Login

सासूबाई प्लिज ऐका ना.. भाग ४(अंतिम)

सासूबाई, प्लिज ऐका ना.. व्यथा एका सुनेची..
सासूबाई, प्लिज ऐका ना.. भाग ४ (अंतिम)

शाल्मलीने बोलायला सुरुवात केली.

“आई, माझं लग्न ठरलं न, तेंव्हापासून माझ्या घरचे, मैत्रिणी मला मी सासरी गेल्यावर कसं वागावं, कशी जबाबदारी घ्यावी याचं बाळकडू पाजत होत्या. ते वर्षानुवर्षे चालत आलेल्या जबाबदाऱ्यांचं ओझं माझ्या खांद्यावर टाकून मोकळ्या होत होत्या आणि मीही विनातक्रार मनापासून ते स्वीकारलं. त्यांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालनही करत होते. पण मला सांगा आई, आजवर कधी नवऱ्या मुलाला सांगितलं जातं का ओ? की स्वतःचे जन्मदाते,आप्तेष्ट, मित्रमैत्रिणीना,सोडून येणाऱ्या तुझ्या पत्नीला दुःख देऊ नकोस. तिला घरकामात मदत करत जा. जसे तुझ्या आईवडील तिची जबाबदारी आहे तसच मुलीचे आईवडील तुझ्या आईबाबांसारखेच आहेत. त्यांना सांभाळण्यासाठी जबाबदारी तुझीच. नाही ना सांगत.! असं माझ्या तरी ऐकीवात नाही.”

“आई, जानकीकाकू आणि उमाकाकू म्हणाल्या, तूमच्या सुनेने मुलाला बदलवून टाकलं. तिला सासू सासरे नकोच होते. ती शिकवते मुलाला. सून घरात आली आणि घर विभक्त झालं. हल्ली मुलगा सगळं तिचचं ऐकतो. असं बरच काही. खरंच का ओ असं असेल? इतकं अवलंबून असेल सुनेवर? एक मुलगी आपलं घरदार, आई वडील, आप्तेष्ट सोडून येते. अगदी तीच स्वतःचं नाव1सुध्दा मागे सोडून येते. त्या मुलींमध्ये इतकी शक्ती असेल? म्हणजे ही नववधु नाही तर रणरागिणी जणु.! हे सगळं घडत असताना मुलाची मानसिकता काय असते? याचा कधी विचार केलाय का? आई, सुनेने जरी सासुसासऱ्यांचं सगळं मनापासून केलं तरी मुलाला हवे असतात का आईवडील? एक मुलगा म्हणून त्याला स्वतः चे काही मत असेल न? त्याला का येत नाही समतोल साधता? आईवडील आणि पत्नी यात समान वागणूक का नाही? वाईट झालं की सुनेमुळे. चांगले झालं की मुलानं नीट सांभाळून घेतलंय. असं बोलायचं. का आई?”

“आई, तुम्ही तुमच्या मुलाला विचारलं का कधी? त्याला काय हवंय? त्याला स्वातंत्र्य हवंय. शिक्षणासाठी घराबाहेर राहिल्याने एकट राहण्याची सवय झालीय त्याला. आईबाबांचं बोलणं उपदेश वाटू लागलंय. आणि म्हणून मग विभक्त व्हायचं आहे त्याला. आई, पण दोष मात्र मला. नविन येणाऱ्या सुनेला. काय शोकांतिका.! मला एक कळत नाही जन्मापासून ज्या आईवडिलांनी प्रेम केलं, माया दिली. हे सगळं तुमची पोटची मुलं विसरून जातात? ते पण सून म्हणून आलेल्या एका मुलीमुळे? कसं काय? त्या मुलाची स्वतःची मतं नसतात का? मुलाची इच्छा आणि खापर का फोडलं जावं सुनेच्या नावाने? आई, मी पाहिलंय अशा मुलांना जे आई वडील किती वाईट आहेत. किती चिकट आहेत. असं सर्वांना सांगत सुटतात. त्यांची नजर मात्र आईवडिलांच्या संपत्तीवर. संपत्तीत वाटा नाही दिला तर “जाताना वर घेऊन जाणार आहेत का?” असे प्रश्न मी ऐकलेत. पण तरीही सासुसासरे, हा समाज मात्र सुनेलाच नावं ठेवणार. परक्या घरून आलेली असते ना..! आई, हल्ली मुलांनाही आईवडील ओझं वाटू लागलेत. सून बनून आलेल्या मुलीने कितीही मुलगी बनायचा आटापिटा केला तरी तो कोणालाच दिसत नाही. जेंव्हा ”तु यात पडू नकोस’’ असं म्हणून तुमचा मुलगा, तिचा नवराच तिला थांबवत असेल तर तिने काय करावं? तीही ज्याच्या उपरण्याला पदराची गाठ बांधली गेली त्याचंच ऐकेल ना. सगळ्याच सुना वाईट नसतात हो.! कधी कधी तूमचा मुलगाही चूकु शकतो न? सांगा आई, द्या मला उत्तर.. उमाकाकू, जानकी काकू, सून कधीच मुलगी होऊ शकत नाही का? सासू आईची माया देऊ शकत नाही का?”

शाल्मली पोटतिडकीने बोलत होती. तिच्या डोळ्यांतला पाऊस बरसत होता. सासूबाईंसकट सर्वांनाच आपली चूक उमजली होती.

“सुनबाई, शांत हो, आम्हाला आमची चूक समजली. माझी सून गुणांचीच आहे. आमच्याच मुलाला हे कळत नाही त्यात कोण काय करणार. आम्हाला माफ कर सुनबाई”

असं म्हणत त्यांनी शाल्मलीचे डोळे पुसले. शाल्मली त्यांच्या कुशीत शिरली. मनसोक्त अश्रूंना वाट मोकळी करून देत होती. सासूबाई तिला कवेत घेऊन तीच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या.