Login

साठवणूक (भाग २)

एक छोटंसं भांडण
साठवणूक (भाग २)

“ठीक आहे. एक पिशवी आण. यातली काही साबणं आणि सामान आईच्या घरी देऊ. तसंही उद्या आईकडं जायचंच आहे तेव्हा देता येईल.” पंकज आज कपाट आवरत होता. कीर्तीनं ठेवलेल्या कपाटातल्या वस्तू तो एक एक करून काढत होता.

“पंकज, राहू दे ना. आवरेल मी नंतर.” कीर्ती


“आवरतो गं. नेहमीच काही ना काही अवरतोच ना सुट्टी असली की. तेवढीच तुला मदत होईल. सुट्टीचं घरात बसून तरी काय करणार? आता होईल बघ आवरणं आणि हे काय दोन-दोन शॅम्पूच्या बॉटल!” पंकज म्हणाला.


“दोन शॅम्पू नाही. एक शॅम्पू आणि एक कंडिशनर आहे.” कीर्ती कसंनुसं तोंड करत म्हणाली.

“ठीक आहे. कंडीशनर आईला देऊन देऊ.” पंकजनं कंडिशनरची बॉटल पिशवीत टाकली.

“अरे पण मला लागतं ना?” कीर्ती म्हणाली

“सध्याचा आहे ना बाथरूममध्ये एक. हे आईला देऊन देऊ.” पंकज

“पण आईला माहित नाही ना कंडिशनर कसे लावतात ते आणि त्याला लावतही नाही.” कीर्ती स्वतःचा राग दाबत म्हणाली.

“अशी कशी लावत नाही. मी सांगेल तिला कसं लावायचं ते. बरोबर लावेल की नाही बघ.” पंकजनं


“आणि ही मोठी बॅग कधी घेतलीस तू?” समोरच्या मोठ्या ट्रॉलीबॅगकडं बघत पंकज म्हणाला.

“अरे, एका दुकानामध्ये स्टॉक क्लिअरन्स सेल सुरू होता ना तेव्हा ही बारा हजाराची बॅग सात हजारात मिळाली होती म्हणून मग घेतली आणि तसंही आता लागणार आहे ना पुढच्या महिन्यात लग्नाला जायचं आहे तर म्हटलं माझे, सावीचे आणि शरूचे तिघांचे कपडे एकाच बॅगमध्ये बसतील.” कीर्ती म्हणाली

“असं करतो सगळं सामान या बॅगमध्ये टाकतो. तसंही तायडी आली आहे तिकडं. ही बॅग तिला देता येईल आपण काय नंतर घेऊ.” पंकज म्हणाला कीर्तीला मात्र आता खूप राग आला होता.


“कीर्ती कमी सामानात जगाला शिक. उगीच्या उगी वस्तू साठवून ठेवत जाऊ नकोस. सामान कमी असलं की आवरसावर पटकनच होते.” पंकजनं बाजूला काढलेलं सामान त्या मोठ्या ट्रॉली बॅग मध्ये टाकलं. कीर्ती मात्र एवढूसं तोंड करून तिथं उभी होती.

“कीर्ती एखादी साडी आहे का तुझ्याजवळ चांगली? ताई तिकडे आली आहे तर ताईला दिली असती.” पंकज रूम आवरता आवरता कीर्तीला म्हणाला.

“नाहीये माझ्याजवळ साडी.” कीर्ती म्हणाली.

“आता मागच्या महिन्यात तर तू, तुझी आई आणि बहिण आल्या होत्या तेव्हा साड्या घेतल्या होत्यास ना. त्याच्यातलीच दे एखादी.” पंकज म्हणाला

“अरे त्या लग्नासाठी घेतलेल्या आहेत ना. आम्ही ठरवलंय कोणत्या कार्यक्रमाला कोणती साडी घालायची आहे आणि त्यानुसार आम्ही सगळ्या सारख्या साड्या घेतल्या आहेत.” कीर्ती स्वतःवर ताबा ठेवत बोलली.