Login

सासुबाईंच्या राज्यात भाग -१

चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
जलद लेखन स्पर्धा माहे ऑगस्ट 2025

विषय - हक्क की कर्तव्य

सासुबाईंच्या राज्यात
भाग -१

"रोज माझ्यासमोर माझ्या कर्तव्याचेच पाढे वाचता तुम्ही. आज एकदम माझा हक्क कसा काय आठवला तुम्हाला ?"
निकिता जरा त्राग्यानेच सासूला म्हणजे भारतीला विचारत होती.

तिला माहिती होते त्यांचा उद्देश काय आहे .कारण गेल्या चार दिवसांपासून ज्या घडामोडी घडत होत्या त्यातून तिने ओळखलेच होते की त्या आपल्याला या विषयावर काहीतरी बोलतीलच.
........

तिने नोकरीही करायची आणि घरातलेही सगळं करायचं तेही वेळेत. थोडंही इकडे तिकडे व्हायला नको ही त्यांची अपेक्षा.

गेली वीस वर्ष तिने एका हाती सगळं सांभाळलं न कुरकुरता, न बोलता.सदैव हसतमुख राहून.म्हणून नयनलाही तिचा अभिमान वाटायचा.ही सोपी गोष्ट नव्हती.कारण तो आईवडीलांनाही सोडू शकत नव्हता आणि बायकोलाही.
पण आताशा तिचीही तब्येतीची कुरबुर सुरू झालेली. मेनोपॉजचा पिरेड त्यामुळे खूप त्रास व्हायचा आणि मग चिडचिड पण व्हायची.

"माझी कर्तव्य काय आहेत ते मला सांगणे हा तुम्हाला हक्क वाटतो तुमचा.
हो आहे ना. आहेच हक्क.पण... तो हक्क बजावताना आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी माणसाने."
निकिता आज उद्विग्न झाली होती.

हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू पण आम्हाला आपले हक्क कळतात ,पण कर्तव्याचा मात्र विसर पडतो सोयीस्करपणे. आणि दुसऱ्याचे मात्र कर्तव्य कळतात ,हक्क नजरेआड जातात.

एवढ्या वर्षात आज प्रथमच निकिता सासूबाईला बोलत होती तेही तिच्या नवऱ्यासमोर नयनसमोर.
सासरे ही ऐकत होते पेपर आडून.तोंडासमोर पेपर धरुन असले तरी. ते निकिताच्याच बाजूने होते. त्यांनाही बायकोची वागणूक बिलकुल पटत नव्हती. ते कितीदा तरी निकिताला म्हणायचे,
" अगं कुठवर ऐकशील ? तू जो जो ऐकते ना तो तो ती तुला जास्त गांजून घेते."

पण निकिताने आज अगदी मर्मावर घाव घातला होता. 'सौ सोनार की एक लोहार की'

"मी तुमच्याशी आदराने वागावे, तुमचा शब्द खाली जाऊ देऊ नये ,
तुम्हाला विचारल्याशिवाय इथली काडी तिथेही करू नये हे माझे कर्तव्य. ठीक आहे मान्य आहे मला.तो तुमचा अधिकार आहे.

पण... मलाही माझे काही मत आहे, माझ्या ठिकाणीही एखादा विचार रुजला असेल तो व्यक्त करण्याचा हक्क मलाही असावा नाही का? मी मला कधीच व्यक्त करू शकणार नाही का?
मीही या घरातली एक सदस्य आहे. तेव्हा माझ्याही मताचा आदर व्हावा, नाही प्रत्येक वेळी तर एखादवेळी तरी?
घरातला कुठला मोठा निर्णय घेताना मला विचारात घ्यावं असं का वाटलं नाही तुम्हाला कधी?

आज वीस वर्ष झालीत लग्नाला तरी मी परकीच आहे का अजून या घरात?"
आता निकिताचा स्वर व्याकुळ झाला होता ," अहो आई,कर्तव्य कर्तव्य कर्तव्य रोज हे रटलेले शब्द ऐकता ऐकता अर्ध आयुष्य सरलं .किती उरलं माहीत नाही.

कर्तव्याचा गजर तर रोजच होतो आणि मी पण हजर होते. पण या घड्याळात हक्काचा ना गजर आहे न काटा आहे.

हक्क विसरूनच गेली हो मी माझे.

आज तुम्हाला आठवण झाली माझ्या हक्काची...?कशी काय?
आज भाग्यच चालून आले म्हणायचे माझ्या दारी."
निकिताने शाल जोडीतून लगावली होती सासूबाईंना.
"माझा हक्क ? कशाबद्दल बोलत होतात तुम्ही आई..‌. माझा कोणता हक्क...?
क्रमशः
बाकी पुढील भागात
भाग -२मधे वाचा
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all