Login

सासूबाईंच बाळ भाग १

सासूबाईंच बाळ भाग १
सासूबाईंच बाळ भाग १

" अहो, म्हणजे तुम्हाला समोर ठेवलेला रुमाल दिसत नाही की तो उचलण्याची शक्ती तुमच्या हातात शिल्लक नाहीये ? की आज देवाने तुम्हाला फक्त वर्तमानपत्र वाचण्यासाठीच दृष्टी दिली आहे ? "

सुनिताने हातात पाण्याचे भांडे घेत किचनमधून हॉलमध्ये प्रवेश केला आणि प्रश्नांची तोफ डागली.
सकाळची वेळ म्हणजे सुनितासाठी एखाद्या युद्धाच्या मैदानाहून कमी नसते. स्वयंपाकघरात कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज, चिन्मयला शाळेसाठी उठवण्याची कसरत आणि त्यात भर म्हणून अजयचे साहेबी थाट.

घड्याळाचा काटा ७ वर आला की सुनिताचा वेग दुप्पट होतो. एकीकडे चिन्मयच्या डब्यासाठी भेंडीची भाजी परतली जात होती, दुसरीकडे अजयच्यासाठी चहाचे आधण उकळत होते.

पण ज्याला आपण सहकार्य म्हणतो, त्याचा लवलेशही अजयच्या वागण्यात नव्हता. तो आरामात सोफ्यावर पाय पसरून बसला होता आणि सकाळच्या बातम्यांमध्ये इतके मग्न झालेला होता की जणू जगाचा कारभार त्याच्याच सल्ल्याने चालणार आहे.

" अगं सुनिता, उगीच कशाला ओरडतेस सकाळी सकाळी ? रुमाल तिथे नव्हता ग, मी मघाशीच उठून दोन-तीन वेळा तिथे बघितलं. नसेल तर नसेल, दे दुसरा काढून."

अजय वर्तमानपत्राच्या मागून अत्यंत निरागस सुरात म्हणाला. त्यांच्या या वाक्याने सुनिताच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती तणतणत सोफ्यापाशी आली. तिने एक नजर अजयकडे टाकली आणि काहीही न बोलता सोफ्याच्या कुशनखाली हात घातला. जादू केल्यासारखा रुमाल बरोबर बाहेर आला !

सुनिताने तो रुमाल अजयच्या नाकासमोर धरला. अजय फक्त दात काढून हसला आणि म्हणाला,

" अरे वा ! मघाशी नव्हता ग तिथे ! नक्की तूच लपवून ठेवला असशील मला त्रास द्यायला."

यावर सुनिताने फक्त एक दीर्घ श्वास घेतला. तिला माहीत होतं की, या माणसाला डोळे असून न दिसणे हा जुना आजार आहे का ?

ती रागाने पुन्हा किचनकडे वळलीच होती, तोच किचनमधून एक मोठा आवाज आला,
'धडाम!'
आणि त्यानंतर काच फुटल्याचा
' खळळ '
आवाज घरात घुमला.

सुनिताच्या काळजाचा ठोका चुकला. ती धावतच किचनमध्ये पोहोचली. समोरचं दृश्य पाहून तिचा पारा थेट १०० अंशांवर पोहोचला. दहा वर्षांचा चिन्मय डायनिंग टेबलपाशी उभा होता. त्याच्या हातातील दुधाचा ग्लास जमिनीवर पडला होता. पांढरे शुभ्र दूध पूर्ण फरशीवर पसरलं होतं आणि त्या काचेच्या ग्लासाचे छोटे छोटे तुकडे सुनिताच्या कष्टांची थट्टा करत होते.

" चिनू ss "

" अरे चिन्मय ! किती वेळा सांगितलंय तुला ? एका जागी बसून दूध पिता येत नाही का ? की तुला नाचल्या शिवाय भूक लागत नाही ? "

सुनिता ओरडली. तिचा संयम सुटला होता. सकाळी सहा वाजल्यापासून ती यंत्रासारखी राबत होती आणि आता हे नवीन काम समोर आलं होतं. रागाच्या भरात तिने सटकन चिन्मयच्या पाठीत एक जोरात धपाटा घातला.

चिन्मयचा चेहरा रडवेला झाला. तो रडत रडत म्हणाला,
"आई, सॉरी ना... मी फक्त ते कार्टून बघत होतो."

" जा ! कोपऱ्यात जाऊन उभा राहा ! आता शाळा सुटेपर्यंत तुझं खेळणं बंद."

सुनिताने हुकूम सोडला. चिन्मय रडत रडत बाजूला झाला. सुनिताने पदर खोचला आणि खाली वाकून काचा आवरायला सुरुवात केली. तिला चिन्मयला मारल्याचं मनात कुठेतरी वाईट वाटत होतं, पण शिस्त लावणंही गरजेचं होतं. मुलं चुकली की आईचा हात उठतोच, कारण मुलाला भविष्यात सुधारायचं असतं.

काचा गोळा करताना सुनिताच्या मनात विचार आला,
' मुलाने चूक केली तर त्याला मारून मी शिस्त लावू शकते. त्याला रडवून का होईना, पण चूक उमजवून देऊ शकते. पण हॉलमध्ये बसलेल्या त्या ' मोठ्या बाळाचं ' काय ?

सासूबाईंनी त्यांच्या बाळाला वाढवलं, पण त्यांनी आवरण्याचं ट्रेनिंग अपूर्ण राहिलंय. अजयच्या हातून काही फुटलं तर मी त्यांना मारू शकत नाही, फक्त ओरडू शकते. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, चूक मुलाने करो किंवा नवऱ्याने, ती दुरुस्त करून पसारा आवरण्याची अंतिम जबाबदारी मात्र या माझ्यावरच येते !

स्वयंपाकघरात सांडलेलं दूध पुसताना सुनिताला जाणवलं की, एका आईसाठी मुलाला सांभाळणं हा शारीरिक कष्टाचा भाग असतो, पण सासूच्या बाळाला सांभाळणं ही मानसिक कसरत असते. मुलाला मारून गप्प करता येतं, पण नवऱ्याच्या चुकांकडे बघून फक्त कपाळावर हात मारून घेता येतो. सकाळची ही फिल्डिंग आता कुठे सुरू झाली होती, दिवस तर अजून पूर्ण बाकी होता.

" सुनीता... अगं ऐकतेस का ? हे बघ, आज पुन्हा या कपाटाने माझ्यावर अन्याय केलाय ! माझा निळा शर्ट या कपड्यांच्या गोंधळात कुठे तरी गायब झालाय ! " अजयचा आवाज बेडरूम मधून एखाद्या युद्धाच्या हाके सारखा आला.

सुनिता किचनमध्ये चिन्मयचा डबा पॅक करत होती. मगाशी चिन्मयला मारलेला धपाटा तिच्या मनात अजूनही कुठेतरी टोचत होता, पण अजयच्या ओरडण्याने तिचे लक्ष विचलित झाले. तिने गॅस बंद केला आणि तणतणत बेडरूममध्ये गेली.

समोरचे दृश्य पाहून सुनिताचे डोळे विस्फारले. तिने गेल्या रविवारी मोठ्या कष्टाने लावलेलं कपाट आज तुफान येऊन गेल्यासारखं दिसत होतं. अजयनी आपला आवडता निळा शर्ट शोधण्याच्या नादात इस्त्री केलेल्या किमान दहा-बारा कपड्यांच्या घड्या विस्कटून त्या जमिनीवर फेकल्या होत्या.