Login

सासूची सून.... की मुलाची बायको ?भाग 3

Story Of Bhavna
सासूची सून… की मुलाची बायको?
भाग ३ : आई विरुद्ध बायको

कालच सगळ बोलणे ऐकून भावना मनाने पूर्णपणे तुटून गेली होती...ती मुकाट्याने ऐकत होती कारण तीच अमोल वर प्रेम होतं म्हणून...पण दुःख तर होतंच ना...

सकाळ उजाडली…पण भावनेच्या आयुष्यात अंधार तसाच होता.मोबाईल हातात घेऊन तिनं आईचा नंबर पाहिला.एक क्षण वाटलं फोन करावा…पण लगेच आठवलं“तू आमच्या नाकाला काळं फासलंस…”अशी तिची आई बोलली होती आणि ते आठवून तीनं मोबाईल खाली ठेवला.

स्वयंपाकघरात सुलोचना पूजा आवरत होती.भावना तिच्या मागे उभी राहिली.“आई… काही मदत करू का?”
आवाज नम्र होता.....

सुलोचनानं मागे वळून पाहिलं.क्षणभर वाटलं, काहीतरी बोलेल…पण ती शांतपणे म्हणाली,
“नको. मला सवय आहे.”

तो नको भावनेला दूर ढकलणारा होता.अमोल ऑफिसला जायची तयारी करत होता.नंदा त्याच्या मागे लागली.
“अमोल, आज ना उद्या तुला निर्णय घ्यावाच लागेल,”
ती ठामपणे म्हणाली.
“आई रोज रडतेय… आणि ही?”
तिनं भावनेकडे कटाक्ष टाकला.
“हिला फरकच पडत नाही.”

भावनेच्या डोळ्यांत पाणी तरळलं.पण ती गप्प राहिली.
“बस नंदा!”
अमोलचा आवाज चढला.

“ती माझी बायको आहे.”

“आणि आई?”
नंदाने लगेच प्रतिप्रश्न केला.
“आई तुझ्यासाठी आयुष्यभर एकटी उभी राहिली.
आज तिच्या डोळ्यात पाणी आहे… त्याला कारण कोण?”
अमोल निशब्द झाला.

तो निघून गेला.घरात शांतता पसरली… पण ती बोचरी होती.
दुपारी सुलोचना एकटीच खोलीत बसली होती.हातात अमोलचा लहानपणीचा फोटो.मी याला जन्म दिला…आज तो माझ्याशी न बोलता घराबाहेर पडतो…तेवढ्यात भावना चहा घेऊन आत आली.हळूच कप टेबलावर ठेवला.
“आई… मी......

“भावना,”
सुलोचनानं पहिल्यांदाच तिचं नाव घेतलं.

भावनेचं काळीज थबकलं.
“माझा मुलगा माझ्यापासून दूर का गेला?”
तिचा आवाज तुटलेला होता.

भावनेनं डोळे पुसले.
“आई… मी त्याला तुमच्यापासून दूर नेलं नाही.
मी फक्त त्याच्यावर प्रेम केलं…”

सुलोचना उठली.
“प्रेमासाठी आईबापाला दुखावायचं असतं का?”

भावना थरथरत म्हणाली,
“माझंही कुणी उरलेलं नाही आई…
माहेर, सासर… दोन्हीकडे मी चुकीची ठरले.”

तो क्षण सुलोचनासाठी अनपेक्षित होता.ती काही बोलणार इतक्यात नंदा दारात उभी राहिली.
“आई, हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस.....अशा मुली खूप हुशार असतात.”

तिचे शब्द ऐकून सुलोचना पुन्हा कठोर झाली.भावना गप्पच बाहेर गेली.रात्री ती खोलीत बसली होती.डोळे कोरडे झाले होते.
कदाचित मला इथे सून म्हणून नव्हे…तर फक्त तडजोड म्हणून स्वीकारलं गेलंय…आणि त्या क्षणी तिच्या मनात पहिल्यांदाच विचार आला की...