Login

सासूची सून....की मुलाची बायको ? भाग 2

कथा भावनेची
सासूची सून… की मुलाची बायको?
भाग २ : घरातली आरोपी

रात्रभर भावना ला झोप काही आली नाही...अमोल काही वेळात रूम मध्ये आला ...तो भावना जवळ गेला आणि तिला जवळ घेतलं...आणि म्हणाला,
" मला माफ कर... सगळा राग तुझ्यावर निघत आहे ....पण मला खात्री आहे की सगळ ठीक होईल...आई नक्कीच तुला जवळ करेल"
 
सकाळ झाली होती...घर जागं होतं… पण वातावरण जड होतं.भावना स्वयंपाकघरात उभी होती....सगळ शोधाशोध करून काम करण्याचा प्रयत्न करत होती...हात काम करत होते, पण मन मात्र कालच्या शब्दांत अडकलं होतं.
“पळवून नेलं…”
“हक्क सांगायला आली…”
ती स्वतःशीच पुटपुटली,
“मी फक्त प्रेम केलं होतं…”
तेवढ्यात नणंद स्वयंपाकघरात आली.

तिनं मुद्दाम आवाज करत भांडी हलवली.
“आई, चहा ठेवतेस का?”
तिने भावनेकडे न पाहत विचारलं.

भावना गडबडली.
“हो… ठेवते.”
चहा करताना हात थरथरत होते.

उकळलेलं दूध उतू लागलं.
“अगं, जरा डोळे उघडे ठेव!”
नणंद टोमणा मारत म्हणाली.
“इथे माहेर नाहीये तुझं.”

भावना गप्प राहिली.तिला माहीत होतं की उत्तर दिलं तर तीच दोषी ठरेल.सुलोचना बाहेरच्या खोलीत बसली होती.चहाचा कप समोर आला…पण तिनं तो उचललाच नाही.
“मी चहा घेत नाही,”
ती थंड आवाजात म्हणाली.

भावनेच्या काळजावर पुन्हा एक वार बसला.अमोल सगळं पाहत होता...तो पुढे आला.
“आई, भावना प्रयत्न करतेय…”

“प्रयत्न?”
सुलोचना कटाक्ष टाकत म्हणाली.

“आमच्यावर काय बीतलीय ते कळतंय का तिला?”
हे ऐकून तो गप्प झाला.

नणंद हळूच म्हणाली,
“आई, हिच्यामुळेच आपली मान खाली गेलीये.
लोक काय म्हणत असतील?”

ते शब्द भावनेसाठी जास्तच बोचरे होते.दुपारी शेजारणी आली.
“काय गं सुलोचना, अचानक लग्न…?”
सुलोचनाने नुसती मान खाली घातली.नणंद मात्र पुढे सरसावली.
“काय सांगू ताई… आजकाल मुलं आईबापाला विचारतच नाहीत.”

भावना पडद्यामागे उभी होती....एकही शब्द तिच्या बाजूने नव्हता.संध्याकाळी ती देवासमोर बसली.डोळे मिटले.... आणि म्हणाली

"देवा…मी चुकीची आहे का?प्रेम करणं इतकं मोठं पाप असतं का?"

तेवढ्यात सुलोचना तिथे आली.तिनं देवाकडे पाहिलं…
मग भावनेकडे.क्षणभर दोघींच्या नजरा भिडल्या.
“देवाकडे मागतेस काय?”
सुलोचनाने विचारलं.

भावनेचा आवाज थरथरला.
“सून म्हणून स्वीकार…”

सुलोचना काहीच न बोलता निघून गेली पण त्या एका शब्दानं तिच्या मनात काहीतरी हललं....रात्री नणंद अमोलला म्हणाली,
“लक्षात ठेव…आई आणि ही तुझी बायको ,दोघी एकत्र राहू शकत नाहीत.”

अमोल गप्प बसला.
आणि भावना…ती सगळ रूम मधून ऐकत होती तिने ऐकताच उशीमध्ये तोंड खुपसून रडणं दाबून ठेवलं...कारण तिला माहीत होतं की या घरात तिला रडण्याचाही अधिकार नाही...पण ती एकटी पडत चालली होती कारण तिचे घरचे सुद्धा तिच्याशी बोलत नव्हते....