गेल्या भागात आपण पाहिले की, महेशने भांड्याला आणि लादीला बाई लावायचे सांगितले तसे शांता मधुराकडे रागाने पाहू लागली. आता पाहू पुढे.
"लग्न झाल्यापासून खूप बोलायला लागला आहेस." शांता चिडक्या स्वरात म्हणाली.
"आई, काय चुकीचं बोललो? सांग ना मला?"
प्रकरण चिघळत आहे हे बघून अमोल दोघांच्या मध्ये पडला.
"महेश, शांत बस."
"दादा, का शांत बसू? तू पण तर प्रत्येकवेळी शांतच बसला. त्याने काही फरक पडला का?"
"तू आता त्याला शिकव उलटं बोलायला."
शांताचा राग अनावर झाला. त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला.
शांताचा राग अनावर झाला. त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला.
"आई, मी काहीही शिकवत नाही. जे माझ्या डोळ्याला दिसतंय ते बोलतोय. काय चुकीचं बोललो मी सांग ना? लावली मदतनीस तर काय होणार? घरात पैश्याचा प्रॉब्लेम नाहीये, सगळेच कमावतात. दोन पैसे देऊन जर कामाचा ताण हलका होत असेल तर काय वाईट आहे? कामाचा ताण हलका झाला की, वहिनी आणि मधुराला वेळही मिळेल."
"आधी तर कधी बोलला नाही? बायको आली आणि बरोबर सगळं बोलायला लागला."
"हो आई बोलायला लागलो, तीने माझ्यावर विश्वास ठेवून लग्न केलं आहे. तिला जर काही त्रास होत असेल तर मी बोलणार." महेश म्हणाला.
"खरंच बदलला. तू असा नव्हता." शांता नाराजीच्या सुरात म्हणाली.
"आई, मी काहीच बदललो नाही. तू माझ्याठिकाणी राहून विचार कर. असं काय चुकीचं बोललो ? आणि आई आजीने तुला राबवून घेतलं, तर तू देखील तेच करणार आहेस का? मलाही माहीत आहे तू खूप कामं केली. मलाही जाणीव आहेच; पण काळाप्रमाणे बदलायला नको का? त्या दिवशी तू म्हणत होती ना? ऑफिसमध्ये काय कामं असतात? आई खूप कामं असतात. कामाचं प्रेशर असतं. सगळी कामं व्यवस्थित झाली नाही तर बॉसचे दोन शब्द ऐकून घ्यावे लागतात. मेंटल स्ट्रेस असतं. जशी तू मेहनत केली असं तुला वाटतं तसंच वहिनी आणि मधुरा करत आहेत. ऑफिसला जाताना होणारी दमछाक काही कमी नसते. जीव मेटाकुटीला येतो आई. स्पर्धा इतकी वाढली आहे की, त्यात टिकून राहावं लागतं. आज कमी वयात आजार होतात कारण काय आहे माहीत आहे स्ट्रेस. सतत डोक्यात विचार, स्पर्धेच्या जगात स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणं वाटतं तितकं सोप्प नाही. स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी आपण प्रयत्न करायला नको का? लहानसहान गोष्टी आहेत आई, त्याचा बाऊ न करता स्वीकारायला हवं. तुझा समज कसा झाला आहे की, तू केलं ते सुनांनी करावं. आई पिढी बदलत जाते. ज्या गोष्टी आजी करायची ते तुला जमायचं नाही, तेव्हा आजी किती भांडायची. तुला घालूनपाडून बोलायची. त्या दिवशी मेथीची भाजी नीट झाली नाही तेव्हा तू मधुराला नीट सांगू शकत होती; पण तू जे बोलली ते ऐकून मला तुझ्यात आजी असल्याचा भास झाला. आई, ही साखळी तुटली पाहुजे, तू समजून घ्यावं इतकीच अपेक्षा आहे. आजीबद्दल विचार केला की एकच गोष्ट आठवते ती म्हणजे आजीने तुझा छळ केला, तू खूप सोसलं. आई, पुढे जाऊन आमची मुलं होतील तेव्हा त्यांनी आजी म्हणून तुझ्याविषयी चांगला विचार करावा. ही साखळी कुठेतरी थांबली पाहिजे आई. विचार कर."
महेश जणूकाही मेघाच्या मनातलं बोलत होता.
इतके दिवस ती सगळं शांतपणे करत होती. अमोलला देखील बोलण्यापासून रोखत होती. आई मुलाच्या नात्यात वाद विवाद तिला नको होता; पण आज मात्र महेश सगळं बोलून गेला.
इतके दिवस ती सगळं शांतपणे करत होती. अमोलला देखील बोलण्यापासून रोखत होती. आई मुलाच्या नात्यात वाद विवाद तिला नको होता; पण आज मात्र महेश सगळं बोलून गेला.
"वहिनी, सॉरी तुम्ही आनंदाची बातमी दिली आणि मी.." असं बोलून तो रुममध्ये निघून गेला.
त्याच्या पाठोपाठ मधुराही गेली.
"आई, तुम्ही भाऊजींच्या बोलण्याचा जास्त विचार करू नका. लहान आहेत ते." मेघा समजावत म्हणाली.
शांताने तिच्याकडे पाहिले.
"कधी कधी लहान थोरांना शिकवून जातात."
"आई, तुम्ही जास्त विचार करू नका."
"मेघा, मी तुला नेहमी गृहीतच धरलं ना? आज महेश हे सगळं बोलून गेला तेव्हा जाणीव झाली की खरंच वेळेनुसार बदललं पाहिजे."
शांताच्या तोंडून हे वाक्य ऐकलं आणि मेघाला तर विश्वासच बसेना.
"हो आई वेळेनुसार थोडं बदललं पाहिजे." अमोल म्हणाला.
"मेघा, महेश बरोबरच बोलतोय. तुम्ही दोघीही ऑफिसवरून येऊन थकत असणारच. माझ्या सासूने मला खूप राबवून घेतलं, म्हणून मीही तसेच वागणे चुकीचं आहे. खरंतर आधी नव्हत्या सोयी सुविधा, गरिबी होती. माहेरी देखील गरीबी आणि सासरी देखील गरिबीच होती, म्हणून कष्ट करावे लागत होते. आता कितीतरी गोष्टींचा शोध लागला आहे, आपल्या सोयीसाठी त्या वापरायला हव्या आहेत. आपला वेळ, ऊर्जा वाचते. पुढेही अजून बदल होतील, त्याचा देखील स्वीकार करायला पाहिजे. महेश अगदी बरोबर बोलतोय. मीच समजून घेण्यात चुकले. महेशने खरंच माझे डोळे उघडले. वेळेनुसार बदललं पाहिजेच. निर्मला मावशीकडे ज्या मावशी कामाला येतात त्यांना बोलावूया का? त्या मावशी छान काम करतात म्हणे."
मेघाने होकारार्थ मान हलवली.
महेशने आईला समजावले होते ते तिला पटलं होतं. आपल्या सोयीसाठी नवीन गोष्टींचा स्वीकार करायला हवा हे तिने जाणलं होतं.
खरंय ना वेळेनुसार बदललं पाहिजे.
समाप्त.
अश्विनी ओगले.
कथा कशी वाटली कंमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक न विसरता द्या.
अष्टपैलू कथालेखन २०२५
अश्विनी ओगले.
कथा कशी वाटली कंमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक न विसरता द्या.
अष्टपैलू कथालेखन २०२५