Login

साथ ही तुझी जशी उन्हात चांदवा भाग दोन (अंतिम)

Lovestory

साथ ही तुझी जशी उन्हात चांदवा भाग दोन (अंतिम)
लघुकथा

तो हसला आणि तसाच काही अंतर चालू लागला...
ती दमली तिने त्याचा हात सोडला व धापा टाकत पोट धरत तिथेच थांबली....रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडे होती.... ट्रेन मधल्याच छोट्या स्टेशनवर थांबवल्यामुळे क्वचीत एखादे वाहन रस्त्याला दिसत होते...
त्याने मागे वळून पाहिले... आणि तो परत तिच्या जवळ गेला...

"दमलीस का?"

ती रस्त्याच्या कडेला असलेल्या मैलाच्या दगडावर बसली.

"हा... अजून नाही चालू शकत.... आपण कुठे चाललो आहोत...."

"माहीत नाही... मी पण इथे पहिल्यांदाच येत आहे.... कुठे काही राहायची व्यवस्था होत आहे का ते पाहत होतो पण इथे काहीच दिसत नाही..... आज  कदाचित मिलिक्ट्री येईल तेंव्हाच दंगे थांबतील..तो पर्यंत आपल्याला या स्टेशनवरच थांबावे लागेल बहुतेक........
तुझा फोन दे ना माझा एक पोलीस मित्र आहे त्याची मदत मिळते का ते बघतो... माझा फोन डेड झालाय."

"माझा पण... मघाशीच पाहिलं मी..." त्याने नकारार्थी मान हलविली. आणि पुढे होऊन  तिचे सामान हातात घेतले व तिला उठण्यासाठी हात दिला... तिने एकवार त्याच्याकडे पाहिले... त्याला घाम आला होता... उन्हामुळे त्याचा गोरा चेहरा चमकत होता.... त्याने डोळ्यावर येणारे त्याचे सिल्की केस मान झटकून बाजूला केले.

'मध्यम शरीरयष्टी, दुधासारखा गोरा रंग, त्यावर चमकणारे छोटेसे डोळे, सिल्की केस आणि माझ्यासारख्या अनोळख्या मुलीला मदत करायची याची भावना... खरंच किती छान आहे हा!……' रश्मी मनात म्हणाली.

"चल... इथून जायला पाहिजे... "

तिला उठवण्यासाठी त्याने आपला हात दिला.. दमलेली ती नाईलाजाने उठली. आणि त्याच्या बरोबर चालू लागली... त्याच्याकडे तिचे आणि त्याचे दोघांचेही सामान असूनही तो झपाझप चालत होता.

"शुक शुक... जरा हळु चल ना... माझे पाय दुखतं आहेत..."तीने मागून हाक मारली. 

त्याने मागे वळून बघितले,

"शिवांश... आहे माझे नाव.." त्याच्या डोळयांत smile होती.

"रश्मी...." ती म्हणाली..

"शिवांश.... तुला मराठी कसे येते?" तो पुढे चालू लागला तसे काहीसे धावत त्याला गाठत तिने विचारले.

"माझी आई महाराष्ट्रीयन आहे.... माझे बाबा इथले मोतीपूरमधले. मुंबईला ती दोघ एकाच कॉलेज मध्ये होते...... तिथेच त्यांची मने जुळली..... आता आईबाबा दोघेही इथेच असतात... मी शिकायसाठी मुंबईला होतो..."   तो पुढे बघत चालत बोलत होता...

"अच्छा..... म्हणून इतके चांगले मराठी येते तुला... पण...."

हे बोलत असताना वाटेत तिचा पाय दगडात अडकून आपटला आणि ती खाली जोरात पडली.
त्याने मागे पाहिले........ हातातले सामान तिथेच सोडून तो धावत तिच्याजवळ आला. तिच्या डोळयांत टचकन पाणी आले...तिच्या कोपराला खरचटले होते आणि त्यातून रक्त येऊ लागले... त्याने हळुवार त्यावर फुंकर मारली..व लगेचच आपल्या सामनातून पाण्याची बाटली आणली आणि तिचे कोपर साफ केले....

"Thank you... First एड आहे माझ्याकडे... मी नर्स आहे ना... नेहमी ठेवते मी माझ्या जवळ.... ती उठली हळूहळू चालत जाऊन तिने तिच्या बॅगेतून first एड बॉक्स काढला पण तिला स्वतःला ड्रेसिंग करता येत नव्हते... मग त्यानेच तिला ड्रेसिंग केले......ड्रेसिंग करताना तिला त्रास होऊन दुखू नये याची पुरेपूर काळजी तो घेत होता.

'वाह ड्रेसिंग एकदम परफेक्ट केलीय ', तिच्या मनात त्याच्याबद्दल आदराची भावाना निर्माण झाली.


आईवडिलांच्या मृत्यूनंतर ताई लग्न करून जेंव्हा मोतीपूरला रहायला आली तेंव्हापासून ती एकटीच मुंबईला राहत होती... तिची काळजी तीच घ्यायची.... शेजारी पाजारचे लोकं येता जाता विचारपूस करायचे इतकेच....आज  तिच्या जखमेवर मलमपट्टी करणारे  कोणीतरी  तिला भेटले होते...

ती डोळेभरून त्याला पाहु लागली त्याचेही तिच्याकडे लक्ष गेले तसे तिने मान वळविली.... तीन तासांपूर्वी अनोळखी असणारी ती दोघं आता काही वेळासाठी का होईना एकमेकांचे सोबती झाले होते... त्याने हात देऊन तिला उठायला मदत केली.

तिच्याबरोबर तोही हळू हळू चालू लागला .. शेवटी एकदाची त्यानां घरे दिसू लागली... दिसणाऱ्या पहिल्याच घरी ती दोघे गेले त्याने स्वतःच्याच भाषेत घडलेली हकीकत सांगितली.... त्यांना थोडेफार हिंदी येत होते.....

"बाबू.... थोडे आगे जाओ... नदी पार करो वहा आपका रहनेका इन्तेजाम हो जाएगा ... बिटियाके लिये वहा कालेजके बाजुमे लडकी लोगो का हॉस्टेल है और आप उधर एक धर्मशाला है उधर रह सकते है ...... वैसे बिटियाभी उधर रुक सक्ती है पर ऐसे माहोल मै उसे हॉस्टेलमे ही रुकने दो... हॉस्टेलमे कोई घूस ना पायेगा क्यूँ की मोतीपूरके आजूबाजूके इलाके की लडकीया वहा रहती है और ये लोग उनको कुछ नही करेंगे... क्योंकी वह उनकी जाती की ही हैना "

त्या घरातील माणसाने सांगितल्याप्रमाणे शिवांश आणि रश्मी पुढे जाऊ लागले.  दोघांचेही सामान त्याच्या खांद्यावर असल्यामुळे त्याचे खांदे दुखू लागले होते... तो... त्याच्या खांद्यावर असणारे बॅगेचे पट्टे आजूबाजूला सरकवत तो चालू लागला तसे तिने मागून त्याच्या खांद्यावर असणारी तिची बॅग ओढली... त्याने मागे बघितले..

"मी घेईन... तू फक्त पटपट चल..."

"पण तुला त्रास होतं आहे ना... माझ्यामुळे तुला उगीच त्रास झाला..."

तो तिच्याकडे बघून हसला... ती घाईघाईत पुढे आली आणि त्याच्याबरोबर चालू लागली...

"तू काय करतोस इथे?. म्हणजे कामधंदा..."

"मी डॉक्टर आहे..."

"काय?..." ती चकित झाली आणि थांबली... तो तसाच पुढे चालत राहिला...

"पण वाटत नाही तसे..."

"का? चेहऱ्यावरून मी कंपाउंडर वाटतो का?"

"नाही....... But what a coincidence मी नर्स आहे... इथे मोतीपूरमध्ये अंबाला येथे सरकारी दवाखान्यात मला जॉब लागला आहे... माझी ताईपण तिथेच राहते.... "

"मी अंबालाच्या पुढे सुंगात्रात सरकारी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहे.  मुंबईत इंटर्नशिप पूर्ण झाली आणि इथे नोकरी मिळाली .... तुझ्यासाठी उद्या सकाळी दहा वाजता ट्रेन मिळेल... अंबालाला जायची....आणि माझी ट्रेन आठ वाजताची आहे त्याने सांगितले."

तिच्याकडे पाहत तो म्हणाला..

"पणं आपण दोघे एका ट्रेनने नाही जाऊ शकत?... मी तुझ्याबरोबर येते तुझ्या ट्रेनने..."

तो उद्यापासून तिच्या सोबत नसणार हे सत्य तिला सहन होतं नव्हते. ती परत थांबली... तो पुढे चालतच होता...ती थांबल्याचे पाहून पूढे गेल्यावर तो ही ती त्याच्याजवळ येईपर्यंत थांबला...

"माझी फास्ट ट्रेन आहे... अंबालाला हॉल्ट नाही..."

"मग तू थांब ना...आपण दोघे जाऊ दहाच्या ट्रेनने ती तर स्लो आहे ना..."

"नाही... मला वेळ वाया घालवायला आवडत नाही.. आता चल पटकन..."

तिने परत त्याला धावत येऊन गाठले.... ती काहीशी नाराज झाली,.. थोडे अजून चालल्यावर नदी आली... नदीचे पात्र खूपच अरुंद होते आणि साधारण गुडघाभर पाणी होते त्यात... त्याने त्याचे बूट काढून हातात घेतले... आणि पॅन्ट फोल्ड केली... व तो एकदम सहजच नदी पार करून गेला... ती मात्र गोंधळली...

कधीही मुंबईच्या बाहेर न गेलेल्या तिला पाणी फक्त नळातून येणारे, समुद्रात असणारे आणि पिकनिकच्या वेळी रिसॉर्ट्स मध्ये पाहिलेले एवढेच ठाऊक.... त्याने केल्याप्रमाणे तिनेही तिची जीन्स खालून फोल्ड केली... आणि शूज हातात घेऊन गुळगुळीत दगडावरून स्वतःला कसेबसे वाचवत ती नदीचा प्रवाह पार करू लागली... आणि नदीच्या मध्यभागी आल्यावर तोल जाऊन धापकन  खाली पडली, त्याने मागे वळून पाहिले... पडल्यामुळे तिच्या नाका तोंडात पाणी गेले.. त्याने खांद्यावरचे सामान खाली टाकले आणि तो धावतच  तिच्याजवळ आला आणि त्याने पटकन तिच्या पाठीला आधार देत तिचे तोंड बाहेर काढले..
ती घुसमटली.... तिला जोरात ठसका लागला... पाण्यामुळे तिचे डोळे लाल झाले... त्याने तिला तसेच उचलून घेतले आणि नदीच्या पलीकडे नेऊन एका झाडाखाली बसवले.

ती डोळे मिटून दम टाकू लागली.... घाबरल्यामुळे तिची छाती जोर जोरात उडत होती... त्याने बॅगेतून पाण्याची बाटली काढली... आणि उघडून तिच्याजवळ दिली... पण  पाणी हातात घेऊन पिण्याचे देखील बळ तिच्या अंगात राहिले नव्हतं.. मग त्यानेच तिच्या पाठीला आधार देत बाटलीतून पाणी पाजले..... उठण्यासाठी तिने त्याच्या टी शर्टला घट्ट पकडले.... तसा तो एकदम तिच्या जवळ आला...त्याचे श्वास तिच्या गालाला जाणवत होते..... तिच्या निरागस डोळ्यात तो हरवला. आणि ती तर त्याच्यावर कधीचीच फिदा झाली होती. दोघंही क्षणभर मंत्रमुग्ध होत एकमेकांकडे पाहत राहिले.........

मग भानावर येत त्याने तिला उठायला मदत केली... दोघांच्याही मनात चलबिचल निर्माण झाली... कुठचाही संवाद न घालता ती दोघंही मुलींच्या वसतिगृहाच्या इथे पोहोचली...... त्याने आत जाऊन वॉर्डनला सगळी हकीकत सांगून तिची एका दिवसाची राहण्याची व्यवस्था केली....

"बोललो आहे मी मॅडमशी,... तू उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत इथे राहू शकतेस... त्या म्हणाल्या आहेत की त्या तुझी स्टेशनपर्यंत सोडायची व्यवस्था करतील...."
अच्छा.... Nice to meet you... Goodbye. "

"बाय.."

ती स्तब्ध होऊन त्याला इतकच बोलली.... आणि तो दिसेनासा होईपर्यंत तिथेच उभी राहिली.... त्याने एकदाही मागे वळून बघितले नाही....

'अरे... पण मी त्याचा फोन नंबरही घेतला नाही.... "

तिला खूप वाईट वाटले... इतका वेळ आपण त्याच्याबरोबर होतो त्याचा फोन नंबर आपण का मागितला नाही..... स्वतःला दोष देता देता तिचे डोळे भरून आले.




हॉस्टेल वॉर्डन ने तिला स्वतःच्या कारने रेल्वे स्टेशनमध्ये सोडलंच नाही तर ती रेल्वेत बसे पर्यंत ती तिथेच उभी होती.... मुंबईत एखाद्या परक्या माणसाला देण्यासाठी एवढा वेळ कुणी काढू शकेल काय?... तिने त्या भल्या स्त्रीचे आभार मानले आणि ती ट्रेनमध्ये शिरली...

"Excuse me,.. आप आपका बॅग उधर रखो...मुझे बैठनेका है..." हुडी घातलेल्या एका माणसाने सीटवर बॅग ठेवली होती.... त्याला ती बॅग खाली ठेवण्यासाठी ती सांगत होती....पण तिला ती बॅग ओळखीची वाटली....

"शिवांश ss.."

ती जवळ जवळ ओरडलीच... त्याला ट्रेंनमध्ये पाहून तिला सुखद धक्का बसला...
त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिले आणि तो हसला....

"तुझी ट्रेन मिस झाली का?"

"अं ह..."
त्याने नकारार्थी मान वळविली...

"मग?"
त्याच्या समोरच्या सीटवर बसत तिने विचारले.

"मला. तुझ्या ताईजवळ माझी ठेव सांभाळायला द्यायची आहे."

ती गोंधळली.

"म्हणजे तू ताईला ओळखतॊस?"

"नाही ओळखत नाही तसा...... पण तरीही भेटायचंय.... आणि हे विचारायचंय... की... तुमची बहीण माझ्याशिवाय चार पावले तर चालू शकत नाही.... मग इतके वर्ष तिने स्वतःला कसे सांभाळले?"
आणि त्यांना हे ही सांगायचंय  की मी परत येईपर्यंत तिला सांभाळा.... नाहीतर कुठेतरी रडत पडत राहील."
तिने डोळे विस्फारले... क्षणभर तो जे बोलत होता त्यावर तिला विश्वासच बसत नव्हता.

"शिवांश.... म्हणजे तू माझ्यासाठी आलास..."

"नाही... माझ्यासाठी  आलो.... कारण तुला एकटीला सोडून मला चैन थोडीच पडणार होती....काल तुला हॉस्टेल वर सोडले तेंव्हा मला वाटले... की माझे काहीतरी हरवलंय.... सकाळपर्यंत काय हरवले आहे याचा उलगडा झाला...."

"काय?"

"माझे हृदय..."तिच्या जवळ येत डोळयांत डोळे घालून तो म्हणाला तशी ती लाजली...


समाप्त.
ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा.

माझ्या कथा आवडत असतील तर मला फॉलो नक्की करा.