य जगता यावं, तिच्यामुळे कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून तिने तिची चांगली नोकरी सोडून दिली. किंबहूना एक श्रीमंत, सधन सासर लाभल्याने, घरात सुबत्ता नांदत असल्याने, सर्व सुखसोयी उपलब्ध असल्याने तिला नोकरी करण्याची गरजच वाटली नाही. शाल्मली आपल्या संसारात रमली. आपल्या वडिलधाऱ्या मंडळींनी आणि मैत्रीणींनी सांगितलेल्या सूचनांचं ती काटेकोरपणे पालन करत होती. सासुसासऱ्यांची सेवा करत होती. साऱ्यांची मनं जपत अगदी सुखासमाधानाने आपला संसार नेटाने करत होती.

सगळं छान सुरळीत सुरू होतं. तिच्या सासूसासऱ्यांनाही आपल्या सुनेचं फार कौतुक वाटायचं. सासूबाई तर घरी येणाऱ्या प्रत्येकाजवळ शाल्मलीचे गोडवे गायच्या. पण त्या दिवसांनंतर मात्र शाल्मलीला सासूबाईंच्या वागण्या बोलण्यात बदल जाणवू लागला. रोज मायेने वागणाऱ्या सासूबाई तिच्याशी तुसडेपणाने वागू लागल्या. कारणही तसंच होतं. पण त्यात तिचा काय दोष? तिलाच समजेना.
रात्री जेवण्याच्या टेबलवर स्वप्नील म्हणाला,

“आई बाबा, मी आणि शाल्मली वेगळं राहायचं म्हणतोय. मला इथून माझं ऑफिस दूर पडतं. हिंजवडी जवळच भाड्याने घर घेऊन राहू”

आईबाबांना खूप आश्चर्य वाटलं. शाल्मलीही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली.

“असं अचानक कसं ठरलं? इथे काय त्रास आहे?”

बाबा त्रासिक मुद्रा करत म्हणाले. आई स्वप्नीलला समजावून सांगत होती.

“अरे,पण आम्ही इथे तू तिथे. आमची वयं झालेली. तुझ्या बाबांना अस्थमाचा त्रास होतो. मलाही आता काम होत नाही. गुडघे दुखतात. रात्री अपरात्री कधीही डॉक्टरांकडे जावं लागतं. तू जवळ नसशील तर कोणाला सांगू आम्ही? आणि आतापर्यंत तर इथूनच ऑफिसला जातच होतास न! मग आता नेमकं काय झालं?”

स्वप्नीलने शाल्मलीकडे एक कटाक्ष टाकला आणि ते शाल्मलीच्या सासूबाईंनी पाहिलं. सासूबाईनी स्वतःचा काय समज करायचा तो करून घेतला.

रात्री झोपायला गेल्यावर शाल्मलीने स्वप्नीलजवळ विषय काढला.

“स्वप्नील, तू वेगळं राहण्याचा निर्णय घेण्याआधी काहीच बोलला नाहीस. अचानक कसं ठरवलंस?”

“अग, लग्न झाल्यावर स्वतंत्र व्हायचं असं मी लग्नाआधीच ठरवलं होतं. तुझ्या माझ्यात मला दुसरं कोणी नकोय. खरंच आपल्याला प्रायव्हसी मिळत नाही इथे. बाबांच्या सारख्या सूचना ऐकाव्या लागतात. मला वाटलं तूच बोलशील. पण तू काही बोलेना म्हणून मीच बोललो.”

स्वप्नीलने मोबाईलमधून डोकं बाहेर काढत तिला उत्तर दिलं


पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..