Login

सासूची सून....की मुलाची बायको ? भाग 9

Story Of Bhavna
सासूची सून… की मुलाची बायको?
भाग ९ : हळूच जुळणारी नाती

काल झालेल्या घटनांमुळे बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या.. भावनाला सुद्धा समाधानाची झोप लागली होती...सकाळ नेहमीसारखीच उजाडली…पण आज भावनेच्या मनात वेगळीच धडधड होती.आज तिचा interview होता.ती शांतपणे तयार होत होती.हात थरथरत होते, पण डोळ्यांत ठामपणा होता.
स्वयंपाकघरातून सुलोचना तिला पाहत होती. क्षणभर काही बोलावी का, असा विचार तिच्या मनात आला.

“भावना…”
ती स्वतःच आश्चर्यचकित झाली, कारण तोंडातून शब्द बाहेर आले होते.

भावना वळली. “हो आई?”
“उशीर झाला तर फोन कर…” क्षणभर थांबून सुलोचना म्हणाली, “काळजी वाटते.”

भावनेच्या डोळ्यांत पाणी आलं. ती फक्त मान हलवू शकली.
अमोल तिला सोडायला आला. “तू करशील,” तो ठामपणे म्हणाला.

नंदा दूर उभी होती. ती काहीच बोलली नाही. पण तिच्या मनात पहिल्यांदाच टोच लागली की आपण खरंच आपल्या स्वार्था साठी फार पुढे गेलो का?

दुपारनंतर भावना घरी आली. थकलेली… पण समाधानात.
“कसं गेलं?”
अमोलनं विचारलं.

ती हसून म्हणाली, “खूप बरं.”

सुलोचना देवासमोर बसली होती. तिनं देवाकडे पाहून फक्त एवढंच म्हटलं की “हिला बळ दे.”

त्या क्षणी तिला जाणवलं की ही मुलगी तिच्यापासून काहीच हिरावून घेत नाहीये…उलट, घरात एक नवी ऊर्जा आणतेय.

संध्याकाळी फोन वाजला.भावनानं उचलला…आणि क्षणभर ती काहीच बोलली नाही.
“नोकरी मिळाली,”
ती फक्त एवढंच म्हणाली.

Back office का असेना पण तिच्यासाठी ती नोकरी खूप महत्वाची होती आणि तिला ती मिळाली त्यासाठी ती खूप आनंदी झाली...

अमोलनं तिला घट्ट मिठी मारली. “मला माहीत होतं.”
सुलोचना हळूच हसली. ते हसू लहान होतं… पण खरं होतं.
दुसऱ्या दिवशी शेजारणी आली.
“काय गं सुलोचना, आता सून ऑफिसात जाणार म्हणे?”

सुलोचना क्षणभर थांबली…आणि ठामपणे म्हणाली, “हो.
माझी सून घर सोडत नाही…ती घर आणि स्वप्न दोन्ही सांभाळते.”तो आवाज आत्मविश्वासाचा होता.

नंदा हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यांत पाणी आलं.
रात्री तिनं भावनेच्या खोलीत येऊन दार ठोठावलं. “मी येऊ का?”

भावना चकित झाली. “हो.”

नंदाचा आवाज तुटलेला होता. “मी चुकले… मला वाटलं मी आईला गमावतेय. पण मी तुला दुखावलं.”

भावना काही क्षण गप्प राहिली. मग म्हणाली, “नात्यांत जागा कमी पडत नाही नंदा ताई… समज कमी पडते.”

नंदानं डोळे पुसले....आणि हसून तुमच्या बाहेर गेली....त्या रात्री सुलोचना बराच वेळ जागी होती. तिच्या मनात एकच विचार होता की मी सासू म्हणून कठोर झाले… पण आई म्हणून अजूनही शिकत आहे.

क्रमशः…
0

🎭 Series Post

View all