Login

सासूबाईंच्या राज्यात भाग-३ अंतिम

चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
विषय - हक्क की कर्तव्य

सासुबाईंच्या राज्यात
भाग -३ अंतिम
दोन गोड गोजिरी मुलं .एक मुलगा एक मुलगी. मायेने समजून घेणारा पती हे तिचं भांडवल होतं आणि त्या भांडवलात ती खूप सुखी होती.खूष पण होती.
आणि नवराही चांगला नोकरीवर तिची स्वतःची कमाई म्हणजे आर्थिक चणचणही घरात नव्हती.
ती तिचा पगार तिला हवा तसा खर्च करू शकत होती किंवा बचतही करू शकत होती त्याचेही तिच्यावर बंधन नव्हते. ही तिच्यासाठी खरे तर खूप समाधानची बाब होती.
एकंदरीत समाधानी वातावरण.

पण सासूच्या तेच डोळ्यात खूपत होते.तिची मुलगी निशा बारावी पास आणि तेही ढकलगाडीने.
नवऱ्याचा पगार जेमतेम.म्हणून
सासूचा सतत निकिताच्या पगारावर डोळा असायचा. सासू त्यावरून तिला टोमणे मारायची पण निकिताचा एकच मंत्र

'दुर्लक्षाय नमः'

एक सासू सोडली तर तिला घरात कुणाचाच कुठलाच त्रास नव्हता.

निकिता स्वतःचं आयुष्य मस्त आनंदात जगायची सासूकडे दुर्लक्ष करून.
तेही खटकायचे सासूला. ही आनंदात जगतेच कशी ?
आता तर तिला आयतं कोलीतच सापडलं होतं निकिताला धारेवर धरायला.
निकिताने फक्त विचारायचीच देरी होती की," तुम्ही माझ्या कोणत्या हक्काबद्दल बोलता आहात?"

भारतीताईंची 'वाचाळ एक्सप्रेस' सुसाट वेगाने धावू लागली.
"मला समजलंय तुझा भाऊ गावाकडलं शेत आणि घर दोन्ही विकतोय. तो तर पुण्याला आधीच स्थायिक झालेला आहे."
"हो मग ?" निकिता अगदी काहीच न कळल्यासारखी बोलली.
"अगं, मग काय मग... तुझा हक्क नाही का त्या शेतात आणि घरात?"

"हो का ? शेतात घरात माझा हक्क आहे आणि निरज माझ्यापेक्षा लहान असून त्याच्या लग्नात त्याला काही अहेर, आई-बाबांना काही अहेर हे माझं कर्तव्य नव्हतं?

माझ्या लग्नाला वीस वर्षे झाली आज पर्यंत मुलगी या नात्याने आपण माझ्या आई-वडिलांना किंवा भावाला किंवा त्याच्या मुलीला कधी काय घेतलं बरं?"

"तुझा पगार होता तुला कोणी अडवलं होतं?" भारतीताईंनी तोफ डागली.
जणू या प्रश्नाच्या अपेक्षेतच असलेली निकिता ताडकन उत्तरली," माझ्या पगारातून मी द्यायचे की नाही, काय द्यायचे हे मी बघेन पण घरातून तुम्ही काय काढून दिलंत ?"
वीस वर्षे मनात साठलेल्या गाळाचा जणू निचरा सुरू होता.

आणि हो माझं लग्न झालं त्यावेळी आपलं राहतं घर होतं. नंतर नयनने दुसरा प्लॉट घेऊन मोठा बंगला बांधला आपण सगळे तिकडे राहायला गेलो. तुम्ही जुने घर विकले. त्यात नयन आणि निशा आणि तुमचे दोघांचे अशी चार हिस्से ठेवलेत. अगदी योग्य वाटणी होती ती. निशाताईंचा हक्क आहेच मान्य आहे मला. पण नंतर लगेच तुमच्या वाटणीचा हिस्सा तुम्ही निशाताईंना दिला. तुमची देवघरातली सगळी चांदीची भांडी आणि तुमचं सोनं नाणं तुमच्या हयातीतच तुम्ही निशाताईंना दिलं. आज त्या गोष्टीला चार वर्षे उलटून गेलेत तरी सुद्धा मी ब्र काढला नाही तोंडातून. अजूनही काढला नसता. पण आज तुम्ही मला माझा माहेरच्या संपत्ती वरचा हक्क सांगताहात म्हणून सहज विचारते, "तुमच्या स्त्रीधनात मुलाचा पर्यायाने सुनेचा काडीचाही वाटा नव्हता का? एक माशाचा मणी, त्याचीही हकदार नव्हती मी ?"
"राहू देत मुलाचा,सुनेचा पण नातवांचा? त्यांना साधी अंगठी तरी केलीत का तुम्ही? त्यांचाही हक्क नव्हता?"
"आई , दैवाने दिले कामापुरते. आम्ही समाधानी आहोत त्यात. मी लिहून दिलंय निरजला आणि आई-बाबांनाही सांगितलं मला ना घरात हिस्सा हवा न मला शेतात हिस्सा हवा ,न मला तुमच्या
दागदागिने, शेअर्स आणखी जी काय प्रॉपर्टी असेल त्यात कशातच हिस्सा नको . मी पंधरा दिवसाच्या आधीच त्यांना स्टॅम्प पेपरवर हक्क सोडत आहे म्हणून लिहून दिलेले आहे. मी निरजला आणि नेहाला स्पष्ट सांगितले,
" आई बाबा आहेत तोवर तर प्रश्नच नाही पण ते गेल्यावरही तुमच्या घरात, तुमच्या हृदयात या बहिणीसाठी जागा असू द्या. बस तेवढीच जागा हवी मला.बाकी काही नको."
निकिताचे हे वाक्य ऐकून भारतीताईंचा तिळपापड झाला.

चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे असं म्हणतात .त्याचा अनुभव भारतीताईंना आला. आता आपली या घरातली सत्ता संपली आता निकिताचं राज्य सुरू झालंय याची जाणीव त्यांना झाली.

पण हे संभाषण झालं आणि निकिता स्वयंपाक घरात गेली. आणि सासूबाईंची गोळीची वेळ झाली म्हणून त्यांच्यासाठी दुधाचा ग्लास भरून घेवून आली.
भारतीताईंना आज प्रकर्षाने जाणीव झाली आपण चुकलोच निकिता आपल्या कर्तव्यात कसूर नाहीच करणार कधी. आपण सांगितलं तरी आणि नाही सांगितलं तरी. त्या आश्वस्त होऊन झोपायला खोलीत निघून गेल्या.जाता जाता निकिताच्या डोक्यावरून हात फिरवत एवढेच म्हणाल्या," क्षमा कर मला."

समाप्त
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all